जीवन समुपदेशन


सकाळचे साडेआठ वाजले होते. मी आणि उमा योगासने करत होतो. आमची आसने जवळजवळ संपत आली होती. शेवटाच्या ॐकारासाठी श्वास भरला, ओ केला आणि दारावरची घंटा वाजली. त्यामुळे म तसाच गिळून मी दार उघडण्यासाठी उठायचा प्रयत्न केला. परंतु वज्रासानातून उठताना माझा बर्म्युडामधे तळपाय अडकला. पण योगासनांमुळे हल्ली हीची चपळाई चांगलीच सुधारली आहे. त्यामुळे माझ्या आधी उठून तिने दरवाजा उघडला.

“अय्या, सदू भावजी! आज सकाळी सकाळी इकडे कुठे?” ही चित्कारली. माझा म गिळून झाला होताच, मी आता भरलेला श्वास देखील सोडला. आता पुढील पूर्ण दोन तासांची निश्चिंती होती. सदा उचापते माझा कॅालेजमित्र आहे. आम्ही दोघे एकदमच बीए पास झालो. नंतर मी नोकरीला लागलो. सदा मात्र अनेक प्रांतात आलटून पालटून उमेदवाऱ्या करत होता आणि अजूनही करतोच आहे. नशिबाने त्याला कसलाही आगापिछा नाही आणि लग्न करण्याची घोडचूक त्याने अजूनही केलेली नाही. किंबहुना तशी गरज पडलेली नाही. स्वारी तशी रंगेलच आहे.

“वहिनी, मी नाश्ता करायलाच आलो आहे,” काहीही न विचारायच्या आत सद्याने घोषणा करून टाकली. ”छानपैकी पोहे करा आणि वर किसलेला ओला नारळ, कोथिंबीर आणि लसणी शेव टाका.” सद्याने ऑर्डर दिली.
“हे बाकी बरं सांगितलंत भावजी! मी विचारच करत होते, की नाश्त्याला काय करु?” उमा दरवाजा बंद करत म्हणाली. मी बर्म्युडातून माझे पाउल बाहेर काढले आणि वज्रासनातून सुखासनात आलो. सद्या माझ्यासमोरच आरामखुर्चीत पसरला आणि आपले दोन्ही पाय उचलून समोरच्या टीपॅायवर ठेवले. मी जर काही संभाषण केले नाही तर हा शवासनात जाईल या भीतीने मी म्हणालो,
“कायरे, काही कामधंदा वगैरे नाही वाटतं तुला?” पण माझं तिरकं बोलणं आता सदूच्या अंगवळणी पडलं आहे.
“दहा वाजता काशीनाथच्या मिनी थिएटरमध्ये माझा सेमिनार आहे.”
“तुझा?सेमिनार?आणि कशावर?” मी जरा चकित होऊनच विचारले.
“करीयर आणि जीवन समुपदेशन.”

मी जमिनीवरच बसलो होतो म्हणून बरं नाहीतर खालीच पडलो असतो. या गृह्स्थाला कुठलीही नोकरी एक महिन्याच्या वर कधी टिकवता आली नव्हती, आणि हा इतरांना मार्गदर्शन करायला निघाला होता. मी हा विचार त्याला बोलून दाखवला.

“राजा, मी माझ्या अपयशातून खूप काही अनुभवलं, खूप काही शिकलो. आणि या अनुभवाचा लाभ इतरांना मिळावा हाच माझा शुद्ध हेतू आहे.”
“हा धंदा कधीपासून चालू केलास तू?”
“अरे, धंदा नको म्हणू रे, हे एक सामाजिक कार्य आहे. यातूनच एक मोठी चळवळ उभी राहणार आहे.” काही नाही तरी सदू एकदा बोलायला लागला की त्याचे तोंड धरणारा कुणी नाही.
“पण कुणी सुचवलं हे सर्व करायला तुला?”
“तुला तर माहिती आहे, सहा महिन्यापूर्वी अतिशय विशुद्ध हेतूने माझा मुद्दा पटविण्यासाठी मी कुंदाचा हात धरला. तिने हेडक्लार्क कडे तक्रार केली आणि माझी नोकरी गेली. तब्बल चव्वेचाळीस दिवस टिकवला होता मी हा जॉब. त्यानंतर मी ठरवलं, कुणाची चाकरी करायची नाही. मग मी स्वत:चा व्यासंग वाढवायचे ठरवले. तुमच्या घरासमोरची वाचाल तर वाचाल नावाची लायब्ररी जॉईन केली.” वास्तविक लायब्ररी चालविणारी मुलगी जरा दिसायला बरी होती म्हणून हे सभ्य गृहस्थ तिथे सभासद झाले होते.
“तिथे मला प्रो. उठाबस्की उमजला.”
“आता हा कोण?”
“अरे उक्रेनाचा एक थोर लेखक आहे. त्याने सायकोलोजी ऑफ सायकोलोजी नावाचे एक पुस्तक लिहिले आहे रशियन भाषेत. ते मी वाचले.”
“पण तुला रशियन कुठे वाचता येते?”
“नित्या चोरगेने त्याचे केलेले मराठी भाषांतर मी वाचले. ते वाचून मी भारावून गेलो आणि तेव्हाच ठरवले की आता उरलेले जीवन समाजकार्याला वाहून टाकायचे. आणि माझ्या नशिबाने मला मंदा भेटली.” गारुडी जसा आपल्या पोतडीतून एकेक साप बाहेर काढतो, तसा हा सदू आपल्या गोष्टीत नवनवीन पात्रे आणत असतो.

“आता ही मंदा कोण?”
“तुला मंदा माहित नाही? मंदा म्हणजे माझ्या आयुष्याच्या तिमिरात लागलेला मंद मंदादीप आहे.”
“तुला नंदादीप म्हणायचे आहे का?”
“तेच ते. तिने माझ्या आयुष्याला एक वेगळी दिशा दिली.”
“असे तू गेल्या एकोणीस मुलींबद्धल म्हणाला होतास.”
“पण हे फायनल आहे.”
“हे पण तू म्हणाला होतास.”
“मंदाने मला मार्ग दाखवला. प्रो. उठाबस्कीने दिशानिर्देश केला. आता याचा उपयोग करून मी समाजाला मार्ग दाखवणार.”

मी माझ्या सुखासनातून सदूकडे नीट पहिले. ह्याच्यात भलताच बदल झालेला होता. नेहमी दोन-चार दिवस आंघोळ न करणारा, दाढीचे खुंट वाढलेला, ज्या कपड्यात झोपला होता तेच घालून आला आहे की काय असे वाटणारा सदू आज गुळगुळीत दाढी करून केस विंचरून, सुटाबुटात अवतीर्ण झाला होता.

उमा पोहे घेऊन आल्यामुळे घरात शांतता पसरली. नंतर थोडा वेळ फक्त चमच्यांचे आवाज येत होते.
“वहिनी, तुमच्या हाताच्या पोह्यांची बातच निराळी आहे.” आपली बशी रिकामी करत सदू उद्गारला. ”आता फक्कड चहा होऊन जाउद्या.” वाहिनी फक्कड चहा करायला आत गेल्या.

“पण तू सेमिनारमध्ये करतोस काय?”
“मी उठाबस्कीची तत्वे वापरून मी निरुपण करतो.”
“कसले रोपण करतो?”
“अरे म्हणजे मानसशास्त्रीय मार्गदर्शन करतो.”
“म्हणजे?”
“तू एक काम कर. वहिनींना घेऊन ये सेमिनार ऐकायला. पाचशे रुपये प्रवेशिका आहे, पण तू माझा मित्र आहेस म्हणून तुला फुकट पास देतोय मी.”
“पाचशे रुपये तिकीट काढून लोकं तुझे भाषण ऐकायला येतात?” मी अचंबित होऊन म्हणालो.
“मी आधी सुरवातीला प्रवेश विनामूल्य अशी जाहिरात केली. पण कुणीच आले नाही. मग मी पाचशे, शंभर आणि विद्यार्थ्यांकरिता पंच्याहत्तर असे दर लावले आणि सेमिनार हाउसफुल झाले.” हा मार्केटिंगचा फंडा मला नवीनच होता. “तिकीट लावले की लोकांना वाटते की नक्की काहीतरी चांगले असणार. आता पुढील वेळेला पूर्ण हजार सीट्सचे सभागृह बुक करणार आहे.”

पावणेदहा वाजता आम्ही सभागृहावर पोहोचलो. बाहेर बऱ्यापैकी गर्दी होती. दरवाज्यावर “मानसशास्त्राचे मानसशास्त्र”, प्रा. सदाभाऊ उचापते, बीए, असा फलक होता. त्यावर सहा बाय तीनचा सदूचा फोटो छापलेला होता. आम्ही सभागृहात शिरलो. सदूने मला आणि उमाला पहिल्या रांगेत मधल्या दोन खुर्च्यांवर बसवले आणि स्वत: विंगेत शिरला. थोड्याच वेळात सभागृह पूर्ण भरले. तुम्हाला सांगतो, वय वर्ष सात ते सत्तर, या मधील सर्व स्त्री-पुरुष तिथे आलेले होते. कॉलेजमधील तरुणतरुणी पण बऱ्याच दिसत होत्या. ह्या सद्याला ऐकायला एव्हढे लोक येतील यावर माझा विश्वासच बसत नव्हता.

लवकरच पडदा वर गेला आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. स्टेजवर मागे स्क्रीनवर एका दाढीवाल्याचे चित्र प्रोजेक्ट केले होते. हाच तो प्रो. उठाबस्की होता तर! खाली टेबलावर सदूच्या आईवडीलांचा हार घातलेला फोटो होता. डाव्या बाजूला एक उंच समई ठेवलेली होती. थोड्या वेळाने एका स्त्रीने स्टेजवर प्रवेश केला. हीच ती मंदा! बरोबर सदू स्टेजवर आला. टाळ्यांचा कडकडाट झाला. मंदाने समई पेटवली. मग सदूने माईकचा ताबा घेतला.

“फ्रेंड्स, वी विल डू ध्याणम फोर टू मिनिट्स!”

सर्व जण दोन मिनिटे शांत उभे राहिले. सदू एका वेळेला एकापेक्षा जास्ती वाक्य इंग्रजीत बोलू शकत नाही. त्यामुळे तो मराठीत सुरु झाला.

त्याने सुरुवात प्रो. उठाबस्कीच्या दहा सिद्धांतापासून केली. पहिलाच सिद्धांत म्हणजे दुसऱ्याचे ऐकू नका, मनाला पटेल ते करा. आता हे सांगायला सदू किंवा उठाबस्कीची काय गरज आहे हे मला समजले नाही.

दुसरा म्हणजे आपल्याला पाहिजे तेच करा. इतर सांगतील ते करू नका. आता पहिल्या आणि दुसऱ्या सिद्धांतात काय फरक आहे हेच मला कळेना. यापुढील तीन ते नऊ सिद्धांत थोड्याफार फरकाने हेच सांगत होते. दहावा सिद्धांत मात्र पूर्णपणे वेगळा होता. तो म्हणजे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!

सदूच्या प्रत्येक वाक्याला टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होत होता. दहा सिद्धांत संपल्यावर माझ्या शर्टाची बाही खेचत उमा माझ्या कानात कुजबुजली,” अहो, ती मंदाची साडी किती गोड आहे. मला अशीच हवी आहे.”

एव्हढे करियर समुपदेशन झाल्यावर सदू जीवन मार्गदर्शनाकडे वळला. आता त्याच्या भाषणात नवीन चैतन्य आले होते. त्याने आपला कोट काढून टाकला, शर्टाच्या बाह्या वर केल्या आणि परत भाषणाला सुरुवात केली.
“मित्रांनो, प्रत्येकाला जीवनात एक गुरु, दिशादर्शक, मेंटॅार आवश्यक आहे, जो पदोपदी आपल्याला हात धरून दिशा दाखवेल.” यावेळेला त्याने सिमबॅालीझम म्हणून मंदाचा हात हातात घेतला होता. “अय्या, किती रोमँटिक!”, उमा माझ्या कानात कुजबुजली. जणू काही पडद्यावर हिंदी सिनेमा चालू होता. सर्व प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन हा रोमान्स पहात होते. शेवटी भानावर येऊन सदूने प्रो. उठाबस्कींकडे परत नजर वळवली.

“प्रो. उठाबस्की म्हणतात, आयुष्यात तुम्ही काय करावे, कसे वागावे, हे तुम्हाला तुमचा मार्गदर्शक सांगेल. तुम्ही फक्त त्याला फॉलो करा.” परत सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. मी मात्र संभ्रमात पडलो होतो. हे म्हणजे वेधशाळेच्या अंदाजासारखे झाले होते. कुलाबा वेधशाळा म्हणते मुसळधार पाऊस पडेल, तर सांताक्रूझ वेधशाळेच्या मते मुसळधार ऊन पडेल. शेवटी स्वत:चे ऐकायचे की मार्गदर्शकाचे?

शेवटी सदू म्हणाला, “ मानसशास्त्राचे मानसशास्त्र हेच सांगते, ऐकावे जनाचे, करावे मनाचे, अथवा मार्गदर्शकाला फॉलो करा. धन्यवाद, शुभरात्री!”

सकाळी शुभरात्री म्हणणारा हा पहिला आणि शेवटचाच वक्ता असावा कारण भाषण संपले तेव्हा सकाळचे साडेअकरा वाजले होते. पाच मिनिटे फक्त टाळ्या वाजत होत्या.

सभागृह रिकामे झाल्यावर मी सद्याला गाठले.
“अरे, हा काय चावटपणा लावला आहेस तू? तू काय वाटेल ते काय बोलतोस? कोण हा उठाबस्की? आणि लोकं ऐकून कसे घेतात तुझे?”
“हेच तर खरे मानसशास्त्र आहे. एकदा लोकांनी एखादी गोष्ट खरेदी केली, की मग ती ते वापरतातच. टाकून नाही देत! आणि आपण खरेदी करून चूक केली हे कधीच कबूल करत नाहीत. शेवटी कसं आहे, आयुष्यात प्रत्येकाला प्रॉब्लेम्स असतात. आणि सर्व मार्ग खुंटले की तो रस्त्याच्या कडेला बसलेल्या पोपटवाल्या ज्योतिषाकडे जातो. फक्त माझ्याकडे पोपट नाही, पोपटपंची आहे, एव्हढाच काय तो फरक आहे.
आता असे बघ, हाच शो मी मोठ्या सभागृहात केला तर दोन तासाला तीन लाखांचा गल्ला कुठेच जात नाही. म्हणजे चार रविवारात मी बारा लाख कमावेन. म्हणजे खर्च जाऊन वर्षाला एक कोटी रुपये! अजून काय हवं आयुष्यात? शिवाय माझ्याकडे अजूनही काही मार्ग आहेत. मी आता ऑनलाईन वर्ग पण चालू करणार आहे. लोकं घरी बसून ऐकतील आणि मी घरी बसून पैसे कमवेन. म्हणतात ना, तूच आहेस आपल्या जीवनाचा शिल्पकार!”

Comments

दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिए पु.ल.देशपांड्यांच्या व्यक्ती आणि वल्ली मध्ये हे पात्र अगदी चपखल बसेल.

By : Pratibha Tarabadkar
26/10/2023 11 : 43 : 37 AM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article