महाराज


पाडव्याचे श्रीखंडपुरीचे जेवण झाल्यामुळे जी एक नैसर्गिक गुंगी येते त्यामुळे माझा बहुतेक डोळा लागला असावा. तेव्हढ्यात माझ्या छातीवर कुणीतरी काहीतरी टोचतंय अशी मला जाणीव झाली. डोळे उघडून पाहिले तर समोर साक्षात अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराज उभे! तोच जिरेटोप, तंग रेशमी बाजूबंद, छातीवर मोतियांची माळ, कपाळावर उभे गंध आणि हातात तीच भवानी तलवार! त्याच तलवारीने टोचून ते मला उठवत होते.

मी उठण्याचा प्रयत्न केला पण महाराजांनीच मला पडून राहण्याची खूण केली. मी तशाच अवस्थेत जमेल तसा मुजरा केला.

“असुदे.” महाराज उद्गारले.
“या नाचीजकडे काय काम काढलेत?” मी विचारले.
“पुरंदरे, जरा प्रॅाब्लेम झालाय, म्हणून बाबांनी तुम्हाला भेटायला सांगितलंय.”
“कोण बाबा?”
“बाबासाहेब, तुमचे आजोबा!”
“मी पामर आपली काय मदत करणार?”
“मला एक सर्टिफिकेट हवे आहे. “
“कसले?”
“मी मराठा असल्याचे.”
मी झोपलो होतो म्हणून पडलो नाही एव्हढेच!

“महाराज, आपल्याला सर्टिफिकेटची काय गरज?”
“ते मी तुम्हाला नंतर सांगतो, पण त्या आधी हा अर्ज भरायला मला मदत करा. कारण तो इंग्रजीत आहे. आम्हास फक्त मोडी भाषा अवगत आहे.”
“मोडी की मोदी?” अशाही परिस्थितीत विनोद करण्याचा मोह मला आवरला नाही. पण महाराजांनी त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले.
महाराजांनी खलिता द्यावा तसा मला एक नमुना अर्ज सुपूर्द केला.
“राजे हे तर सोपे आहे. यात प्रथम आपले नाव लिहायचे आहे, शिवाजी शहाजी भोसले, आईचे नाव, वडिलांचे नाव, पत्नीचे नाव-“
“तिथे दहा नावे लिहावी लागतील. एव्हढी जागा नाही. पुतळाबाईंच लिहा फक्त.”
“जन्मतारीख, वय आणि वयाचा दाखला?”
“आमच्या जन्मतारखेचा घोळ आहे, त्यामुळे नक्की वय माहित नाही, आणि दाखला म्हणजे काय असतं?”
“दाखला म्हणजे पुरावा. महापालिका किंवा इस्पितळाचे सर्टिफिकेट.”
“आमच्या वेळेला हे काहीच नव्हते. मग आता?”
“माहित नाही.”
“शिक्षण?”
“दादोजी कोंडदेव आणि जिजाऊनींच आम्हाला शिकवले.”
“पण सर्टिफिकेट आहे का? दहावी, बारावी, स्नातक, स्नातकोत्तर पदवी, या सर्वाचे सर्टिफिकेट लागेल.”
“हे आमच्याकडे नाही काहीच नाहीये.”
“ठीक आहे, हे सगळे आपण नंतर पाहू.” हे वाटते एव्हढे सोपे नाही याची महाराजांना जाणीव झाली. ते अश्वावरून पायउतार झाले आणि समोरच्या सोफ्यावर विराजमान झाले. मी देखील बिछान्यावर उठून बसलो.

“आपल्याला दूध वगैरे काही हवे आहे का?” मी अदबीने विचारले.
“नको, नंतर पाहू.” राजे म्हणाले. मी परत अर्ज वाचू लागलो.
“धर्म अर्थातच हिंदू. जात- हे महत्वाचे आहे. मराठा ९६ कुळी, ९२ कुळी का कुणबी?”
“आम्ही ९६ कुळी मराठे आहोत.”
“पण महाराज, आपल्याकडे काही पुरावा आहे का?”
“म्हणजे आपण ९६ कुळी मराठे आहात असा काही सरकारी दस्तऐवज आहे का?”
“१६४० साली आमचेच राज्य होते, आम्हासीच कोण दस्त देणार?”
“महाराज, आपण म्हणता ते बरोबर आहे पण हल्लीच्या काळात दस्त आणि त्यावर काही ऐवज ठेवल्याशिवाय राजदरबारात पानही हलत नाही. आपणास हे दस्त गोळा करावेच लागतील. त्यावाचून हा अर्ज पुढे जाणारच नाही.”
“मी हे सर्व आता कुठुन आणू?”
“ते सर्व मी करुन घेईन फक्त सगळीकडे मिठाईचे खोके द्यावे लागतील.”
“आम्ही आगऱ्याहून येताना ज्या मिठाईच्या पेटाऱ्यातून आलो त्यातील काही मिठाई वाटू शकतो.”
“राजे, आपणांस उमजले नाही. हल्ली तशी मिठाई चालत नाही.” राजांच्या लक्षात हळुहळू सर्व गोष्टी लक्षात येऊ लागल्या होत्या. बोलून चालून राजेच ते !
“आम्ही दोनदा सुरत लुटली ते सर्व धन नंतर म्लेंच्छांनी आणि इंग्रजांनी लुटले पण काही आम्ही दडवून ठेवले आहे ते वापरू शकतो.”
“पण हल्ली सोन्याला हॅालमार्क सर्टिफिकेट लागते. हिऱांचीपण तीच तऱ्हा आहे. पण ठीक आहे, आपण मॅनेज करु.”
मी आत जाऊन महाराजांसाठी दूध घेऊन आलो. दूध प्राशन करताना महाराज म्हणाले, “ हल्ली पूर्वीची चव राहिली नाही.”
“महाराज, हे प्राईड ॲाफ काऊचे १२० रुपये लीटरचे दूध आहे. गोड मानून घ्यावे.
“राजे, आपण आठ दिवसांनी या, मी आपणास आपण ९६ कुळी मराठे असल्याचा दाखलाच आणून देतो. पण हे आपणांस कशासाठी हवे आहे ते सांगितले नाहीत.”v दूधाचा ग्लास खाली ठेवून महाराजांनी एक सुस्कारा सोडला.
“काय सांगू तुम्हाला? मला आठ दिवसांपूर्वी पाटील नावाच्या गृहस्थांचा निरोप आला होता. सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा विषय चालू आहे. लवकरच ते लागू होईल. पण त्यामधे जे मराठे महापुरुष होऊन गेले किंवा होऊ घातले आहेत त्यांच्या पुतळ्यांकरिता आरक्षणाची तरतूद करणार आहेत. आमचे गावोगावी पुतळे आहेत, ते रेग्युलर करुन घेण्यासाठी प्रथम आम्ही मराठे आहोत हे दाखवणे गरजेचे आहे. त्याकरिता आम्हाला या दाखल्याची आवश्यकता आहे.”
आता हा सर्व प्रकार माझ्या लक्षात आला होता. मी महाराजांना म्हणालो, “ हे सर्व ठीक आहे. सर्व महाराष्ट्रासाठी आपण जे काही केले आहे त्यासाठी आम्ही आपले कायमचे ऋणी आहोत. पण हे आरक्षण काही आम्हाला पटत नाही. मग मी आपणांस का मदत करावी?”
“तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे. पण आमचा राज्याभिषेक देखील वेदब्राह्मणांच्या साक्षीनेच झाला. आरक्षण मिळाले तरी तुमची आम्हाला गरज नेहमीच लागणार. शेवटी रथाची दोन्ही चाकं ठीक असतील तरच राज्यशकट चालेल.”
“राजे, हे आम्हाला पटते पण तुमच्या आजच्या नेत्यांना आमचे हक्क कमी करुन त्याबदल्यात सवलती हव्या आहेत त्याचे काय?”
“तुमच्याशी बोलून आमचे मस्तक भणभणू लागले आहे. आमचे पुतळे वाचविण्यासाठी एव्हढे तर करावेच लागेल. एव्हढे आमचे काम करा. बाकीचे आपण नंतर पाहू. आम्ही आठ दिवसांनी परत येऊ.” असे म्हणून राजे अंतर्धान पावले. माझा परत डोळा लागली असावा. काही वेळाने परत आमच्या छातीवर आघात होऊ लागले. मी घाईघाईने डोळे उघडून कुर्निसात केला तर समोर साक्षात अर्धांगी प्रगट झाली होती.
“अहो उठा, मुजरा कसला करताय, चार वाजून गेलेत. दुपारीपण रात्रीसारखी ताणून देणे चांगले नाही. चला, चहा ठेवलाय.”

Comments

छान, सद्यपरिस्थितीत लागू पडते.

By : प्रतिभा ताराबादकर
28/11/2023 12 : 05 : 13 PM

तुमच्या शयन कक्षात महाराज अश्वाला घेऊन आले म्हणजे तुमची सदनिका दोन सहस्र चौरस फूट आहे का?!

By : Bhalchandra Shrikhande
28/11/2023 4 : 11 : 22 PM

स्वप्नात फुटांची मर्यादा नसते

By : Admin
29/11/2023 10 : 14 : 47 AM

शालजोडीतून ———— आवडले 🙏

By : मोहिनी चित्रे
28/11/2023 5 : 55 : 46 PM

Satirical humour. Excellent

By : Deepak Tikekar
28/11/2023 7 : 31 : 51 PM

हाहाहा ,,पुरंदरे..खूपच खुसखुशीत लिखाण आहे तुमचे..राजकारणावर तर मस्तच आसूड मारताहो आपण.

By : हेमांगी
28/11/2023 9 : 58 : 36 PM

हाहाहा ,,पुरंदरे..खूपच खुसखुशीत लिखाण आहे तुमचे..राजकारणावर तर मस्तच आसूड मारताहो आपण.

By : हेमांगी
28/11/2023 9 : 58 : 36 PM

वाह, सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं. बोचरी वस्तुस्थिती.

By : अनघा वैद्य
29/11/2023 00 : 19 : 52 AM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article