चारच दिवस प्रेमाचे
चारच दिवस प्रेमाचे
शशांक पुरंदरे
“अरे, त्याने माझ्या सुमीचा हात धरला आणि सरळ Cafe Coffee Day मधे शिरला. त्याची हिम्मत कशी झाली हे करण्याची? तेही माझ्या डोळ्यादेखत?” हे बोलताना माधव नखशिखांत कापत होता.
“अरे कोण तो? कोण सुमी? आणि ही तुझी कधीपासून झाली? कालपरवा पर्यंत अशी कोणी सुमी अस्तित्वात आहे, आणि मला माहित नाही? माझा सख्खा मित्र ना तू? जॅाकीयारना आपण???” रवि वैतागून म्हणाला. हल्ली लंगोटीची जागा जॅाकीने घेतली होती.
“मी सांगणारच होतो तुला.”
“कधी?”
“वेळ कुठे मिळालाय?”
हे मात्र माधवचे बरोबर होते. आठ दिवस माधव गायब होता.
“कुठे होतास इतके दिवस?”
“सुमीच्या मागे!”
“ॲा !? हे बघ अर्धवट माहिती नकोय. पहिल्यापासून, अगदी जन्मापासून सांग.”
“सुमीची जन्मतारीख समजली नाही अजून!”
“मध्या !!! कथेचा जन्म!”
“सांगतो.” बाकावर बसत मध्या म्हणाला.
“मी बसमध्ये चढत होतो आणि ती उतरत होती. मी चुकून पुढच्या दरवाजाने चढत होतो. आमची डोके एकमेकांवर आपटली आणि नंतर ती मला हात देवून उठवत होती एव्हढंच मला आठवतंय. आणि तुला सांगतो, ‘ती पाहताच बाला कलिजा खलास झाला’.”
“जुन्या मराठी संगीत नाटकांसारखे पाच मिनिटांचे कथानक आणि नंतर अर्धा तास गाणे आपल्याला परवडणारे नाही. पुढे बोल.”
“नंतर मला समजले, की तिचे नाव सुमन गाडगीळ आहे. आपल्याच कॅालेजात कला विभागात दुसऱ्या वर्षाला आहे. उंची पाच फूट दोन इंच, गोरीपान, लांब केस, टपोरे डोळे आणि काय फिगर आहे तिची रे!”
“ती पण मोजलीस?”
“मोजायला कशाला हवी? दिसते ना ! सतत जीन्स टी शर्ट आणि स्पोर्ट्स शूज घालते आणि आपल्या मुलींच्या कॅालेज फूटबॅाल टीमची कॅप्टन आहे.”
“तरीच तुला दोन टेंगळं आलेली दिसताहेत.”
“थांबरे जरा! पहिले टेंगूळ बसमधे चढताना आले. दुसऱ्याची दुसरीच गंमत आहे.”
“बोला.” रवि हताश होऊन खाली बसला.
“तिची फूटबॅालची प्रॅक्टिस मॅच होती. मी तिच्या विरोधी टीमच्या गोलपोस्टच्या बाजूला उभा राहून मॅच बघत होतो.”
“तू? फूटबॅाल मॅच?? तुला काय समजतं त्यातलं?”
“मी तिच्याकडे पहात होतो. तिने जोरात लाथ मारली…!”
“तुला?”
“नाहीरे, बॅालला! पण तिचा नेम चुकला आणि बॅाल माझ्या कपाळावर आदळला. मी भानावर आलो तेव्हा तोंडावर पाणी शिंपडून ती मला उठवत होती. तेव्हा मला दुसरे टेंगूळ आले आणि मी परत तिच्या प्रेमात पडलो. मी आता फूटबॅाल जॅाईन करणार आणि सुमीलाच विचारणार मला शिकवशील का म्हणून !”
“मध्या, तुला साधी ॲक्टिव्हाला किक मारता येत नाही, तू काय फूटबॅाल खेळणार? बारावीत असताना त्या सुधीच्या मागे लागून ट्रेकिंग जॅाईन केलेस आणि हात मोडून घेतलास. सुधी हाताला लागली नाही ते वेगळंच! आणि हे बघ, ती गाडगीळ, तू गोडबोले, कसं वाटतंय ऐकायला? अगदी वरणभात खाल्यासारखं वाटतंय. वर्मा शर्मा ठीक आहे, मकईकी रोटी आणि सरसौंका साग! माधव सुमन म्हणजे पु ल देशपांड्याचं चौकोनी कुटुंब वाटतंय. तू सोड तिचा नाद! तुला नाही झेपणार.”
“नाही, मी आठ दिवस तिच्या मागे फिरतोय, तेव्हढ्यात हा व्हिलन मधे आला आणि तिला CCD मधे घेऊन गेला.”
“पण तू तिच्याशी एक शब्दही अजून बोललेला नाहीस आणि ती तुझी कधी झाली?”
“मी मनाने तिला वरले आहे. पण आता पुढे काय करावे ते समजत नाही.”
“हा तुझा नेहमीचाच प्रॅाब्लेम आहे. माझे ऐक, गुपचुप बी. कॅाम. करुन बाबांच्या कंपनीत लाग. ते म्हणतील तेव्हा म्हणतील तिच्याशी लग्न करुन आयुष्यभर सुखी रहा.”
————————
“त्या दिवशी गंमत झाली.” सुमन दीप्तीला सांगत होती. “मी बसमधून खाली उतरत होते. आपण नेहमी मधल्या दाराने वर चढतो आणि पुढील दाराने खाली उतरतो. पण एक महाशय पुढून वर चढू पहात होता. मी पण घाईत होते आणि त्याचेही लक्ष नव्हते. मग काय, आपटलो ना दोघे एकमेकांवर! मला काही झाले नाही कारण हेडर्स मारुन माझे कपाळ तयार झाले आहे पण समोरचे महाशय आडवे झाले की! मी उचलले त्याला तर छान टेंगूळ आले होते. खरी चूक त्याचीच होती पण मी सॅारी म्हणून पळाले.
“पण खरी गंमत पुढेच आहे! परवा माझी प्रक्टिस मॅच होती. मी दोन गोल केले आणि तिसरा शॅाट गोलपोस्टच्या जरा बाहेर गेला आणि एका प्रेक्षकाच्या कपाळावर लागला. मी पुढे जाऊन पाहिलं तर हाच प्राणी माझी मॅच, म्हणजे मलाच बघत होता. आता त्याला दोन टेंगळं आली होती.
“काल मी CCD मधे पम्याबरोबर कॅाफी प्यायला गेले तर हा समोर हजर! आता बोल!!!”
“म्हणजे दिलतोड क्रमांक सत्तावीस! तू अशी किती हृदये पायदळी तुडवणार आहेस?”
“तशी वस्तु चांगली आहे, पण गाडगीळ गोडबोले म्हणजे अगदीच मिळमिळीत वाटतं नाही?”
“अच्छा, म्हणजे रिसर्च करुन तुझ्या वेटिंग लिस्टवर आलापण!”
“हे बघ दीप्ती आपण एखाद्याला आवडलो तरी आपल्याला देखील ती व्यक्ति आवडेलच असं काही जरूरी नाही. आणि काही लोकांचं कसं रेल्वे स्टेशनवर उभ्या असलेल्या प्रवाशासारखं असतं. ही ट्रेन सुटली तर पुढची पकडू, मला हा तसा वाटला. आगे हर एक की किस्मत!”
———————————
कॅालेज जीवनातील नव्याण्णव टक्के प्रेमप्रकरणे ही अशीच असतात. त्यामुळे कथेत पुढे काय होणार हे चाणाक्ष वाचकांनी ओळखले असेलच. तेव्हा इथेच थांबतो.



Comments
cute.....
By : Pradnya Gore