लग्न पहावे करून


“Lufthansa Flight LH 194 to Mumbai is now boarding. Please proceed to gate no. 73.”

अभिजितने आपला laptop बंद करून बॅगेत टाकला. ह्युस्टन-फ्रँकफर्ट दहा तासाच्या फ्लाईट नंतर तीन तासाचा ब्रेक चांगला होता. आखडलेले पाय सुटे करून जरा विंडो शॉपिंग करून अर्धा तास शांतपणे बसण्यासारखे सुख नाही. आता परत नऊ तास बसायचेच होते. हवाईसुंदरीच्या खोट्या स्मितहास्याची परतफेड करून अभिजित विमानात शिरला. आपली पुलमन वरच्या सामानाच्या कप्प्यात टाकून आपली ९A सीट ग्रहण केली. बॅगेतून laptop काढून समोरच्या ट्रेवर ठेवला, आणि खिशातून मोबाईल काढून आईला whatsapp कॉल लावला.
“Flight board केली आहे. रात्री एक वाजता पोचेल.”
“आम्ही येतोय तुला pickup करायला.”
“चल, भेटूया.” अभिजितसाठी हे नेहमीचे रुटीन होते. या वर्षातली ही त्याची तिसरी ट्रीप होती इंडियाला. पहिल्या दोन कंपनीच्या कामासाठी होत्या. या वेळेची ट्रीप मात्र वेगळी होती. आईने त्याच्या मागे लागून शेवटी लग्नासाठी मुली पहाण्याचे कार्यक्रम आयोजित केले होते. आता नाही म्हणायला देखील तसे काही कारण देखील नव्हते. म्हणून पंधरा दिवस सुट्टी घेऊन अभिजित मुंबईला चालला होता. सुट्टी तशी नावालाच होती. कंपनीची कामे होतीच. पण मुली बघण्यासाठी प्राधान्य दिले जाणार होते यावेळेला.

बोर्डिंग पास वरचा ९B सीट नंबर बघून मुग्धा जरा वैतागली होती. तीन सीट मध्ये मधल्या सीटवर आठ तास बसणे म्हणजे शिक्षाच होती. तरी ४८४ ड्रीमलायनर मध्ये लेग स्पेस जरा जास्ती असते. आजूबाजूला कोण आहे हा पण एक प्रश्नच असतो. पण आलिया भोगासी असावे सादर असे म्हणत मुग्धाने flight बोर्ड केली. सायकोलॉजी मध्ये PhD करून मुग्धा जर्मनीत समुपदेशन करत होती. जर्मन भाषा येत असल्यामुळे तिचा जम बसायला वेळ लागला नव्हता. सध्या तिची practice जोरात सुरु होती. पण आईने आता लग्नाचा धोशा तिच्या मागे लावला होता. त्यासाठीच ही इंडियाची ट्रीप होती. खरे म्हणजे लग्न झाल्यावर वेगळ्या ठिकाणी परत जम बसवणे जरा अवघडच होते, पण पुढचे पुढे बघू असा विचार करून मुग्धा मुंबईला चालली होती. तशी दिसायला मुग्धा आकर्षक होतीच आणि बरेच वर्षे बाहेर काढल्यामुळे एक वेगळाच आत्मविश्वास तिच्यात आला होता. निळी जीन, पांढरा शर्ट, nike चे शूज, बॉब केलेले केस आणि शून्य मेकप यामुळे सर्व नजरा आपसूकच तिच्याकडे वळल्या तर नवल नव्हते.

९ A मध्ये एक तरुण मुलगा आधीच स्थानापन्न झालेला होता आणि ९ C मध्ये साधारण तिच्याच वयाची मुलगी बसलेली होती.
‘निदान कंपनी तरी बरी दिसतेय.’ मुग्धा मनात म्हणाली. हवाई सुंदरीच्या मदतीने आपली बॅग वरच्या बिन मध्ये टाकून मुग्धा बाजूच्या मुलीच्या पायावर पाय न देता सीटवर बसण्यात यशस्वी झाली. गळ्यातील पर्स समोरच्या सीटला अडकवून मुग्धाने सीट बेल्ट लावला आणि मागे मान टेकवून हुश्य केले.
“हाय, मी अभिजित.” एक क्षणही न दवडता बाजूच्या तरुणाने आपले introduction दिले. “मुंबई का?”‘जरा आगाऊच दिसतोय. Flight मुंबईला जाणार म्हटल्यावर मी काय न्यूयॉर्कला जाईन का?’ हे सगळे मुग्धा अर्थातच मनात म्हणाली. “मी मुग्धा.” मुग्धाने उजव्या बाजूला वळून बसलेल्या मुलीला हाय केले. “हाय, मी कश्मिरा. मी पण मुंबईलाच जात आहे.” डोळे मिचकावून कश्मिरा म्हणाली.
“हो ना, आपण सगळेच मुंबईला जातोय म्हणजे मोठाच योगायोग म्हटला पाहिजे ना?” असे मुग्धा म्हणाल्यावर कश्मिरा आणि मुग्धा दोघीही खोखो हसल्या. मग त्यांच्यात अभिजित देखील सहभागी झाला.

“We are now beginning our decent for Chhatrpati Shivaji maharaj international airport, Mumbai. Please fasten your seatbelt.” हवाई सुंदरीच्या उद्घोषणेने तिघेही भानावर आले. Scotch on the rocks, Lufthansa चे फूड आणि गप्पागोष्टी आणि चेष्टामस्करी मध्ये आठ तास कसे निघून गेले ते तिघांनाही कळले नाही. अर्थात नेहमी दोघी विरुद्ध एक असाच सामना झाला पण अभिजित दोघींनाही पुरून उरला होता. उतरताना तिघांनीही आपले फोन नंबर्स एकमेकाना दिले आणि मुंबईत परत भेटूया असे ठरवले.

एअरपोर्टच्या बाहेर अभिजितने दोघींनाही बाय केले. समोरच त्याचे आईवडील उभे होते.
“कोण होत्या रे त्या दोघी?” अभिजीतला आईने विचारले.
“त्या ! अग आत्ता flight मध्ये माझ्या बाजूच्या सीट वर होत्या म्हणून ओळख झाली.”
“असं होय, मला वाटले माझे काम तू सोपे केलेस की काय!”
“हो, तेव्हढाच उद्योग आहे मला! चल, गाडी कुठे आहे? दमलोय मी!”
“तो काय, सीताराम आलाय कार घेऊन.”

दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रेकफास्ट करता करता आई म्हणाली, “आज तुला त्या मुग्धा देशमुखला भेटायचे आहे. तुझ्या म्हणण्याप्रमाणे आधी तुम्ही दोघेच भेटा. मग बघू आपण पुढे काय करायचे ते.”
“मुग्धा? एक मुग्धा मला flight मध्ये भेटली होती ती तर नाही ना ही?”
“ते मला माहित नाही. मी काही तिला बघितलेले नाही.”
“काय करते ही?”
“ते तू आता तिलाच विचारना. तुझ्या काकूने सुचवलेली आहे म्हणजे तुझ्या योग्यच असेल. संध्याकाळी सहा वाजता ती पवईला कॉफीशॉपच्या बाहेर तुला भेटेल. हा तिचा इंडियाचा नंबर आहे.” आईने तिचा नंबर अभिजीतला पाठवला.
“काय कमाल आहे, ही ती flight मधली मुग्धाच आहे. हा तिचाच नंबर आहे.” नंबर पाहून अभिजित उद्गारला.

संध्याकाळी सहा वाजता मुग्धा कॉफीशॉपच्या बाहेर उभी होती. घाईघाईत ज्याला भेटायचे आहे त्याचा नंबर घ्यायला ती विसरली होती. पण आईच्या म्हणण्याप्रमाणे तिचा नंबर त्याच्याकडे होता. मुग्धाला त्याचे नाव देखील माहित नव्हते. वाट पहाण्याशिवाय तिला पर्याय नव्हता. आणि समोरच तिला अभिजित दिसला.
“अरे, तू इथे काय करतो आहेस?” मुग्धाने आश्चर्याने त्याला विचारले.
“कुणाला तरी भेटायचे आहे म्हणून आलो आहे. आणि तू?” अभिजितने पण तिची जरा खेचावी म्हणून उत्तर दिले.
“सेम. आमचा ‘बघण्याचा’ कार्यक्रम आहे.”
“काय सांगतेस?”
“अरे त्यासाठी तर मी मुंबईत आले आहे. मी तुम्हाला सांगितले होते ना?”
“ओह, म्हणजे स्वप्नातील राजकुमार वगैरे वगैरे हं.”
“आता तो राजकुमार आहे का शिपाई ते प्रत्यक्ष पडद्यावरच पाहू. पण बडी आसामी दिसतेय. अजून महाराज उगवले नाही आहेत. मला कुणी वेळा पाळल्या नाहीत तर अतिशय चीड येते. लोकांना इतरांच्या वेळेची किंमतच नसते. एकतर मला त्याचे नावगाव देखील माहित नाही. काळा का गोरा ते देखील ठाऊक नाही. आल्यापासून कुणी ना कुणी तरी घरी येतंच होतं, त्यामुळं वेळच मिळाला नाही चौकशी करायाला. Serves me right. एकूण सगळं अवघडच आहे. बरं ते जाउदे. तुझं ‘संशोधन’ सुरु झालय की नाही?”
“खरं सांगायचं तर मी पण त्यासाठीच इथे आलोय.”
“काय सांगतोस? मग तुझी राजकुमारी कुठे आहे? का ती पण लेट लतीफ!”
“नाही. मी पण वेळेवर आलोय आणि ती पण वेळेतच आली आहे.”
“पण मग आहे कुठे?”
“ही काय, तू समोर तर उभी आहेस.”
“मी?” मुग्धाचा आ च झाला. “आपण दोघे एकमेकांना भेटायला आलोय? कमालच झाली.”
“येस, अभिजित सावंत इन फ्लेश. तुझ्या सेवेला हजर आहे.”
“शिपाई, एक टेबल लाव. हम बैठना चाहते है.” मुग्धाने आज्ञा दिली. “अभी लाता हू राजकुमारीजी!” अभिजितने वाकून कुर्निसात केला.

दोघेही टेबलावर जाऊन बसले आणि नंतरची दोन मिनिटे निशब्द शांततेत गेली. दोघांनाही काय बोलावे ते सुचत नव्हते.
“आपण कश्मिराला बोलावू या का? ती इथे जवळच राहते.” मुग्धा म्हणाली.
“पण आपण ज्या कामासाठी आलोय त्याचे काय?” अभिजितने प्रश्न केला.
“ते होईल रे. आज मस्त पार्टीचा मूड आहे. मी तिला फोन लावते.”

आणि दहा मिनिटात काश्मिरा कॉफीशॉप मध्ये आली. तिघांचेही हायफाय झाले. कश्मिरा शहा गुजराती होती पण अमेरिकेत रहात असल्यामुळे गुजराती अक्सेंट जवळजवळ नव्हताच आणि मराठी देखील चांगले बोलत होती.
“आज मला अभिजित ऑफिशियली ‘बघायला’ आला आहे.” मुग्धाने सुरुवात केली.
“मग मला काय रेफरी म्हणून बोलावले आहे का तुम्ही दोघांनी?” कश्मिरा हसत हसत म्हणाली.
“नाही ग! Flight मधली पार्टी पुढे चालू ठेवण्याचा मूड आहे म्हणून तुला बोलावले. चला, आपण रोडाज मध्ये बसुया, म्हणजे “पार्टी” करता येईल.” मुग्धा म्हणाली.

रात्रीचे दहा वाजून गेले होते. खाणे पिणे आणि गप्पांमध्ये वेळ छान गेला होता. भारतीय, अमेरिकन आणि जर्मन संस्कृती पासून सोशल life पर्यंत सगळ्याचा उहापोह झाला होता. मुग्धाचा जर्मन अनुभव हा दोघानाही नवीनच होता. शेवटी कश्मिरा उठली आणि अभिजित आणि मुग्धाला ‘best of luck’ देऊन दिघून गेली. आठ दिवसांनी परत भेटायचे ठरले होते.

“आता आपल्याबद्धल बोलूया का?” शेवटी अभिजितने विचारले.
“गेले तीन तास विचार करूनही तुला नकार देण्यासारखे मला तुझ्यात काही सापडत नाहिये.” मुग्धा म्हणाली.
“म्हणजे तुझा होकार आहे?” अभिजितने उत्साहाने विचारले.
“थांब, थांब, एव्हढी घाई नको. तुझ्यात नाकारण्यासारखे काही नसले तरी माझ्या समोर खूप प्रश्न आहेत.”
“म्हणजे?”
“एक तर मी जर्मनीत आहे. तू अमेरिकेत स्थाईक आहेस. माझा जर्मनीत चांगला जम बसला आहे. क्लाएन्टेल पण खूप मोठे आहे. ते सगळे सोडून मी अमेरिकेत येणे मला पटत नाही. तुला जर्मनीला शिफ्ट होणे शक्य आहे की नाही, तुझी तशी तयारी आहे का, हे मला माहित नाही.”
“मला देखील तुझ्यात नाकारण्यासारखे काही दिसत नाही पण या बाकीच्या गोष्टींचा मी विचारच केला नाही. हे माझ्या लक्षातच आले नाही. मी गृहित धरले की तू अमेरिकेला येशील.”
“दुसरी गोष्ट म्हणजे माझी आई माझ्याबरोबरच राहणार. कारण मी एकटीच मुलगी आहे. ती देखील adjustment तुलाच करावी लागेल.”
“मला जर्मनीत ट्रान्स्फर घेता येणे शक्य आहे की नाही ते पाहावे लागेल. किंवा इतर जॉब शोधावा लागेल. मी तुझी परिस्थिती समजू शकतो. तू स्वत:ची practice करतेस त्यामुळे पुन्हा अमेरिकेत शून्यापासून सुरुवात करणे कठीण आहे हे मला मान्य आहे.”
“ठीक आहे. आपण एकेमेकांना पसंत आहोत हे तर नक्की आहे. Practically सर्व जमेल की नाही ते पहावे लागेल. आपण दोघेही विचार करुया आणि मग निर्णय घेऊया.” मुग्धा म्हणाली.

चार दिवसानंतर (शेवट पहिला)

सकाळी सकाळीच कश्मिराचा मुग्धाला फोन आला.
“हे, गुड न्यूज आहे. माझे लग्न ठरले.” कश्मिरा म्हणाली.
“अरे, congrats! तू तर छुपी रुस्तुम निघालीस. परवा भेटलो तेव्हा बोलली नाहीस अजिबात!”
“तेव्हा तुमचा issue सुरु होता म्हणून मी काही बोलले नाही. चलो, आज पार्टी तो बनती है. तुमचे काय ठरले?”
“ते संध्याकाळी सांगते.”
“पण अभिजीतला बोलावू ना? महेश, my would be पण येणार आहे.
“हो बोलाव ना, नो प्रॉब्लेम!”
“महेश डायमंड मर्चंट आहे. मुंबईत मोठा बिझिनेस आहे. मी परत मुंबईत येणार. जॉब सोडून देणार. महेशला बिझिनेस मध्ये हेल्प करणार.”
“वा, मस्त!”

संध्याकाळी कश्मिरा आणि महेश दोघांची वाट पहात रोडाज मध्ये बसले होते. दहा मिनिटांनी अभिजित आणि मुग्धा हातात हात घालून हॉटेलमध्ये आले. कश्मिराने आनंदाने मुग्धाला मिठी मारली.
“सो, सर्व आलबेल?” “हो ग, अभिजीतला जर्मनीला ट्रान्स्फर मिळतेय त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही.”
“वॉव, मस्तच. चलो, एक शॅम्पेन तो बनतीही है.”

चार दिवसानंतर (शेवट दुसरा)

सकाळी सकाळीच कश्मिराचा मुग्धाला फोन आला.
“हे, गुड न्यूज आहे. माझे लग्न ठरले.” कश्मिरा म्हणाली.
“अरे, congrats! तू तर छुपी रुस्तुम निघालीस. परवा भेटलो तेव्हा बोलली नाहीस अजिबात!”
“तेव्हा तुमचा issue सुरु होता म्हणून मी काही बोलले नाही. चलो, आज पार्टी तो बनती है. तुमचे काय ठरले?”
“ते संध्याकाळी सांगते.”
“पण अभिजीतला बोलावू ना? महेश, my would be पण येणार आहे.”
“हो बोलाव ना, नो प्रॉब्लेम!”
“महेश डायमंड मर्चंट आहे. मुंबईत मोठा बिझिनेस आहे. मी परत मुंबईत येणार. जॉब सोडून देणार. महेशला बिझिनेस मध्ये हेल्प करणार.”
“वा, मस्त!”

संध्याकाळी कश्मिरा आणि महेश दोघांची वाट पहात रोडाज मध्ये बसले होते. दहा मिनिटांनी अभिजित आणि मुग्धा हातात हात घालून हॉटेलमध्ये आले. कश्मिराने आनंदाने मुग्धाला मिठी मारली.
“सो, सर्व आलबेल?”
“हो, अभिजीतला ट्रान्स्फर मिळत नाही म्हणून तो जर्मनीत दुसरा जॉब शोधणार आहे. एक साधारण सहा महिने लागू शकतील. मग आम्ही त्यानंतर लग्न करू असे ठरवले आहे.”
“वॉव, मस्तच. चलो, एक शॅम्पेन तो बनतीही है.”
चार दिवसानंतर (शेवट तिसरा)

सकाळी सकाळीच कश्मिराचा मुग्धाला फोन आला.
“हे, गुड न्यूज आहे. माझे लग्न ठरले.” कश्मिरा म्हणाली.
“अरे, congrats! तू तर छुपी रुस्तुम निघालीस. परवा भेटलो तेव्हा बोलली नाहीस अजिबात!”
“तेव्हा तुमचा issue सुरु होता म्हणून मी काही बोलले नाही. चलो, आज पार्टी तो बनती है. तुमचे काय ठरले?”
“ते संध्याकाळी सांगते.”
“पण अभिजीतला बोलावू ना? महेश, my would be पण येणार आहे.”
“हो बोलाव ना, नो प्रॉब्लेम!”
“महेश डायमंड मर्चंट आहे. मुंबईत मोठा बिझिनेस आहे. मी परत मुंबईत येणार. जॉब सोडून देणार. महेशला बिझिनेस मध्ये हेल्प करणार.”
“वा, मस्त!”

संध्याकाळी कश्मिरा आणि महेश दोघांची वाट पहात रोडाज मध्ये बसले होते. दहा मिनिटांनी अभिजित आणि नंतर मुग्धा हॉटेलमध्ये आले.
“सो, सर्व आलबेल?”
“सध्या काही जमेल असे वाटत नाही,” मुग्धा म्हणाली, “अभिजीतला ट्रान्स्फर मिळत नाही. जर्मनीत दुसरा जॉब मिळणे पण कठीण आहे. But we will stay in touch. पण आपण तुमचे ठरलेले लग्न celebtrate करुया. चलो, एक शॅम्पेन तो बनतीही है.”

Comments

Nice

By : Shirirsh V Moghe
14/09/2023 12 : 54 : 47 PM

वाह वा! एक संस्कृत वचन आहे: सर्वारंभाः तंडुलाः प्रस्थमूलाः || अर्थ आहे, सगळ्याच गोष्टींच्या मुळाशी पोट भरण्याचा (तंडुल: भात) उद्देश असतो. सद्यपरिस्थितीत सगळ्याच गोष्टींच्या मुळाशी मद्यार्क असतो !!

By : Bhalchandra Shrikhande
14/09/2023 1 : 37 : 04 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article