माझा स्तंभ-४
सध्या महाराष्ट्रात पाटील नावाची चलती आहे. यात पहिले नाव म्हणजे मनोज जरांगे पाटील. सहा महिन्यापूर्वी याचे नावही कुणाला माहित नव्हते. त्याने आज महाराष्ट्र सरकार आणि पर्यायाने शिंदे-फडणवीस-पवार त्रिकुटाला गुडघे टेकायला लावले आहेत. अर्थात या सर्वांनाच माहिती आहे की मराठा आरक्षण सध्याच्या कायद्यानुसार कुणीही देवू शकत नाही. पण जरांगे पाटील नवीन राजकीय नेतृत्व उदयाला आणू पहात आहे हे मात्र खरे! राजकारणाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये याच्या नावाने एक अध्याय नक्कीच लिहावा लागेल.
दीपिका पदुकोनच्या एका हातरुमाला एव्हढ्या भगव्या वस्त्राने पठाण प्रदर्शित होण्याआधीच आंदोलने चालू करून शाहरुखने पठाणचा खप वाढवला. हल्ली तसेच काहीसे गौतमी पाटीलचे झाले आहे. तिचे नाव घोषित केले की कार्यक्रम हाऊसफुल! नाहीतर आंदोलने, मारामार्या हे हुकमी एक्के आहेतच! मुळात हिला नाचता येते की नाही हा प्रश्नच आहे. बायकोमुळे बघायला पण जाऊ शकत नाही. बघुया एखाद्या कार्यक्रमाला आमच्या सोसायटीत आली तर!
तिसरे पाटील म्हणजे ललित पाटील. ड्रग किंगपिन! बहुधा राज्यातील सर्वच नेतेमंडळी याच्या खिशात असावीत. राज्याला सध्या अंमली पदार्थांनी विळखा घातला आहे. अगदी शाळेतील बारा वर्षांच्या मुलांपर्यंत हे पोचले आहे. आणि याला आळा घालायचा सोडून नेतेमंडळी एकमेकांवर चिखलफेक करत आहेत. बरोबर आहे. निवडणुका आल्या आहेत ड्रगमनी सगळ्यांनाच हवा आहे.
आईवडीलांनी मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. पण त्यांना वेळ असेल तर ना? दिवसभर आपली मुले काय करतात याचा बऱ्याच आईवडीलांना पत्ताही नसतो. दारू पिण्याची दीक्षा तर घरातच मिळते, आणि मुलांना काही कमी पडू नये यासाठी भरपूर पॅाकेटमनी पण दिला जातो. मग अजून काय हवे!
पंधरा सोळा वर्षांची मुले चोरून गाडीच्या किल्ल्या घेऊन भरधाव गाड्या चालवतात आणि निरपराध लोकांचे प्राण घेतात हे तर नेहमीचेच झाले आहे. RTO वाले फक्त पैसे कमवतात. अवैध पार्किंग, उलट्या दिशेने गाडी चालवणे हे नियमाच झाले आहेत. जोपर्यंत पकडले जात नाहीत तोपर्यंत कुणीही गुन्हेगार नाही. आणि ललित पाटील असाल तर पकडूनही काही फरक पडत नाही.
जाता जाता:
मुंबई गोवा मार्ग डिसेंबर पर्यंत पूर्ण होणार असे गडकरी म्हणाले, फक्त कुठचा डिसेंबर ते सांगायला विसरले.
शरद पवार यंदा पुण्यात दसरा मेळावा घेणार आहेत म्हणे! Secularism सोडून हिंदू धर्माची दीक्षा कधी घेतली यांनी!



Comments
महाराष्ट्रात पाटील राज्य करताहेत पण तरीही आमच्यावर अन्याय होत आहे असा कांगावा करायला विसरत नाहीत.आता तर कुणबी विरुध्द ९२/९६ कुळी मराठा यात वाद सुरु झाला आहे.अर्थात तो वाद पेटवायला काडी लावणारे कोण आहे ते सांगायची गरज नाही. दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिए ही म्हण गौतमी पाटीलला लागू पडते.सलवारीसारखी न ऊवारी 'घालून' लोकांपुढे हातवारे करत उड्या मारणं याला लावणी म्हणतात हे ज्ञान तिने पाजळले आहे.बिचाऱ्या लावणी कलावंत! निवडणुकींना पैसा लागतो तो पक्ष कुठून मिळवणार? म्हणून ललित पाटीलला कुठं कुठं लपवू असं साऱ्या पक्षांना झाले आहे.निवडणूक झाली की त्याचा पत्ता कट!
By : Pratibha Tarabadkar
खरंच सगळं भयावह आहे... कुठे कुठे आपण आपल्या जीवाची काळजी घ्यावी, मुलांना किती आणि कसं सगळ्या आक्षेपार्ह गोष्टींपासून दूर ठेवावं, ह्या घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा कितीही नाही म्हटलं तर मनावर परिणाम होतोच...... पण "असो" म्हणून पुढे पाहावं लागतं.... pov : you have not missed anything if you don't know Gautami Patil.
By : Pradnya Gore
iIts true
By : Mona