बत्ती गुल्ल
बत्ती गुल्ल
शशांक पुरंदरे
नमस्कार. मी गिरीजा बावळे आपले तुमच्या महाराष्ट्र वाहिनीवर आपले स्वागत करते. आजच्या ठळक बातम्या. बत्ती गुल्ल झाल्यामुळे पुसट दिसताहेत. आत्ताच हाती आलेल्या बातमीप्रमाणे पूर्ण मुंबईत बत्ती गुल्ल झाली आहे. आम्ही वास्तविक सकाळी सातचे बातमीपत्र दिवसभर परत परत दाखवत असतो. मी येताना आणलेली भाजी निवडायाला घेतली आणि ब्रेकिंग न्यूज आली. त्यामुळे परत घाईने मेकप करून यायला लागलं. आमचे प्रतिनिधी मुंबईत सर्व ठिकाणी आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊ काय स्थिती आहे ते.
आमचे प्रतिनिधी महेश कडू महावितरणच्या कार्यालयात आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया की नक्की काय समस्या आहे. महेश?
गिरीजा, इथे महावितरणाच्या कार्यालयात अंधार असल्यामुळे आम्ही दृश्य दाखवू शकत नाही. आपण येथील अधिकारी देवभक्त अंधारे यांना विचारुया, साहेब, काय झालंय?
काही नाही, अचानक मागणी वाढल्याने पुरवठा खंडित झाला आहे.
पण मागणी का वाढली?
उकाडा वाढल्यामुळे हे एक कारण आहे. काही अडाणी लोक म्हणतात की रिलायंसने उद्योग वाढवल्याने असे झाले आहे. काही जण टाटा समूहाला दोष देत आहेत की त्यांनी एअर इंडियाच्या विमानांकडे वीज वळविल्यामुळे असे झाले. अशोक चव्हाण बीजेपीमध्ये आल्यावर आदर्श इमारतीवर रोषणाई केल्यामुळे असे झाले असेही काही जण म्हणतात. पण या सर्व वदंता आहेत.
पण आता वीज परत कधी येईल?
पावसाला सुरुवात झाली की, असे मी म्हणणार नाही. पण दहा मिनिटे ते दहा तास इतका वेळ लागू शकतो.
धन्यवाद अंधारे साहेब.
गिरीजा, मी महेश कडू, कॅमेरामन शिवाय, महाराष्ट्र माझा साठी.
धन्यवाद महेश आता आपण प्रसाद यांच्याकडे जाउया.
प्रसाद हिरवे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर उभे आहेत. प्रसाद काय बातमी आहे?
.........
माझा आवाज येतोय प्रसाद?
........
प्रसादपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. आपण श्रीपद काळे, जे दोन नंबर प्लॅटफॅार्मवर उभे आहेत त्यांच्याशी बोलूया.
गिरीजा, अंधारात काही दिसत नाहीये. पण आवाज येतोय. मघाशी गाडीत चढायला गेलो आणि रुळांवर पडलो. प्लॅटफॅार्मवर गाडी नाही हे लक्षातच आले नाही. रेल्वेने घोषणा केली आहे की वीज पुरवठा खंडित झाल्याने पुढील सुचना मिळेपर्यंत गाड्यांची येजा आणि जाये थांबविण्यात आली आहे. वीज पुरवठा पूर्ववत होण्यासाठी दहा मिनिटे ते दहा तास एव्हढा वेळ लागेल. तोपर्यंत प्रवाश्यांना आपल्या तिकिटावर रुळातून चालत पुढील स्टेशनावर जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र ठाण्याला जाणार्यांनी एक नंबर रुळ तर मुंबईकडे येणार्यांनी दोन नंबरचा रूळ वापरावा. जलद प्रवाशांनी तीन व चार नंबरच्या रुळावरून चालावे.
धन्यवाद श्रीपाद. मी लवकरच आपल्याकडे परत येते. तोपर्यंत प्लॅटफॅार्मवरच उभे रहा.
माझी सहकारी स्वप्ना विमानतळावर आहे. स्वप्ना काय सांगशील?
गिरीजा, येथील आंतरराष्ट्रीय वाहतूक सुरळीत चालू आहे. पण एअर इंडियाच्या विमानात वीज नसल्यामुळे त्यांची वाहतूक बंद आहे.
कधीपर्यंत वीज अपेक्षित आहे.?
वीजेचे टँकर मागवले आहेत.
धन्यवाद स्वप्ना सविस्तर माहितीबध्दल.
आपण घेत आहोत एक छोटासा ब्रेक. पाच मिनिटे काही दिसणार नाही वीज गेल्यामुळे. पण कुठेही जाऊ नका. ब्रेकनंतर ऐकूया सुप्रसिद्ध सर्जन डॉ. पायमोडे काय म्हणताहेत ते.
ब्रेकनंतर सर्वांचे स्वागत. आपण पहाता आहात तुमचा महाराष्ट्र. फोनवर आहेत डॉ. पायमोडे.
नमस्कार डॉ. काय सांगाल वीज गेल्यावर तुम्हाला काय प्रॅाब्लेम आले?
मी एका पेशंटच्या पायाला प्लॅस्टर घालताना वीज गेली. मग अंधारातच
प्लॅस्टर घातले. त्या गडबडीत आयफोन सोळा प्लॅस्टरमधे राहीला. त्यामुळे त्याच्या पायाला कान लावून तुमच्याशी बोलावे लागत आहे.
पण आयफोन सोळा तर अजून आलेला नाही.
माझा आयफोन पंधरा आणि पेशंटचा साधा आयफोन म्हणून मी सोळा म्हटलं. अजून चार पेशंट बाकी आहेत. पण आता प्लॅस्टर घालू शकत नाही.
धन्यवाद डॉ. पायमोडे. लवकरच वीज येईल व आपला फोन परत मिळेल अशी अशा करूया.
यानंतर आपण विरोधी पक्षनेते मा. गजानन बावरे यांच्याशी बोलणार आहोत. ते सध्या मंत्रालयात लिफ्टमध्ये अडकले आहेत.
बावरें सर, माझा आवाज ऐकू येतोय?
हो, बोला.
ही जी बत्ती गुल्ल झाली आहे त्याबध्दल आपल्याला काय म्हणायचे आहे?
सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला...
महोदय, आत्ता विषयी बोला.
पण आज सारखी स्थिती कधी झाली नव्हती. हे सत्ताधारी पक्षाचे कारस्थान आहे. मला मुद्दाम अडकवण्यात आले आहे.
पण पूर्ण शहराची वीज गेली आहे.
हे सर्व मुद्दाम ....
माफ करा, आपला बावरे साहेबांशी संपर्क तुटला आहे.
आत्ताच बातमी हाती आली आहे की वीज गेली तेव्हा मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि आपले बिनखात्याचे राज्यमंत्री श्री राजू गाडी गाडी खेळत होते, वीज गेल्यावर त्यांनी भोकाड पसरले. म्हणून त्यांना तातडीने मेट्रोचे नवीन इंजीन भेट देण्यात आले आहे. ते आता परत खेळायला लागले आहेत. वीज आल्यावर त्यांना आरेच्या जंगलात फिरायला नेण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन आत्ताच आश्वासन दिले आहे की वीज लवकरच परत येईल. भविष्यात असा त्रास होऊ नये म्हणून त्यांनी केंद्राकडे वीज आयात करण्याची मागणी केली आहे.
मलबार हिल वरील लोकांच्या प्रश्नाकडे पत्रकारांनी त्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी मी बाराव्या मजल्यावर रहात असल्यामुळे वरच्या मजल्यांना वीज मिळत नाही हे मला माहित नव्हते अशी त्यांनी कबुली दिली. कमी दाबामुळे वरच्या मजल्यावर वीज चढत नसावी. त्यांनी मुलाच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती नेमली असून दोन महिन्यात अहवाल मागवला आहे. गरज पडल्यास तेराव्या मजल्यावर नवीन पंपिंग स्टेशन बसविण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.
आत्ताच हाती आलेल्या बातमीवरून मुंबई शहरात वीजपुरवठा पूर्ववत झाला आहे. म्हणजे लोडशेडिंग वगळता इतर भागात वीज आली आहे. तेव्हा हे बातमीपत्र इथेच संपत आहे. मी परत भाजी निवडायला जात आहे. पुन्हा भेटू उद्या सात वाजता वीज असेल तर. तोपर्यंत बघत रहा, तुमचा महाराष्ट्र!



Comments
फार छान. वीजेचा टॅंकर, आय फोन १५ अधिक साधा मिळून आय फोन १६, चालणार्याचे जाण्या येण्याचे १व २ व फास्ट प्लॅटफाॅर्म नंबर ४, इ. कल्पना भन्नाट. असेच लिहीत रहा. Best Luck.
By : Shirish joshi
अगदी खुसखुशीत लिखाण. मजा आली वाचून. हाहाहा
By : हेमांगी प्रदीप कुलकर्णी