नात्यांची गोष्ट : भाग १० : हिचे बाबा


“अशोक, उद्यापासून माझे बाबा आपल्याकडे रहायला येणार आहेत.” अदितीने बॉम्ब टाकला.
“ओह माय गॅाड!” माझ्या नकळत माझ्या तोंडातून उद्गार बाहेर पडले.
“अशोक!!!” अर्थातच अदिती.
“म्हणजे मला म्हणायचे होते की तुझे बाबा मला देवासारखे आहेत.”
“तू देवाला किती मानतोस ते मला माहित आहे आणि तुझी माझ्या बाबांबद्धलची मते पण मला चांगलीच परिचयाची आहेत.”
“पण का?”
“अरे असं काय करतोस, तुला मी आधीच सांगितले होते की आई आज वीणाबरोबर लेडीज स्पेशल हिमाचलच्या टूरला जाणार आहे. एक तासात आपल्याला तिला एअरपोर्ट वर सोडायला जायचंय.”
“कोण वीणा? मी पहिल्यांदाच हिचं नाव ऐकतोय.”
“अरे वीणावर्ल्ड बरोबर.”
“मग बाबा पण का नाही जात तिच्याबरोबर?”
“अरे माठ माणसा, लेडीज स्पेशल आहे, बाबा कसे जाऊ शकतील?”
“का नाही? खरतरं आईच तुमच्या घरातील कर्ता पुरुष आहे!”
“अशोक, हे जरा अती होतंय! आता येतोस का मी एकटी जाऊ?”

लग्न होऊन पंचवीस वर्षे झालेली असल्यामुळे या वाक्याचा अर्थ आता उठ आणि निघ असा होतो हे मला अर्थात लगेचच उमजले.

हिचे आईबाबा आमच्याच कॅाम्प्लेक्स मधे बाजूच्याच टॅावर मध्ये रहातात. मी मुकाट्याने हिच्या आईची आणि पर्यायाने हिच्या बाबांची बॅग गाडीच्या डिकीत टाकली. सासूबाईना एअरपोर्टवर सोडून आम्ही परत आलो. येताना अर्थातच हिचे बाबा देखील घरी आलेच.

हिचे बाबा म्हणजे आपल्या आधीच्या पिढीचा एक प्रातिनिधिक नमुना आहेत. गेल्या वर्षीच चाळीस वर्षांच्या सेवेनंतर ते डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॅालॅाजी मधून अकाउंट ऑफिसर म्हणून निवृत्त झाले. पण यांच्या अलिप्त वृत्तीमुळे टेक्नॅालॅाजीचा गंधदेखील स्वत:ला लागून दिला नाही. ऑफिसमध्ये कसे काम करत होते देव जाणे! पण या माणसाला, संगणक, मोबाईल स्मार्ट टीव्ही या गोष्ट अजिबात वापरता येत नाहीत. आम्ही सर्वांनी मिळून त्यांना शिकविण्याचा बराच प्रयत्न केला, पण सर्व पालथ्या घड्यावर पाणी! गाडी चालविण्याचा तर प्रश्नच येत नाही. भरपूर पैसे आहेत. त्यामुळे सगळीकडे ओला उबरने फिरतात. पण कॅब बुक करायला कोणीतरी लागते. ते देखील आत्ताआत्तापर्यंत पैसे वाचवायला बस आणि रिक्षानेच फिरत होते. पण आता स्वत:ला अपग्रेड केले आहे. मी गरिबीतून वर आलो आहे, पैश्याची तुम्हा लोकाना किंमतच नाही, हेच पालुपद कायम चालू असते. वास्तविक एकुलती एक मुलगी आहे, काहीही जबाबदाऱ्या नाहीत. एखादा मजेत राहिला असता. पण नाही. आमच्या सासूबाई एकदम याच्या विरुद्ध आहेत. सरकारी बँकेत ब्रँच मॅनेजर म्हणून काम करतात. स्वत:ची कार स्वत:च चालावितात. पण बायको बँकेत असूनही सासरेबुवांचा बँकेवर विश्वास नाही. नोटबंदीच्या वेळी यांच्या घरात कुठेकुठे ठेवलेली दोन लाखांची कॅश बदलून घेताना आमचा दम निघाला होता.

रात्री सर्व स्थिरस्थावर झाल्यावर मी ब्लॅक लेबलची बाटली काढून दोन लार्ज पेग बनवले. या बाबतीत मात्र बाबांचा हात धरणारा कोणी नाही. अजूनही तीनचार घेऊन यांना ढिम्म काही होत नाही.
“अरे अशोक,” पहिला सिप घेताघेताच बाबा म्हणाले,” हा माझा आयॅपड जरा चालू करून देरे. एखादा इंग्रजी सिनेमा बघेन म्हणतो.”

या बाबतीत मात्र बाबांना मी शंभर मार्क देतो. त्यांना माझ्या एव्हढीच फिक्शन वाचण्याची आणि बघण्याची आवड आहे. आम्ही दोघेही एखादे पुस्तक एका रात्रीत संपवू शकतो किंवा एखादी वेब सिरीज कंटाळा येईपर्यंत पाहू शकतो.

माझ्या अपेक्षेप्रमाणे आयपॅड पूर्ण डिस्चार्ज झालेला होता. आम्ही खूप उत्साहाने बाबांना त्यांच्या साठाव्या वाढदिवसाला आयपॅड घेऊन दिला होता आणि कसा वापरायचा ते पण शिकवले होते. त्यानंतर चेक करण्याकरता म्हणून मी त्यांना व्हिडिओ कॉल लावला. मला त्यांचा आवाज येत होता पण फक्त समोरची भिंत दिसत होती. ते फ्रंट कॅमेरा सिलेक्ट करायलाच विसरले होते. त्यांना सिम, वायफाय या कशाचा गंधही नव्हता आणि कितीतरी वेळा सांगूनही त्यांच्या ते लक्षातच येत नव्हते.

“बाबा, मी चालू करून देतो, पण वेळ लागेल. आयपॅड पूर्ण डिस्चार्ज झालेला आहे.”
“अरे हो, मी चार्जिंगला लावला होता फक्त स्वीच ऑन करायला विसरलो.” यांना चार्जिंग कसे करतात हे अर्थातच माहित नव्हते.
“होत असं कधीकधी. रात्री बघा आता.”
“व्हिस्की बाकी छान आहे. बरं, उद्या तुला जरा वेळ आहे का?” हे ऐकून माझ्या पोटात गोळा आला.
“का हो?” मी नाईलाजाने विचारले. जावई पडलो ना!
“अरे माझी दोनतीन काम आहेत बँकेत. तुला घेऊन जाईन म्हणत होतो बरोबर.”
“मी माझा ड्रायव्हर देतो ना तुम्हाला. गाडी घेऊन जा.” मी बाबांच्य कचाट्यातून निसटण्याचा एक प्रयत्न करून बघितला.

“अरे मला बँकेतलं फारसे कळत नाही.” एक अकाउंट ऑफिसर मला सांगत होते, ”तू असशील तर कामे पटकन होतील.” पासबुक भरून आणणे, नवीन चेकबुक घेणे असल्या कामात काय अवघड होते? पण नाही. मी हवाच.

“बाबा, तुमची सर्व कामे ऑनलाईन घरी बसल्या बसल्या होतील. मी आत्ता करून देतो.” मी एक शेवटचा प्रयत्न करून पाहिला.
“पण मी ऑनलाईन बँकिंग चालू केलेले नाही. हल्ली खूप फसवाफसवी चालते त्यात म्हणे. शिवाय माझे खाते सहकारी बँकेत आहे. अर्धा टक्के व्याज जास्ती मिळते. तू पण काढ तिथे अकाउंट. अर्थात ऑनलाईन बँकिंग अजून नीट चालत नाही.” मी (मनातल्या मनात) कपाळाला हात लावला.

मला माझ्या आईवडिलांचा सहवास फारसा कधी लाभला नाही. पण त्याची कमतरता अदितीच्या आईबाबांनी भरून काढली. मला त्यांच्या बद्धल नितांत आदर आहे आणि त्यांनाही माझ्याबद्धल तेव्हढाच जिव्हाळा आहे. अदितीच्या पहिल्या डिलिव्हरीला प्रॅाब्लेम्स होते तेव्हा दोघांनी अनेक रात्री जागून काढल्या होत्या. दोघानाही विन्या आणि कालिंदीचे लहानपणापासून खूप लाड पुरवलेत आणि अजूनही पुरवतात. विन्याच्या लिव्ह-इनला त्यांचा पूर्ण पाठिंबा होता. असे म्हणतात की वडील आणि मुलांचे कधी फारसे पटत नाही पण आजोबा आणि नातवांचे एक वेगळेच नाते असते. बाबा नको तिथे पैसे वाचवतील पण विन्या व कालिंदीला कधीच काही कमी पडून देणार नाहीत.

“अरे अशोक, आयपॅड लावून देतोस ना? मी चालू केलाय पण नेटफ्लिक्स लागत नाहीये.” बाबांच्या आवाजाने मी भानावर आलो. नेहमीप्रमाणे लॉगइन कसे करायचे ते बाबा विसरले होते. मी त्यांना त्यांचा मूव्ही चालू करून दिला. आता निदान पुढचे आठ दिवस तरी माझा बाबांचा पीए म्हणून जॉब पक्का होता.

Comments

माझीच गोष्ट सागतोयस की काय असं वाटलं.नवीन तंत्रज्ञान शिकायचं म्हणजे अजूनही पोटात गोळा उठतो हे मात्र खरं. गोष्ट एकदम मस्त.

By : Pratibha Tarabadkar
15/05/2023 10 : 44 : 18 AM

Very nicely written. This is the pathetic approach of our previous generation. And partially our generation also. Masta NAMASTE

By : Prasad khare
15/05/2023 12 : 14 : 45 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article