प्रेम हे माझे तुझे


प्रेम हे माझे तुझे

शशांक पुरंदरे

सकाळी सात वाजता मानसीचा फोन वाजला. मानसी वॅाशरुममधे होती म्हणून अभयने उचलला.
“हॅलो?”
“हॅलो,….भैया?”
“स्वाती? एव्हढ्या सकाळी फोन? आणि तो पण मानसीला?सर्व ठीक??”
“हो मस्त! आणि मानसी आता माझी मैत्रीण आहे. मी तिला कधीही फोन करु शकते!”
“म्हणजे माझा पत्ता कट!”
“पुराने आशिक अब पुराने हो गए है.”

माझ्या दृष्टीने आता म्हणजे अवघड जागी दुखणं झालं होतं. बायको आणि जुना क्रश मैत्रिणी होणे यापेक्षा कठीण बाब असू शकत नाही. तीन महिन्यांपूर्वी स्वाती इतक्या वर्षांनी शिवनेरीत परत भेटते काय, आणि ती आणि मानसी चांगल्या मैत्रिणी होतात काय, सर्वच अघटित होते.

“भैया, कुठे हरवला आहेस? जुने दिवस आठवताहेत की काय?” असे म्हणून स्वाती जोरजोरात हसू लागली.
“ऐ बये, हसायला काय झाले? माझा जरा विचार कर. सकाळी सकाळी काय काम होतं?”
“ते मी मनूला सांगेन. तुझा काय संबंध?”
“तुझी मनू वॅाशरुम मधे आहे.”
“ठीक आहे. तोपर्यंत आपण गप्पा मारू.”
“मला वेळ नाहीये. ॲाफिसला जायचंय.”
“कॅालेजमधे असताना किती छान गप्पा मारायचास. आता काय झाले?”
“आता….. जाऊदे. मी मानसीला बोलावतो.”
“नको. तिला मला नंतर फोन करायला सांग. म्हणावे आज खरेदी करायला जाऊया. पूजा आणि रेवा पण येणार आहेत.”

रेवा अभय मानसीची मुलगी होती. पूजा आणि रेवा साधारण एकाच वयाच्या होत्या. रेवा नुकतीच पुण्याच्या कॅालेजातून एमबीए करुन परत आली होती. ती स्वातीच्याच हॅंडीक्राफ्ट बिझीनेस मधे जॅाब करत होती. पूजा आणि रेवा देखील चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या. दोन्ही फॅमिली हल्ली वरचेवर भेटू लागल्या होत्या. मानसी आणि स्वातीमधे नक्की काहीतरी शिजत होते. पण काय त्याचा पत्ता मला मात्र लागत नव्हता. रेवा आणि मानसी देखील एक अक्षरही बोलला तयार नव्हत्या.

“आज काही विशेष?”
“हो, विशेषच आहे. संध्याकाळी आपण माझ्याकडे डिनरला भेटू तेव्हा सविस्तर बोलूया.”
“संध्याकाळी डिनर? हे कधी ठरलं? मला या घरात कोणी काही सांगेल तर शपथ!” मी उद्वेगाने म्हणालो.
“संध्याकाळी बोलू. चल ठेवते.” म्हणून स्वातीने फोन कट केला.

मानसी बाहेर आल्यावर मी तिला स्वातीचा फोन आल्याचे सांगितले.
“तू माझा फोन का घेतलास? या घरात व्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला होत आहे.” मानसी लटक्या रागावले म्हणाली.
“आणि तू माझे फोन घेतेस तेव्हा?”
“नवऱ्याचा पाय कुठे घसरू नये म्हणून लक्ष ठेवावे लागते.”
“मी पण तेच करतोय.”
“काय म्हणत होती तुझी एक्स?”
“मला मिस करते आहे म्हणाली!”
“मोठा आला आशिक!” असे म्हणून मानसीने एक छद्मी हास्य केले.
“तुमच्या चौघींमधे काय चाललंय ते मला कळेल का?”
“वो अंदरकी बात है!”
“आणि ही संध्याकळच्या डिनरची काय भानगड आहे? आणि मला कधी कळवणार होता आपण? माझे पण काही शेड्यूलस असू शकतात.”
“पण एक्स बरोबरच्या डिनरसाठी तू ॲडजस्ट करशील ना?” मानसीने मला डिवचले.
“हो, पण त्यासाठी कबाबमधे हड्डी नसावी.”
“नसेल, सर्व बोनलेसच मागवले आहे.”
“यू आर इंपॅासिबल!” असे म्हणून मी तिथून चालता झाला. गालातल्या गालात हसत मानसीने स्वातीला फोन लावला.

मी दिवसभर अस्वस्थ होता. काय चाललंय तेच मला उमजत नव्हते. त्यामुळे दिवसभर कामातही माझे लक्ष नव्हते.

संध्याकाळी सहा वाजता मी घरी आला. पाठोपाठ खरेदीच्या दहाबारा बॅगा घेऊन रेवा आणि मानसी हजर झाल्या. रेवा बॅगा घेऊन आत गेली.
“हे काय, तू तयार नाही झालास? एक्सकडे जेवायला जायचं म्हणजे काही खायचे काम नाही, तेही बायको बरोबर असताना!” मानसी परत सुरु झाली.
“पण कारण काय आहे ते तर सांगशील?”
“तिथे गेल्यावर समजेलच.”
“ठीक आहे, मी बर्म्युडा घालूनच येतो.”
“तुझी मर्जी!” असे म्हणून मानसी आत चालती झाली.

पंधरा मिनिटांत रेवा आणि मानसी तयार होऊन बाहेर आल्या. रेवाने गोल्डन एम्ब्रॅायडरी असलेला पांढरा शरारा घातला होता. साडेपाच फूट उंच रेवाला तो अतिशय शोभून दिसत होता. मानसीने गोल्डन कांजीवरम नेसली होती. दोघीही खूप छान दिसत होत्या. काहीतरी मोठे ओकेजन आहे हे मला जाणवले होते. मी देखील लाल बंदगळा घालून तयार होतो. एक शब्दही न बोलता मी दोघाींचे हात हातात घेतले आणि तिघे घराबाहेर पडले. जाता जाता मी मनसीच्या कानात पुटपुटलो, “छान दिसते आहेस.”
“मला ऐकू आलंय. मी कशी दिसतेय?” रेवाने विचारले. उत्तरादाखल मी तिचा गालगुच्चा घेतला.
“हळू, माझा मेकप बिघडेल.” रेवा चित्कारली.
“आपण तुला मुलगा बघायला जात नाही आहोत.”
“मी नेहमी तयार असते. वन नेव्हर नोज!”

बरोबर सात वाजता तिघेही स्वातीच्या घरी पोहोचले. दारातच स्वातीने आणि पूजाने त्यांचे स्वागत केले. स्वातीने पूजाने डिझाईन केलेली जांभळी डिझायनर साडी परिधान केली होती. ती नेहमीप्रमाणेच आकर्षक दिसत होती. पूजा तर आज विशेषच छान दिसत होती.

सर्व स्थानपन्न झाल्यावर मी सरळ मूळ विषयालाच हात घातला.
“ही सगळी काय भानगड आहे? मला कोणी काही सांगेल का?”
“हे काय, तुम्ही कशा आहात, छान दिसताय, वगैरे काहीच नाही?” स्वाती म्हणाली. “एक्स क्रशशी कोणी असं वागतं का?” यावर चौघीही मनमुराद हसल्या.
“सीरीयसली?” मी.
“अरे भैया, जरा गंमत केली.”
“जरा? गंमत??” मी आता चिडलोच.
“अरे हो हो, सांगते, जरा दमाने घे.”

पूजा आतून शीत पेयाचे ग्लासेस घेऊन आली. थंड पेयपान झाल्यावर मी जरा शांत झालो.

“खरंतर ही भानगडच आहे, फक्त ती पूजाने केली आहे.” स्वाती म्हणाली.
“आई, भानगड काय म्हणतेस? आकाशावर प्रेम आहे माझे! तुझी आणि भैयाची भानगड होती!” आता चिडायची पाळी पूजाची होती.
“कुणीतरी नीट सांगेल का? मी म्हणालो.

स्वातीने सुरुवात केली. ग्रॅजुएशन नंतर दोन वर्षातच स्वातीचे आईवडील गेले. सुदैवाने त्यांची घरची परिस्थिती चांगली होती. स्वतीने वडीलांचा हॅंडीक्राफ्टचा व्यवसाय पुढे वाढवला. त्यातच तिची आणि अनिरुद्धची ओळख झाली आणि त्यांनी लगेचच लग्न केले. परंतु पूजाच्या जन्मानंतर चार वर्षांच्या आतच अनिरुद्धचे अपघाती निधन झाले. स्वातीला बहिण, भाऊ किंवा जवळचे कोणीच नातेवाईक नव्हते. स्वातीनेच पूजाला वाढवले. सहा महिन्यांपूर्वी पूजा आणि आकाशची भेट झाली. लवकरच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. आकाश सॅाफ्टवेअर इंजिनीयर होता. घरची परिस्थिती देखील चांगली होती. स्वातीलाही काही प्रॅाब्लेम वाटत नव्हता. योगायोगाने स्वातीला शिवनेरीच्या प्रवासात अभय मानसी भेटले आणि त्यांची जवळीक निर्माण झाली. म्हणून स्वातीने मानसीला सर्वकाही सांगितले. गोष्टी फायनल करण्याआधी एकदा मानसी आणि अभयचे मत जाणून घेणे स्वातीला गरजेचे वाटले. म्हणून आज डिनरचा बेत योजला होता. आठ वाजता आकाश आणि त्याचा भाऊ आशिष जेवायला येणार होते.

“भैया, तुला आकाश नक्की आवडेल. प्लीज, प्लीज हो म्हण!” पूजा अभयला म्हणाली.
“हो म्हणायला मला थोडेच आकाश का कोण आहे त्याच्याशी लग्न करायचंय!” मी म्हटले.
“भैया!!!” पूजा म्हणाली.
“मेरिट मॅटर्स, यू नो? पण माझी एक अट आहे.”
“आम्हाला मान्य आहे.” सर्व एका सुरात ओरडले.
“आधी अट तर ऐका. आजपासून मला कोणीही भैया म्हटले तर डील कॅन्सल!!”
“ओके भैया!!” परत सर्वजण एका सुरात ओरडले.
“परत तेच!!”
“सॅारी अभयकाका!!” पूजा म्हणाली. “आणि जर रेवाला आशिष आवडला तरमग काय, एकावर एक फ्री !!!”

Comments

Is it a sort of ...... Continued in next part?

By : Swati Marathe
11/04/2025 7 : 14 : 36 PM

शेवटपर्यंत उत्कंठा वाढवत नेणारी कथा

By : Deepak Tikekar
11/04/2025 9 : 16 : 38 PM

गोष्ट छानच आहे. पण अपूर्ण वाटते. आकाश - आशिष नंतर पार्टीला येतात का? पुढे पसंती होते का? रेवा - आशिष चे नंतर काही घडते का? वगैरे प्रश्न अनुत्तरित राहतात. असो. तरीही गोष्ट छानच आहे. Next part must.

By : Sandeep V Nachane
12/04/2025 08 : 35 : 36 AM

वाह! वाचताना कधी गुंतले कळलेच नाही ... आणि हे काय ..संपली ?! अशी कशी संपवली...आमची उत्कंठा वाढवून संपेल कशी ! आताशी एक एपिसोड झालाय असे वाटत आहे .. मग वाट बघते पुढच्या भागांची..😊

By : Bhawana Kulkarni
12/04/2025 09 : 36 : 47 AM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article