कहाणी तब्बेतीची
कहाणी तब्बेतीची
शशांक पुरंदरे
“नेक्स्ट.” डॅाक्टरांनी स्वागतिकेला सांगितले.
श्री व सौ सहस्रबुद्धे, वय वर्षे पंचेचाळीस व चाळीस डॅाक्टरांच्या केबिनमधे शिरले.
“बसा. काय म्हणताहेत तुमचे रिपोर्टस्? तुम्ही सहा महिन्यांपूर्वी आला होता ते पण रिपोर्टस् आहेत ना? म्हणजे तुलना करायला बरं होईल.”
पुढील पाच मिनिटे डॅाक्टर रिपोर्ट पहात होते.
“ श्रीमती सहस्रबुद्धे, तुमचे रिपोर्ट ठीकठाक आहेत. अशीच तब्बेत ठेवा बाकी काही करायची गरज नाही. तुम्हाला तर एकही गोळी नाही. खूप छान. आता आपण श्री सहस्रबुद्धे यांच्याकडे वळूया. तुमचं वजन पाच किलोंनी वाढलंय. मी तुम्हाला जिम जॅाईन करायला सांगितले होते.”
“मी लगेच जिम जॅाईन केले होते.”
“पण मग काहीच फरक पडला नाही?” डॅाक्टरांनी आश्चर्याने विचारले.
“नाही ना!”
“का?”
“माहित नाही. आता एकदा प्रत्यक्ष जाऊनच पहातो काय भानगड आहे ती!”
“म्हणजे?! तुम्ही रोज जाऊन व्यायाम करत नाही!!!??? अहो, जिम जॅाईन करायचा म्हणजे तिथे जाऊन व्यायाम करायचा!”
“असं तुम्ही कुठे म्हणालात?” डॅाक्टरांनी (मनातल्या मनात) कपाळावर हात मारला.
“आठवड्यातून सहा दिवस रोज एक तास व्यायाम केला तर सहा महिन्यांनी वजन कमी होईल तुमचे! मला तुमची पूर्ण दिवसाची दिनचर्या सांगा बरं!”
“आता बघा, मी सकाळी चहाबरोबर चार मस्का खारी आणि तीन टोस्ट-“
“अहो दिनचर्या म्हणजे दिवसभर काय चरता ते नाही, काय करता ते सांगा.”
“मी सकाळी तसा लवकरच साडेसात पर्यंत उठतो, कारण बायको पावणे आठला जॅाबला जाते आणि मुले शाळेत जातात.”
“आणि तुम्ही कधी ॲाफिसला जाता?”
“८.५९ ला!”
“ॲां!”
“मी घरून काम करतो. मी इंशुरन्स हेल्थ सल्लागार आहे. ९ ते ५.३०, दोन टी ब्रेक्स आणि एक लंच ब्रेक. शनिवार रविवार सुट्टी!”
“सल्लागार, तुमच्या तब्बेतीचं काय?”
“मला काय झालंय? मी मजेत आहे, मस्त खातो पितो आणि मजा करतो. दर शनिवारी रात्री मित्रांबरोबर पार्टी करतो. पाच पेग घेऊनही काही होत नाही. आता बोला!”
“महाशय, जरा तुमचे रिपोर्ट पहा. सहा महिन्यांत वजन पाच किलोंनी वाढलंय. शुगर दोनशेच्या वर आहे. बीपी १६०-१००. ४० टक्के फॅटी लिव्हर. कोलेस्ट्रॅाल लिमिटच्या बाहेर आहे.”
“मग छानच आहे की! मोअर द मेरियर!”
“डॅाक्टर”, सौ सहस्रबुद्धे म्हणाल्या, “मी सांगून थकले. ऐकतच नाहीत.”
“मि सहस्रबुद्धे, तुम्ही चालता बोलता टाईमबॅांब आहात. कधीही फुटेल. आता मी सांगतो तसं करा उद्यापासून. सकाळी सहाला उठा.”
“डॅाक्टर, दोन वाजता झोपतो मी सिरीयल्स बघून. कसं आहे, काही गोष्टी मुलांसोबत नाही पाहू शकत.”
“सिरीयल्स बंद. रात्री दहा वाजता झोपत जा. सकाळी सात वाजता मॅर्निंग वॅाकला जा. पाऊण तास वॅाक झाला पाहिजे.”
“कठीण आहे. माझे पाय दुखतात आणि जरा चाललं की धाप लागते.”
“लागली नाही तरच नवल! सत्तर किलो वजन झालंय तुमचं. ते आधी कमी करा.”
“कसं?”
“तेच सांगतोय. चालून आल्यावर एक कप चहा आणि एक टोस्ट एव्हढांच नाश्ता करायचा. एक उकडलेलं अंड चालेल. टी ब्रेकमधे कुठलंही एक फळ खा.”
“लंचतरी नॅार्मल घ्यायचं ना?”
“जरा थांबा. लंचला एक पोळी, वाटीभर आमटी, वाटीभर भाजी आणि ताक. भात बंद!”
“एक पोळी! अहो मी रोज चार खातो.”
“म्हणूनच वजन वाढलंय. लंचनंतर काय करता?”
“अर्धा तास वामकुक्षी.”
“ती कॅंसल करा. अर्धा तास घरात वॅाक घ्या.”
“डॅाक्टर, हे सगळं केलं तर मी मरून जाईन!”
“हे नाही केलं तर नक्की मराल. काम संपल्यावर चणे कुरमुरे शेंगदाणे असं काहीतरी खा आणि चहा घेऊन जिमला जा. मग रात्री घरी येऊन सकाळ एव्हढेच जेवण करायचं, तासभर टीव्ही पहा हवंतर आणि दहाला झोपून जा. शनिवारी मित्रांना भेटा पण दारू बंद. मला एक महिन्यानंतर येऊन रिपोर्ट दाखवा.”
“या नंतर मी पुढचा महिना पाहिन असं वाटत नाही.”
सौ सहस्रबुद्धे गालातल्या गालात हसत होत्या. “डॅाक्टर, आता पहाच तुम्ही, एका महिन्यात यांचे वजन खाली आणते मी!”
महिन्यानंतर सहस्रबुद्धे परत आले तेव्हा त्यांचे सगळे पॅरामीटर खाली आले होते. वजन तीन किलोने कमी झाले होते. त्यांचे पाय दुखणे थांबले होते आणि चेहरा ताजतवाना दिसत होता.
“डॅाक्टर, तुम्ही माझे डोळे उघडले. मी माझ्या स्वतःवर आणि अप्रत्यक्षपणे माझ्या कुटुंबावर अत्याचार करत होतो. पण यापुढे नाही. मी तंदुरुस्त राहणारच !!!! डॅाक्टर, एक विचारू काय?”
“हो, विचारांना.”
“आपलं वय काय?”
“३५.”
“तुमचा हेल्थ इंशुरन्स आहे का?”
“अं…. नाही.”
“हा फॅार्म भरा. पन्नास लाखांचा इंशुरन्स अगदी स्वस्तात करुन देतो.”
डॅाक्टरांनी काही न बोलता निमूटपणे सही केली.
तळटीपः ही एक काल्पनिक गोष्ट आहे. आपल्यापैकी कुणी असे केले असेल तर ती केवळ दंतकथा असू शकेल.



Comments