संगीतिका


तुम्हाला खरं सांगतो, मला कलेतलं (कला म्हणजे मराठीत art, मुलगी नव्हे) फारसं काही कळत नाही. तुम्हाला कशातलेच काही कळत नाही असे आमच्या हीचे मत आहे. इंद्रधनुच्या सात रंगांमधून असंख्य रंगछटांची उधळण हे एक आठवे आश्चर्य आहे असेच मला वाटते. पण एखादे abstract drawing मला दिले तर ते सरळ आहे की उलटे ते देखील समजणे अवघड असते. सकाळी जी चित्रे ग्रुपवर दिसतात ती अगदी फोटो काढल्या सारखी असतात. मग फोटोच काढावा ना! एव्हढे कष्ट का करायचे?

जी गोष्ट रंगांची तीच संगीताची!!!!! या universe मधील सर्व आवाज फक्त सात सुरांमध्ये कसे बसतात हे देखील समजत नाही. जे सूर कर्णकर्कश्य आवाज निर्माण करतात तेच सात सूर सुमधुर नाद्ब्रह्म देखील निर्माण करतात हे माझ्या सारख्या birdbrain अकलेला अनाकलनीय आहे.

मध्यंतरी आपल्याला देखील गाता येते असा माझ्या मनाचा (गैर)समज झाला होता. एकदोनदा मी गाण्याचा प्रयत्न पण करून पाहिला. मग माझ्या मित्राने त्यावर गाण्याचे बोल समजले पण सूर नाही अशी निन्दावर्जक comment केली. पण मी देखील हार मानली नाही. मी न्हाणीघरात माझे प्रयोग चालू ठेवले. त्यावर एकदा आमच्या शेजाऱ्यांनी ‘तुमच्या कोणी चांगला सुतार माहितीचा आहे का?, आम्हाला soundproof दारे खिडक्या बनवून घ्यायची आहेत’ अशी विचारणा केली. तरीही मी बधलो नाही.

आमच्या मातोश्री चांगल्या गायच्या. त्यांनी संगीताच्या परीक्षा देखील दिल्या होत्या. त्या पेटी देखील वाजवायच्या. मग मी संगीताची पाठ्यपुस्तके आणि पेटी बाहेर काढली. पुस्तके वाचून सा,रे,ग,प,ध,नी आणि सा असे सात स्वर असतात ते समजले. मंद, मध्य आणि तीव्र सप्तके असतात हा बोध झाला. विवाहित असल्यामुळे तीव्र सप्तकाचे आकलन लगेचच झाले. काळी एक ते काळी पाच अशा पट्ट्या असतात हे देखील समजले. पेटीवर कुठली कळ दाबली की सा रे ग वगैरे वाजतात हे पुस्तकात दाखवलेले असते. पेटीला मागे एक भाता असतो आणि पेटीतून सूर काढण्यासाठी हा भाता चालवावा लागतो. डाव्या हाताने भाता खेचून उजव्या हाताच्या बोटांनी कळा दाबून सा रे ग म वाजवता येऊ लागले. कधीकधी बोटे एकमेकांत अडकायची. तरी मी धीर सोडला नाही. अगदी हाताने भाता खेचून छातीचा भाता फुलेपर्यंत मी सराव केला.

थोडा सराव झाल्यावर एखादे गाणे वाजवावे असे ठरवले. पुस्तकात गाण्याचे नोटेशन होतेच. फक्त दाखविल्याप्रमाणे कळा दाबायच्या होत्या. गाणे निवडले, अजून त्या झुडुपांच्या मागे. पण पहिल्या अक्षरावरच गाडी अडली. अजून म्हणजे सा, रे, ग, ग असे पुस्तकात दाखवले होते. पण सा दाबून अ कसा उमटतो हे माझ्या मंद्बुद्धीला समजत नव्हते. मी बरीच तपश्चर्या केली आहे पण अजूनही आमची गाडी त्या झुडुपांच्या मागून बाहेर यायला तयार नाही.

पण गाणे गाता आले नाही तरी ऐकण्यात आमची मातब्बरी आहे. कोण सुरात गातंय किंवा बेसूर आहे एव्हढे कानाला नक्की समजते. आणि शेवटी असे आहे की सगळेच गाऊ लागले तर ऐकणार कोण? जसे तानसेन असतात तसे कानसेन पण लागतातच ना! एखाद्याला ‘वा! काय खर्ज लागला होता तुमचा तारसप्तकात!’ अशी शाबासकी तर देऊच शकतो.

पेटी जमली नाही तर, तबला, सतार अशा अनेक गोष्टी आहेत. प्रयत्न करणे आपल्या हाती आहे. काहीच जमले नाही तर स्वत:चा वाद्यवृंद तर काढूच शकतो. तुम्हाला कुणाला प्रज्ञाशील किंवा गरजवंतु कलाकार माहित असतील तर ताबडतोब कळवा.

मी लवकरच झंकार बीट्स, मंगल गाणी दंगल गाणी, मराठी बाणा (अशोक हांडे फेम) किंवा आमच्या गल्लीतील बाबू आर्चेस्ट्रा (प्रो. बाबू म्हात्रे, बारश्यापासून तेराव्या पर्यंत सर्व कामांसाठी गायक, वाद्ये व लाउडस्पीकर यांचे घाऊक कंत्राटदार) यांच्या पेक्षाही पुढे जाऊन संगीत क्षेत्रात नाव कमवेन याची मला खात्री आहे.

काम अवघड आहे. खूप मोठी साधना करावी लागेल. फक्त कल्पना विलास करून उपयोग नाही याची मला जाणीव आहे. पण आपणा सर्वांच्या सहकार्याने ही संगीत नौका स्वरलहरींवरून वाहत वाहत पैलतीराला लागेल याची मला खात्री आहे.

Comments

लय भारी.माझ्या अगदी मनातलं.बाबांची मिरजेला बदली झाली आणि त्यांनी मला तेथील गंधर्व संगीत विद्यालयात प्रवेश घेण्याचा आदेश दिला.पहिले एक दोन दिवस बरे गेले पण जेव्हा वरचा सूर लावायची वेळ आली तेव्हा कळलं की ये अपने बस की बात नहीं.... तेव्हापासून कानसेनचे शिष्यत्व पत्करले आहे.

By : Pratibha Tarabadkar
12/09/2023 11 : 59 : 24 AM

Nicely written

By : Shirish V Moghe
12/09/2023 1 : 21 : 48 PM

छान.. तुला Best Luck, एवढंच म्हणू शकतो.

By : Shirish Joshi
12/09/2023 11 : 55 : 31 PM

अगदी खरंय मी पण पूर्वी गाता नाही येत निदान पेटी तरी शिकावी या हेतूने सायन ला देसाई सरांकडे (आपल्या वीणाचे वडील )शिकायला जात होते.ते वाजवताना म्हणायला पण सांगायचे.... तिथंच घोडं अडलं..... ते म्हणायचे अहो तुम्ही वाजवताय 'सा 'आणि म्हणताय 'नि'..... आता कसं व्हायचं.. शेवटी पूर्णविराम.... आणि ठरवलं आपण आपलं कानसेनच व्हावं 😁😁

By : SHEETAL SURESH KHIRE
01/10/2023 04 : 42 : 30 AM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article