तीन ‘ब’ चे गाढव


तीन ‘ब’ चे गाढव

शशांक पुरंदरे

सकाळचे सव्वादहा वाजले होते. भागूभाई भाई आणि सन्सच्या स्वागत कक्षातील फोन खणखणला. स्वागतिकेतील स्वागतिका स्वागतिकाने फोन उचलला.

“नमस्कार. भागूभाई भाई आणि सन्समधे आपले स्वागत आहे. मी स्वागतिका बोलतेय. मी आपली काय सेवा करू शकते?”

“मी काहीही घ्या किंवा विका एजन्सी मधून झुंझार झिरवळ बोलतोय.”
“बोला मि हिरवळ.”
“हिरवळ नाही झिरवळ!”
“माफ करा, सकाळी शॅावर घेताना कानात पाणी गेल्यामुळे मला जरा कमी ऐकू येतंय. बोला ना !”
“आम्हाला तुमच्या कंपनीची ॲड कॅम्पेन करण्यात रस आहे. मला तुमच्या जाहिरात विभागातील अधिकाऱ्यांना भेटायचे आहे.”
“ठीक आहे. मी मिस रेवती पावटे यांच्याशी बोलून तुम्हाला कळवते.”

दहा मिनिटांनी झुंझारचा फोन वाजला.
“मी स्वागतिका बोलते आहे भाभाआसं मधून. मि हि… , माफ करा झिरवळ, तुम्ही उद्या साडेअकरा वाजता मिस पावटेंना भेटू शकता.”
“चालेल. तुमच्या भाभाआसं ला कसे यायचे?”
“सोपं आहे. तुम्ही कुठून येणार?”
“घरुन.”
“ नाही म्हणजे कुठल्या भागातून येणार?”
“हं, तसं विचाराना. ठाण्याकडून.”
“टोल नाक्यानंतर मुलुंडचा उड्डाणपूल लागतो, तो घ्यायचा नाही. उजव्या बाजूला अंडरपासवरुन सरळ आलात की पाचशे मीटरवर आमची कंपनी आहे.”
“ठीक आहे”, म्हणून झुंझारने फोन बंद केला.

दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वीसला स्वागत कक्षात स्वागतिकाने झुंझारचे स्वागत केले आणि कॅान्फरन्स रुममधे बसण्याची विनंती केली. पाच मिनिटांनी मिस पावटे रुममधे आल्या.

“मि हिरवळ ….!”
“झिरवळ!!”
“इथे तुमचे नाव मि हिरवळ म्हणून लिहिले आहे.”
“तुमच्या स्वागतिकेच्या कानात पाणी गेल्यामुळे नीट ऐकू येत नाही हे मी समजू शकतो पण नीट लिहिता पण येत नाही ??”
“माफ करा, मी तुमची माफी मागतो मि हिरवळ, सॅारी झिरवळ! आपण मूळ कामाकडे वळुया का?”

“बरं, मी ‘काहीही घ्या किंवा विका’ यांचा फिरता विक्रेता आहे. आमची कंपनी डिजिटल मार्केटिंग करते. आम्ही तुमच्या कंपनी साठी डिजिटल सामग्री निर्माण करुन इंटरनेटवर तुमच्याच स्वतःच्या संकेतस्थळावर टाकू शकतो, शिवाय यू ट्यूब किंवा टीव्ही वाहिन्यांवर टाकण्यासाठी जाहिराती बनवू शकतो. डिसप्ले बोर्ड वर लावण्या करता पोस्टर्स बनवू शकतो.”

“तुम्ही वेळेवर आलात. आम्ही ॲड एजन्सीकडे जाण्याचा विचारच करत होतो.”
“तुम्ही काय विकता?”
“आम्ही सर्व प्रकारच्या पिना विकतो.”
“पिना?”
“हो, म्हणजे पेपर पिन, टाचणी, यू पिन, साडी पिन, हेअर पिन वगैरे वगैरे गृहोपयोगी पिना. त्यामुळे आमच्या नव्वद टक्के कर्मचारीणी महिला आहेत.”
“वा, छान. पण आधी मालकांची माहिती दिलीत तर बरं होईल.”
“आमच्या कंपनीच्या नावातच सर्व काही आले. भागूभाई भाई आणि सन्स.”
“भागू बाई बाई आणि सन्स?”
“अहो बाई नाही, भाई! आज तुम्ही शॅावर घेऊन आला आहात का? भागूभाई, त्यांचे भाई म्हणजे भाई आणि सन्स म्हणजे सन्सकृती मुलगी आणि प्रकृती मुलगा.”
“मग नावात प्र का नाही?”
“कारण तो अजून लहान आहे, १४ वर्षांचा. सन्सकृती २४ वर्षांची आहे.”
“भागूभाई मधे दहा वर्ष काय करत होते?”
“कंपनीत काम करत होते!”
“त्यांच्या भाईंना मुले नाहीत?”
“त्यांचे लग्न झालं नाही अजून, तर मुले कुठून होणार! त्यांचे सध्या अफेअर चालू आहे.”
“कुणाशी?”
“इश्श, सांगू नका कुणाला, माझ्याशी!”
“म्हणजे कंपनीचे नाव बदलावे लागेल तुम्हीपण भागीदार झालात की! सन्सचं सन्सरे होईल! ॲड बनविताना आधीच सर्व विचार करावा लागतो ना!
“ठीक आहे. व्हिडीओ साठी आपल्याला सात मॅाडेल्स लागतील. सुरवातीला एक मॅाडेल दुसऱ्या मॅाडेलबद्दल बॅासला पिन मारते आहे असे दाखवू या म्हणजे बघणाऱ्याला इंटरेस्ट निर्माण होईल. आणि इतर पाच पिना, म्हणजे पेपर पिन, टाचणी, यू पिन, साडी पिन, हेअर पिन यासाठी पाच मॅाडेल्स लागतील.”
“कमाल आहे, तुमच्या कामाचा झपाटा विलक्षण आहे.”
“व्हॅाईसओव्हरला तुमचाच आवाज वापरूया. खूप छान आहे!”
“झुंझार, उगाच माझ्यावर लाईन मारून फायदा नाही. सांगितले ना, माझे अफेअर चालू आहे म्हणून!”
“मला वेटिंग लिस्टवर ठेवा.”

“वेबसाईट कोण बनविणार?” रेवतीने विषय बदलला.

“कोण म्हणजे? आम्हीच! व्हिडीओ आपण तुमच्या कंपनीत बनवूया. मॅाडेल्स आणि डीओपी मी आणेन. तुम्ही फक्त पिना तयार ठेवा म्हणजे झालं! शिवाय बिलबोर्डवर साडीला पिन लावताना तुम्हालाच मॅाडेल म्हणून वापरता येईल.
“काहीही! पिना हा प्रॅाब्लेम नाही. आम्ही दिवसाला हजारो पिना बनवतो.”
“ठीक आहे. मी कंपनीचे प्रपोजल पाठवतो. मंजूर झाले की लगेचच कामाला सुरुवात करुया.
तुमच्या कंपनीची एक टॅग लाईन बनवावी लागेल. माझ्याकडे एक कल्पना आहे. तुमच्या कंपनीच्या नावातील आद्याक्षरे वापरुन इंग्रजी लाईन बनविता येईल. म्हणजे भागू मधला B, दोन भाईंचे दोन B, आणि मधला A आणि सन्स मधले दोन S हे मिळून BBB ASS किंवा Tripple B ASS पिनाच वापरा, अशी टॅगलाईन वापरू शकतो.”

“मि झुंझार, यू आर ए जिनीॲस !!!!”

Comments

चि वी जोशी पुनरागमनायच श पु रूपात

By : Deepak Tikekar
20/02/2026 5 : 48 : 37 PM

Shashank , , lost in translation च्या ऐवजी found in translation अशी Hilarious, (विनोदी ) कथा 🙏

By : मोहिनी कुलकर्णी चित्रे.
20/02/2026 7 : 41 : 06 PM

अतिशय मनोरंजक कथा!

By : 9820188354
21/02/2026 09 : 30 : 06 AM

Hilarious, liked it

By : Cyril David
22/02/2026 2 : 17 : 19 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article