एक भयं (कर) कथा


रात्रीच्या साडेनऊ वाजता कोणी बेल वाजवली असा विचार करत राजाच्या बायकोने दरवाजा उघडला तर समोर बंडू उभा!
“काय भावजी, आज इतक्या रात्री?”
“काय सांगू वाहिनी, नोकरी लागल्या पासून वेळच मिळत नाही. बऱ्याच दिवसात राजाला भेटलो नव्हतो म्हणून आलो. तो काही नाहीतरी इतक्या लवकर झोपत नाही. आहे कुठे स्वारी?”
“बेडरूमचा दरवाजा बंद करून आता काहीतरी करतोय.”
“एकटाच?”
“भावजी, तुम्ही पण ना...”
बंडू बेडरूमचा दरवाजा ढकलून आत शिरला. सर्व रूम अंधारात बुडालेली होती. टेबलावर फक्त लॅपटॉपचा अंधुक प्रकाश दिसत होता.
“अरे राजा, अंधारात काय करतो आहेस?”
“बरे झाले तू आलास. तुझा उपयोग करून घेता येईल.”
“माझा कसला उपयोग?”
“ते पण खरेच आहे, तसा तू निरुपयोगीच आहेस, पण तरी मी चालवून घेईन. बस, मी एक कथा लिहितो आहे, कशी वाटते ते सांग मला.”
“कसली कथा? तुझी ती नेहमीचीच विनोदी कथा असेल.”
“अरे नाही, मी एक भयकथा लिहितो आहे. म्हणून दिवे बंद करून रात्रीच्या अंधारात लिहितो आहे. ऐक आता.” असे म्हणून राजाने कथा वाचायला सुरुवात केली.

“कथेचे नाव आहे, एक भयाण रात्र. सुरुवातीलाच एक विशेष सुचना लिहिली आहे.”
“म्हणजे तळटीप?”
“अरे तळटीप पानाच्या खाली लिहितात, ही सुरुवातीलाच शीर्षकाच्या खाली आहे.”
“बरं, काय टीप आहे?”
“सूचना: ही कथा शक्यतो रात्रीच्या अंधारातच वाचावी. म्हणजे चांगली वातावरण निर्मिती होईल.”
“अरे पण, अंधारात कसे दिसेल वाचायला?”
“वाचण्या एव्हढाच उजेड ठेवायचा. बाकी सर्व दिवे बंद करायचे.”
“ठीक आहे, पुढे?”
“रात्रीचे साडेबारा एक वाजून गेलेले असावेत. काळोख मी म्हणत होता. डोळ्यात बोट घातले असते तरी दिसले नसते.”
“डोळ्यात बोट घातले तर डोळे फुटतील, मग दिसेल कसे?” बंडूची शंका.
“अरे असे लिहिण्याची पध्दत आहे. प्रत्यक्ष बोट नाही घालायचे काही. तू मधे मधे बोलू नकोस रे, लिंक तुटते. सर्वत्र निःशब्द शांतता होती. त्या दाट जंगलात फक्त रातकिड्यांचे किर्र आवाज येत होते.”
“शांतता होती मग आवाज कसे आले?” बंडू.
“तू माझ्या चुका काढू नकोस रे. भीतीचा आनंद घे.” राजा वैतागून म्हणाला. “त्या घनदाट जंगलाच्या मधोमध एक नागमोडी रस्ता जात होता. वर आकाशात चांदण्या लुकलुकत होत्या. त्यांच्या प्रकाशात एका काळ्या रिबिनी सारखा तो रस्ता दिसत होता.”
“एकदा म्हणतोस अंधारात काही दिसत नव्हते, मग म्हणतोस रस्ता दिसतोय. नक्की काय ते ठरंव ना एकदा.” बंडू.

“तू म्हणतोस ते बरोबर आहे. वरच्या दोन ओळी खोडतो मी. रस्त्याच्या आजूबाजूच्या झाडांच्या फांद्या रस्त्यावर वाकलेल्या होत्या. त्यामुळे आभाळ देखील कुठे आहे ते समजत नव्हते. अश्या निर्मनुष्य रस्त्यावर एक व्यक्ती एकटीच चालत होती.”
“आता निर्मनुष्य रस्त्यावर मनुष्य कुठून आला?” बंडू.
“म्हणूनच मी मनुष्य नाही, व्यक्ती लिहिलंय.
चालता चालता ती व्यक्ती झाडाच्या फांद्यांवर आपटत होती. तरीही ती नेटाने पुढे चालली होती.”
“इथे आता इंटरनेट कुठून आले?”
“अरे इंटरनेट नाही, नेटाने म्हणजे प्रयत्नपूर्वक!”
“तुझं लेखन म्हणजे भयानकच आहे.” बंडूने विनोद केला.
“गप रे. पुढे ऐक.
त्या व्यक्तीच्या हातात एक काठी होती. तिच्या आधाराने ती चालत होती. ती व्यक्ती म्हणजे एक पंचवीस वर्षांची स्त्री होती. तिने उंच टाचांच्या चपला घातल्या होत्या. त्याचा टकटक आवाज त्या रस्त्यावर उमटत होता. तिने जीन्स आणि टी शर्ट परिधान केलेला होता. हातातल्या घडाळ्याचे रेडीयमचे काटे सव्वाची वेळ दाखवत होते. तिच्या डोळ्यांवर एक काळा चष्मा होता.” “आधीच काळाकुट्ट अंधार, काही दिसत नाहीये, आणि वर काळा चष्मा!” “अरे, ती तिची स्टाईल आहे. कथेमधे कॅरॅक्टर पकडणे जरुरीचे असते. तुला नाही कळणार!
शूर्पणखा चालता चालता अचानक थबकली.”
“शूर्पणखा?”
“हो, कथेच्या नायिकेचे नाव.”
“पण शूर्पणखा? तुला दुसरे नाव सुचले नाही?”

“ही कथेची गरज आहे. मंदोदरी गरोदर असताना तिने रामायण वाचायला घेतले होते. लक्ष्मण शूर्पणखेचे नाक कापणार एव्हढ्यातच मंदोदरीला कळा सुरु झाल्या होत्या आणि तिची प्रसूती झाली होती. म्हणून मंदोदरीने मुलीचे नाव शूर्पणखा ठेवले होते. लक्ष्मणाने नंतर तिचे नाक कापले ही गोष्ट मंदोदरीला कधी समजलीच नाही. असो. शूर्पणखा थबकली कारण त्या दाट अंधारात दूरवर तिला एक मिणमिणता दिवा दिसला होता. आता ती झपाझप चालू लागली. तिच्या पायांचा टक, टक असा आवाज आता टकटकटकटक असा येऊ लागला. पण वीस पावलांवर अचानक हा आवाज बंद झाला.”
“का?” बंडूला अचानक उकडायला लागलं. त्याने पंखा मोठा केला.
“कारण तो डांबरी रस्ता अचानक मातीचा झाला होता.”
“का?” बंडू.
“कारण सार्वजनिक बांधकाम विभागाचा निधी संपल्यामुळे रस्त्याचे पुढील काम रखडले होते.”
“हुश्श! काय घाबरलो मी!”
“मग, घाबरायलाच हवे. भय कथा आहे ही. शूर्पणखा जसजशी त्या दिव्याच्या जवळ जाऊ लागली तशी तिला दिव्याच्या बाजूला बसलेली अंधुकशी आकृती दिसू लागली. शूर्पणखा त्या व्यक्तीच्या जवळ जाऊन थांबली. तो एक अतिशय वृद्ध मनुष्य होता. त्याच्या अंगावर जवळजवळ मांस नव्हतेच. केवळ हाडाचा सापळा असल्यागत जणू तो दिसत होता. डोळे अतिशय खोलवर गेलेले, प्राणहीन दिसत होते. तो वृद्ध निदान दीडशे वर्षाचा तरी असावा.

'खापरपणजोबा, एव्हढ्या रात्री इथे काय करताय तुम्ही?'
’'मी चाळीस वर्षांपासून इथेच आहे. दिवसा कुणाला दिसत नाही एव्हढेच. रात्री इथे कुणीही येत नाही. शूर्पणखा, चाळीस वर्षात माझ्याशी बोलणारी तू पहिली व्यक्ती आहेस. रात्रीचे अडीच वाजले आहेत. तीन वाजता सुधाकर चव्हाण येऊन मला घेऊन जाईल.'

’ ‘कोण सुधाकर चव्हाण?’
‘सुधाकर एक भटकती आत्मा आहे. मागील निवडणुकीत त्याचा एका मताने पराभव झाला. आणि ते मत त्याच्या विरुद्ध त्याच्या बायकोने दिले होते. मग त्याने तिला मारले आणि स्वत: आत्महत्या केली. तेव्हापासून तो आत्मा होऊन भटकतो आहे.’
‘पण तिने त्याच्या विरुद्ध का मत दिले?’
‘कारण या रस्त्याचा निधी त्याने खाल्ला, म्हणून हा रस्ता अर्धवट पडून आहे.’
‘पण मग तो खाल्लेला पैसा गेला कुठे?’
‘मला साधारण कल्पना आहे, पण खात्री नाही.’
‘कोणाकडे असावा तो पैसा?’
‘बहुतेक त्याच्या एकुलत्या एका मुलीकडे असावा.’
‘पण खापरपणजोबा, हे तुम्हाला कसे माहित?’
‘मला सुधाकरने मरण्या आधी सांगितले होते.’
‘मला एक सांगा, तुम्ही इतके वर्ष जगलात कसे?’
‘या जंगलातून एक नदी वाहते. तिच्या काठावर एक जडीबुटी वाढते. मी रोज तिचा पाला अंगाला लावून नदीत आंघोळ करतो. म्हणून मी दीर्घायुषी आहे.’
‘पण खापरपणजोबा, आता त्याचा काही उपयोग नाही. कारण तुमचे आयुष्य आत्त्ता संपणार आहे.’ असे म्हणून शूर्पणखाने आपल्या पर्स मधून एक पिस्तोल बाहेर काढले. त्या मिणमिणत्या उजेडात तिने त्या वृद्धाच्या छातीवर गोळी झाडली. त्या शांत जंगलात जणू तोफ उडावी तसा तो आवाज होता. पण तो ऐकायला आजूबाजूला कुणीही नव्हते. पण ती गोळी त्या वृद्धाच्या छातीवर लागून दूर उडाली.”
कथा ऐकता ऐकता बंडू उत्तेजित झाला होता. त्याची बुभूळे डोळ्यातून बाहेर यायचीच बाकी राहिली होती.
“मग...मग पुढे क.. काय झाले?”

“हरिश्चंद्र चव्हाणने डावा हात लांब करून शूर्पणखाचे पिस्तोल हस्तगत केले. शूर्पणखाचा चेहरा पांढरा फाटक पडला होता आणि न कापलेले नाक लालबुंद झाले होते. हरिश्चंद्राने उजव्या हाताने तिची मान धरून पिरगाळली. कट करून हाड मोडल्याचा आवाज आला. हरिश्चंद्राने मान सोडली आणि शूर्पणखा जमिनीवर कोसळली.”
इथे बंडू खुचीवरून खाली पडायचाच काय तो बाकी राहिला होता.
“हरिश्चंद्राने शूर्पणखाची पर्स उघडली.” राजाने कथेचे वाचन पुढे सुरु केले. “त्यात समोरच तिचे आधार कार्ड होते. त्यावर तिचा फोटो होता आणि आधार कार्डावर नाव होते, शूर्पणखा सुधाकर चव्हाण. आईचे नाव मंदोदरी. हरिश्चंद्राने पर्स उचलली आणि रस्त्यावरून चालायला सुरुवात केली. पूर्वेला तांबडं फुटू लागले होते. हरिश्चंद्राच्या चपलांचा रस्त्यावर फताक फताक आवाज येत होता आणि त्या मातीत त्याच्या उलट्या पायांचे ठसे उमटत होते.”
वहिनींनी बेडरूमचा दरवाजा उघडला. भिंतीवर आपटून त्याचा फताक असा आवाज झाला आणि बंडू खुर्चीत तीनताड उडाला.
याला काय झाले म्हणून वाहिनी आश्चर्याने त्याच्याकडे पहातच राहिल्या.

Comments

मस्तच.नावेही गंमतीशीर दिली आहेत.नर्मविनोदी भयकथा 😊

By :
20/04/2023 12 : 12 : 12 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article