माझा स्तंभ १०-०२-२०२४


माझा स्तंभ १०-०२-२०२४

“बाबा”, दहा वर्षांचा मुलगा वडिलांना सांगत होता, “मला एक बंदुक हवी आहे, खरीखुरी.”
“बंदुक? कशासाठी?”
“मला या घरात सुरक्षित वाटत नाही.”
“का?”
“उद्या मी तुमच्या मालमत्तेत माझा वाटा मागीन म्हणून मला तुम्ही मारले तर?”

हा संवाद जरी काल्पनिक असला तरी अगदीच असंभव आहे का? सध्याची सामाजिक परिस्थिती पाहून भविष्यात असे होणारच नाही असे नाही.

सध्या टीव्ही आणि सोशल मेडिया वर जी काही लाईव्ह खुनाखुनी चालू आहे त्याचा लहान मुलांवर काय परिणाम होऊ शकतो याचा सध्या कुणी विचारही करत नाही. या सर्व माध्यमांमध्ये अशा रक्तरंजीत बातम्या सर्वात प्रथम कोण दाखवतो याची चढाओढ चालू आहे. एकदा नाही, दोनदा नाही, दिवसभर तेचतेच परत दाखवले जात आहे. एखाद्याचा मृत्यू जिवंत दाखवणे यात काय भूषण आहे तेच मला समजत नाही. टीआरपी साठी काहीही कराल! एखादा सेलेब्रिटी हॉस्पिटलमध्ये दाखल झाला की मरायच्या आधीच हे त्याला मारून मोकळे होतात.

जमिनीच्या वादातून किंवा राजकीय वैमनस्यातून खून करणे अशा गोष्टी आधीही होत होत्या. पण आपल्या मिडीयाने आता या बातम्यांना तुमच्या थेट दिवाणखान्यात पोचवले आहे. आणि कुठल्याही गोष्टीचा राजकीय फायदा उठवायला सर्वच राजकीय पक्ष कायमच सज्ज असतात.

जमिनीच्या वादातून होणार्‍या भांडणांना खतपाणी घालायला आपली न्यायव्यवस्था तेव्हढीच कारणीभूत आहे. एखादा खटला लागला की ती केस वर्षानुवर्ष प्रलंबित राहते. दाद मागायची कुणाकडे?

गुन्हेगारीचे खरे कारण सामाजिक आणि आर्थिक विषमता हेच आहे. शिक्षणाचा अभाव हेही एक कारण आहे. सामाजिक विषमता आपणच निर्माण केली आहे. जोपर्यंत माझी जात श्रेष्ठ हा विचार मनातून जात नाही, समोरच्या व्यक्तीने आडनाव सांगितल्यावर हा कुठल्या जातीचा आहे हा विचार मनात आल्यावाचून रहात नाही तोपर्यंत ही विषमता अशीच राहणार आहे.

राजकारण्यांनी शिक्षणाचा खेळखंडोबा केलेला आहेच. जे उच्च शिक्षण घेऊ शकतात त्यांचा दर्जा घसरत चालला आहे. आयआयटी मधील टॅापर्स परदेशी जातात आणि इथे जे राहतात त्यांना बेसिक नॉलेज देखील नसते. विज्ञान शाखेतील पदवीधरांना आपल्या घरात येणारा विद्युत पुरवठा किती व्होल्टसचा असतो, AC असतो का DC हे पण माहित नसते. अनेक विज्ञान संस्थेत भरती होणार्‍या विद्यार्थ्यांचा दर्जा सुमार आहे. अनेकांची काम करण्याची तयारी नसते. हे चित्र बदलायला हवे आहे, पण लक्षात कोण घेतो???

पाचशे रुपयांच्या नोटेवर गांधी ऐवजी रामाचे चित्र येणार आहे असा मेसेज राममंदिर सोहोळ्याच्या आधी मला रामभक्तांकडून आला होता. अजून नोटा काही आलेल्या नाहीत. येतीलही कदाचित.

माझ्या मंद बुद्धीला काही प्रश्न उगाचच सतावत राहतात. रावणाला जर दहा तोंडे होती तर एक मध्ये, पाच एका बाजूला आणि चार दुसर्‍या बाजूला असली पाहिजेत. मग तो तोल कसा सांभाळत असेल? मग एकदा असाच तोल जाऊन त्याने सीतेचे हरण केले का? सध्या एकाच डोके असूनही नव्वद टक्के लोकांना डोक्याच्या वजनामुळे पाठीच्या मणक्याचे विकार होतात, मग रावणाला स्पॉन्डिलायटीस का झाला नाही?

नाही म्हटले तरी सोशल आणि इलेक्ट्रोनिक मिडियाचे काही फायदे आहेत. एखादी संध्याकाळ जर उदासवाणी वाटत असेल तर शरयू दातेने ती पंधरा-सोळा वर्षांची असताना सूर नवा ध्यास नवा मध्ये गायलेले अवघा रंग एक झाला, किंवा एक वर्षापूर्वी म्हटलेले सहेला रे ऐका. किंवा केतकी माटेगावकरने म्हटलेले अनंता तुला कोण पाहू शके ऐका. ऐकता ऐकता डोळे मिटले तरी मनात कुठेतरी उद्याची पहाट काहीतरी चांगले घेऊन येईल अशी आशा पल्लवित होत राहील. आणि अनंताकडे पाहण्यासाठी जेम्स वेब सारखे टेलिस्कोप बनत राहतीलच !

Comments

सोशल मीडिया वर काय वाचायचं, काय बघायचं याची निवड आपल्या हातात असते.वाईट गोष्टी लिहिल्या, दाखवल्या जातात तशाच चांगल्या बातम्याही असतात.

By : Pratibha Tarabadkar
10/02/2024 12 : 33 : 12 PM

पण हे मुलांना समजत नाही. बातम्या कशा टाळणार

By : Admin
10/02/2024 4 : 42 : 10 PM

Very good articulated article, really making us think what the future holds for us and our next generation. Kudos Sir.

By : Cyril David
10/02/2024 4 : 11 : 34 PM

अगदी खरं. जोपर्यंत आपणच अशा मालिका, चित्रपट बघणं बंद करणार नाही तोपर्यंत असच चालू रहाणार. पैशासाठी वाट्टेल ते करायला मन धजावत कसं कोण जाणे. कसली जीवघेणी हाव. पुढच्या पिढीला आपण काय देतोय याचा जराही विचार केला जात नाही. शेवटचा परिच्छेद:- अगदी खरं. 😍

By : प्रज्ञाक्षर ????
11/02/2024 4 : 28 : 22 PM

अगदीच निराशाजनक चित्र नाहिये.

By : हेमांगी प्रदीप कुलकर्णी
15/02/2024 12 : 52 : 44 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article