चहाचा कप


माझं चहावर खूप प्रेम आहे. आहेच ... बहुतेक जणांना माहीतच आहे. पण आज मी हा फोटो "ह्या कप"चा काढला आहे. हा "कप" माझ्याकरता खूप खास आहे.

हा कप जवळपास माझ्याच वयाचा आहे. याबाबतची खात्रीशीर माहिती माझे आई-बाबाच देऊ शकतील खरंतर..

पण माझ्या आठवणीप्रमाणे ठाण्याच्या गोखले रोडवर आता जिथे मँगो नावाचं मोठं भव्यदिव्य दुकान उघडलेलं आहे, तिथेच फुटपाथवर एक आजोबा कप विकत होते. आणि माझ्या आईने हे कप अगदी impulsively विकत घेतले.

(तिला वेगवेगळे कप अती प्रिय आहेत. आम्ही आजही आईला चिडवतो की, आईचा प्राण कपात आहे)
आणि ह्या "कप"ला खरंतर "मग" म्हणायला हवं कारण त्याकाळी कप-बशी जास्त प्रचलित असत असे. आजकाल अगदी अर्धा लिटर दूध मावेल असे,मोठमोठाले, सुंदर सुंदर आकाराचे, अर्थपूर्ण संदेश लिहिलेले असे "मग" आपल्याला बाजारात सहज मिळतात. त्याकाळी असे हे "मग" जरा दुर्मिळ असायचे.

तर असे हे "मग" घेऊन आम्ही घरी आलो आणि यातून उन्हाळ्याच्या दिवसात रूह-अफजा आणि सब्जा घालून थंडगार दूध पिण्यासाठी आणि इतर काही खास प्रसंगी गरमागरम जायफळ घातलेली कॉफी पिण्यासाठी हे "मग" आम्ही वापरू लागलो.

थोडक्यात काय तर हे "मग" ठेवणीतले होते. आणि आईने इतके वर्ष जीवापाड ते जपले.

माझ्या लहानपणी तरी ठेवणीतल्या अशा काही खास वस्तू घरात नक्कीच होत्या. काही काचेच्या बश्या, काही कपडे, बेडवर घालण्याची चादर,दिवाणखान्यात लावण्याचे पडदे ... वगैरे वगैरे... या वस्तू जेव्हा कोणी पाहुणे येत तेव्हाच बाहेर निघत असत...

पण हे "कप/मग' ठेवणीतले असूनही, फक्त आम्हा चौघांसाठी.... रूह-अफजा घातलेल्या दुधासाठी आणि गरमागरम जायफळ घातलेल्या कॉफीसाठी कपाटातून बाहेर निघत असत... या "कप"ने आमच्या अनेक गप्पा ऐकलेल्या आहेत.... आई-बाबांनी गायलेलं गीत रामायण ऐकलं आहे.... माझ्या धाकट्या भावाचे पहिले वहिले घरगुती कार्यक्रमही या "कप"च्या अवतीभवती झाले आहेत बरं का...

तर असे "मग" आणि हा ठेवणीतल्या आठवणी आता माझ्याकडे आलेल्या आहेत.....
मला इतकं श्रीमंत झाल्यासारखं वाटतंय की काय सांगू......

तुमच्याही अशा ठेवणीतल्या काही वस्तू आणि वस्तूंमध्ये सामावलेल्या आठवणी नक्कीच असतील... मलाही त्या ऐकायच्या/वाचायच्या आहेत.....
तूर्तास....हा चहा पुन्हा गरम करून घेते.... गप्पांच्या नादात गार झाला.. तो पर्यंत तुमच्या साठवलेल्या आठवणी पाठवा

Comments

Niice, could feel the warmth of the tea through the write-up.

By : Sheela Bahadkar
13/06/2024 5 : 33 : 15 PM

Shashank some times you write so deep and other times it’s simple every day experience that touches my heart ❤️ This article.

By : Mohini kulkarni/chitre
19/06/2024 10 : 19 : 17 PM

छान!लेख वाचताना माझ्याही डोळ्यासमोर ठेवणीतल्या काही वस्तू तरळल्या.

By : योगिनी लोथे
15/07/2024 8 : 42 : 09 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article