सासू, सून आणि बरेच काही!


सासू, सून आणि बरेच काही!

शशांक पुरंदरे

तुम्हाला सासू आणि सून या शब्दांची फोड माहित आहे का? सासू म्हणजे सारख्या सूचना, आणि सून म्हणजे सूचना नको ! हे तुम्ही कधीतरी ऐकले असेलच. हे ऐकून आपल्या ग्रुपमधील काही विशिष्ट समूहाच्या (हल्ली असे लिहिण्याची पध्दत आहे) भुवया नक्की उंचावल्या गेल्या असतील. आज याला काय झालंय, नको त्या विषयावर का भाष्य करतोय वगैरे विचार मनात आले असतीलच. पण माझ्या मनातील विचार मांडायला मला कुनाचं बी भ्या नाय! बाहेर आरडाओरडा ऐकायला येतोय. मोर्चा आलाय बहुतेक. येऊ देत!

सासूचा मुलगा जन्माला आला की सून ही येणारच. (हल्ली याला अपवाद आहेत पण आत्ता तो विषय नाही) हीच सून सासुरवास सोसून नंतर स्वत: सासू होणार. हे निसर्गचक्र अनंत काळ चालू आहे आणि चालू राहिल. पण यातून अनेक तंटे, राग-लोभ, रुसवे-फुगवे आणि अगदी पराकोटीची भांडणे जन्माला येतात. हल्ली अनेक टीव्ही मालिका देखील यामुळे जन्माला येतात. सासुसूनांचे भांडण नसेल तर मालिकेचा टीआरपी झोपतो. घटस्फोटाचे पहिले मुख्य कारण जर लग्न असेल तर दुसरे कारण सासू-सुनांची भांडणे हे आहे हे सर्व सासू आणि सुना देखील मान्य करतील. बिचाऱ्या नवऱ्याची किंवा मुलाची भूमिका यात मुकबधीराचीच असते. कारण तो कुणाचीच बाजू घेऊ शकत नाही.

या प्रकरणाची सुरुवात लग्नापासून, किंबहुना लग्न जमवण्यापासूनच होते. मुलीला शक्यतो आई नसलेला, स्वत:चे वेगळे घर असलेला नवरा हवा असतो. मुलाला बहुधा आईची निवड चालते. नशिबाने मुलीला एकत्र कुटुंबातलाच नवरा मिळतो. लग्नानंतरचे काही दिवस छान जातात. नंतर शेवटी तो दिवस उजाडतो. सुनेला स्वयंपाक करण्याची जबाबदारी दिली जाते. तिला फारसे काही माहित नसते. मग आईच्या फोनवरून सूचना ऐकून स्वयंपाक तयार होतो. मुलगा आणि घरातील इतर मंडळी छान आहे वगैरे म्हणून जेवतात. सासू नाक मुरडतच जेवते. आत किचनमध्ये राडा झालेला असतो. मग सासु-सुना मिळून आवरतात. सर्व काही वरकरणी आलबेल असते. पण काही दिवसांनतर ठिणग्या उडू लागतात.

खरतरं यात तसे बघितले तर दोघींचाही दोष नसतो. सासू इतके वर्षे आपल्या पद्धतीने घर चालवत असते. सून आपल्या पद्धतीने घर चालवण्याचा प्रयत्न करते. पण सून ही सुरुवातीला प्रोबेशनवर असते. मग सासुबाईंच्या सूचना सुरु होतात, पण सुनेला सूचना नको असतात. पुढे काय होते हे आपण सर्वांनी अनुभवले असेलच.

यात सासू आणि सून दोघीही समंजस असतील तर प्रॉब्लेम्स सुटतात आणि कालांतराने सर्व ठीकठाक होते. पण त्यातील एक किंवा दोघीही जर अडेलतट्टू असतील तर मग काही खरे नाही. एकतर सून-मुलगा दुसरे घर थाटतात किंवा गोष्ट कौटुंबिक न्यायालयापर्यंत जाते.

या कहाणीत अनेक वेगळेपण देखील असते. सासू-सुना दोघीही नोकरी करत असतात, किंवा सून नोकरी करणारी असते. तिला घरी काम करायला वेळ नसतो किंवा इच्छा नसते. सुनेच्या मुलाला सांभाळण्याचा प्रश्न निर्माण होतो. सुनेची आई किंवा नवऱ्याची बहीण नको त्या गोष्टीत आपली नाके खुपसत राहतात. पैशाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. एक ना अनेक गोष्टी असतात.

मी माझ्या आजूबाजूला अनेक घरे पहातो जिथे अनेक प्रॉब्लेम्स आहेत. पण अशा काही सासू-सुना देखील पहिल्या आहेत ज्यांच्यात आई आणि मुलीप्रमाणे जवळचे नाते आहे. माझ्या मते या संबंधांमधे दोघींनीही सामंजस्य बाळगणे आवश्यक असते. एकमेकींना स्पेस देणे महत्वाचे असते. तेव्हढीच कामात एकमेकींना मदत करणे आवश्यक असते. नोकरी करणाऱ्या सुनांनी देखील वेळात वेळ काढून सासूला मदत केलीच पाहिजे. बऱ्याच वेळा घराचा आर्थिक गाडा ओढण्यासाठी सुनेला नोकरी करावी लागते. किंवा सुनेला जर करीयर करण्याची इच्छा असेल तर त्यात चूक काय आहे? अशा वेळी सासूने समजून घेणे तितकेच गरजेचे आहे. शेवटी भांड्याला भांडे लागले तर आवाज येणारच. फक्त तो शेजाऱ्यांनी ऐकू नये हे महत्वाचे!

काही कारणांमुळे जर एकत्र राहणे शक्य नसेल तर वेगळे राहणे योग्य असते. कधी दूर राहून एकमेकांचे प्रेम जास्त दृढ होते.

यात नवऱ्याने काय करावे हा एक वेगळाच विषय आहे. पण बरेचदा त्याची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशीच असते. यात चूक किंवा बरोबर असे काहीच नसते. परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली तर हस्तक्षेप करावाच लागतो. पण दोघींच्या समोर एकीची बाजू घेणे हे अयोग्य आहे. त्यापेक्षा दोघींना वेगवगळे समजावणे चांगले असते.

मला जे वाटते ते मी लिहिले. यात प्रत्येकाची आपापली मते असू शकतात. कुटुंब न्यायालयाची पायरी चढायला लागू नये एव्हढीच माफक अपेक्षा आहे. हल्ली पायरी ऐवजी लिफ्ट वापरावी लागते एव्हढेच! म्हणतात ना, शहाण्याला शब्दांचा मार !

Comments

एकदम समर्पक लेख आहे....छान.

By : समीर पेशवे
12/06/2024 12 : 51 : 46 PM

सॉलिड observation आहे तुझं.... अगदी बरोबर लिहिलं आहेस माझी आई आणि माझ्या वहिनी यांच्यात मात्र अगदी आई लेकीचं नातं आहे

By : रोहिणी जोशी
16/06/2024 12 : 05 : 25 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article