सौ. एजन्सी


आमच्या बेडरूमचे पडदे सारण्याच्या आवाजाने मला जाग आली. खिडकीतून आलेली सूर्यकिरणे माझ्या डोळ्यावर पडली आणि मी डोळे उघडले.

“गुड मॉर्निंग सतीश!” माझ्या कानावर आवाज आला. मी वळून पाहिले तर एक पंचवीस वर्षाच्या आतबाहेरची सुंदर मुलगी मला गुड मॉर्निंग म्हणत होती. मी दचकलोच. घाईघाईने अंगावरचे काढलेले पांघरूण परत गळ्यापर्यंत ओढून घेतले. कारण मला फक्त हाफ पँट घालून झोपायची सवय आहे. आणि इथे तर एक पंचविशीतील तरुणी माझ्यासमोर उभी होती. पुरुषसुलभ लज्जेची लाली माझ्या गालावर चढल्याचे मला जाणवत होते.

“क..क..कोण तू...तू.तुम्ही?”
“मी सीमा. आणि मला तूच म्हण. मीपण तुला तूच म्हणणार आहे. त्यामुळे सर्व सोपे होईल.”
“काय सोपे होईल? तू कोण, आणि आमच्या बेडरुममधे सकाळी साडेसहा वाजता काय करत आहेस?”
“म्हणजे उमाताईंनी तुला काहीच कल्पना दिलेली नही वाटतं? मी सीमा, सौ. एजन्सी मधून आले आहे. मी तुझी हंगामी बायको आहे.”
“काय?” मी आंब्यांचा हंगाम, क्रिकेटचा हंगाम वगैरे ऐकला होता. बायकांचा पण हंगाम असतो हे मला नवीनच होतं.
“उमाताई दोन दिवस सहलीला गेल्या आहेत. त्या आमच्या एजन्सीमधे आल्या होत्या. त्यांनी आम्हाला दोन दिवसांचे कंत्राट दिले आहे. आम्ही गरजू व्यक्तींना हंगामी बायका पुरवतो. त्यानुसार तुमच्या बायकोच्या गैरहजेरीत त्यांची सर्व कामे आम्ही करतो. त्यामुळे तुमच्या सारख्या पुरुषांची बायको नसल्या मुळे गैरसोय होत नाही.”
बापरे! ऐकावे ते नवलच! आता ही बया दोन दिवस माझ्याबरोबर माझी हंगामी बायको म्हणून राहणार होती!
“चल, उठ. दात घासून घे. चहा तयार आहे.” असे म्हणून सीमाने बेडरूमची सीमा ओलांडली.

उठून मी आधी कपाटातला टी शर्ट अंगावर चढवला. अगदीच लाज जायला नको! दात घासून बाहेर आलो तर टेबलावर चहा आणि खुर्चीवर सीमा होती. तिच्या हातात चहाचा कप होता आणि समोर वर्तमानपत्र होते. सीमाने पांढरा शुभ्र टी शर्ट आणि जीन्स घातली होती. केस बॉब केलेले होते. अंगावर मेकप नव्हता की एकही दागिना नव्हता. मला उमाचे सकाळचे रूप आठवलं. अंगावर गाऊन, मोठं लांब मंगळसूत्र आणि विस्कटलेले केस! सगळ्या बायका सकाळी अशाच दिसतात म्हणा! पंचवीस वर्षाच्या लग्निक जीवनानंतरही उमा अजूनही छानच होती म्हणा! पण ही सीमा म्हणजे वेगळेच प्रकरण होते.

माझा टेबलावरचा मोबाईल किणकिणला. मी उचलण्या आधीच सीमाने उचलून कानाला लावला.
“हॅलो? चिन्मय!” असे म्हणून तिने तो माझ्या हातात दिला.
“बाबा, अरे कोणी उचलला फोन?”
“सीमाने.”
“बाबा, तुम्ही MRI काढून घ्या एकदा. आईचे नाव सीमा नाही, उमा आहे.”
“अरे, ही तुझी हंगामी आई आणि माझी हंगामी बायको आहे.”
“बाबा, झेपत नाही तर कशाला प्यावी एव्हढी? अजून उतरली नाही का रात्रीची?”
एक दीर्घ सुस्कारा सोडून मी चिन्मयला सर्व प्रकार समजाऊन सांगितला.
“भले,” हसून हसून लागलेला ठसका थांबल्यावर चिन्मय म्हणाला, “लगे रहो पिताजी, ऐश करो. तुमचं चालू द्या. उद्या आई आल्यावर फोन करा.” चिन्मयने फोन ठेवून दिला.
“चिन्मय, आमचा मुलगा. अमेरिकेत NY मधे MBA करतोय.” मी सीमाला माहिती पुरवली.
तिने नुसतीच मान डोलावून परत वर्तमानपत्रात नाक घातले.

यथावकाश चहापान झाल्यावर सीमा म्हणाली, नाश्त्याला इडली सांभार, चटणी sandwitch आणि तुला आवडतात म्हणून croissants आहेत. कधी नाश्ता हवाय ते सांग.”
“हे सगळं तू कधी केलंस? मी आश्चर्याने म्हणालो. ही हंगामी बायको तर भलतीच चुणचुणीत निघाली.

“मी नाही केलंय. आमचं एजन्सी पॅकेजमधे नाश्ता, लंच, डिनर सगळं देते. नाश्ता आत्ताच आलाय. लंचला काय हवंय ते सांग. हे आमचं मेनू कार्ड आहे.” मेनूकार्ड पुढे करत सीमा उद्गारली.
मला हळूहळू हे कंत्राट चांगलेच पचनी पडणार असं वाटायला लागलं होतं.
“तुझी आंघोळीची वेळ झाली की सांग. मी कपडे काढते.” हे ऐकून मी दचकलोच. ही मला आता आंघोळपण घालते की काय असा विचार मनात येईपर्यंत, “मला उमाताईंनी दाखवून ठेवले आहेत कपाटात कुठे असतात ते. टॉवेल बाथरूम मधे ठेवला आहे. तू विसरतोस घ्यायला!”, असे स्पष्टीकरण आले. उमाने माझ्याबद्धल हिला काय काय सांगितले होते कोण जाणे?

नाश्ता, आंघोळ करून मी घराबाहेर पडलो. वाईन शॉप मधून बियरचे कॅन्स विकत घेतले, कारण संध्याकाळी हेमंत येणार होता. उमा नाही म्हणून आमची पार्टी आधीच ठरली होती. घरी येऊन कॅन्स फ्रीज मधे ठेवले आणि मग लक्षात आले, की उमा नाही पण सीमा घरी आहे. आता आली का पंचाईत! पण शेवटी ती हंगामी बायको होती. तिला काय घाबरायचे? तिला स्पष्ट सागितले, संध्याकाळी मित्र येणार आहे, पार्टी आहे. तर या बयेने काय विचारावे?
“चकणा काय हवाय?” मग काय? अगदी माकडाच्या हाती कोलीत!
लंच झाल्यावर सीमा म्हणाली, “ताईनी सामानाची यादी दिली आहे. मी मार्केटमधून घेऊन येते.”
“तुमच्या कंत्राटात हे पण येत?” मी आश्चर्याने विचारले.
“हो, पैसे दे.”

मी उत्तरादाखल माझे क्रेडिट कार्ड तिच्या स्वाधीन केले. फ्रोझन सेक्शन मधून चिकन कबाब आणि स्वत:साठी Bacardi ब्रीझर आण म्हणून सांगायला मात्र विसरलो नाही.

“मघाशी शेजारच्या गोखले काकू आल्या होत्या. त्यांची साखर संपली म्हणून मागायला आल्या होत्या. एक वाटीभर काढून दिली आहे. वाटी संध्याकाळी परत आणून द्या हे पण सांगितले आहे.”
वय कितीही असले आणि हंगामी असली तरी शेवटी बायको ती बायकोच!
“बापरे, पण मग तू कोण म्हणून विचारलं असेल ना काकूंनी? आता गावभर बोभाटा करणार ही बया!” मी वैतागून म्हणालो.
“सतीश, तू फार काळजी करतोस! मी काकूंना सगळे व्यवस्थित समजावून सांगितले आहे. शिवाय आमचे एजन्सीचे कार्ड देखील दिले आहे. आठ दिवसांनी त्या माहेरी जाणार आहेत. तेव्हा आम्हालाच कंत्राट देतील असे म्हणाल्या आहेत. तेव्हढाच आमचा बिझिनेस वाढेल आणि मला बोनस मिळेल!”

संध्याकाळी आमची धमाल पार्टी झाली. सीमा गाते आणि नाचते पण खुप मस्त! हेमंतदेखील जाताना सौ. एजन्सीचे कार्ड घेऊन गेला. मेघाचे आठवड्याचे ट्रिपचे बुकिंग करतो म्हणालाय!

दहा वाजता किचन आवरून सीमा बाहेर आली आणि माझ्या हातात एक कागद दिला.
“हे काय?” मी विचारले.
“माझे आजचे बिल!”
त्यावरचा आकडा पाहून मी पडायचाच राहिलो होतो.
“तू क्रेडिट कार्डने ऑनलाईन पे करू शकतोस. मी येते आता.” सीमा म्हणाली.
“तू आता कुठे जातेस? दोन दिवसांचे कंत्राट आहे ना?”
“हो पण ते सकाळी सहा ते रात्री दहा इतकेच आहे. मी उद्या सकाळी येईन परत. किल्ली आहे माझ्याकडे.”

बाहेरचा दरवाजा बंद झाल्याचा आवाज झाला. नंतर बराच वेळ मी तो कागद हातात धरून त्यावरचा आकडा पहात होतो.
तुम्हाला कुणाला हंगामी बायकोची गरज असेल तर सांगा. माझ्याकडे सौ. एजन्सीची बरीच कार्ड आहेत. आणि त्यांची अजून एक श्री. एजन्सी आहे, ते हंगामी नवरे पण पुरवतात म्हणे!

Comments

नुसती धमाल 😂 मस्त फॅंटसी 🤗 पुरुष सुलभ लज्जा बिज्जा... एकदम मज्जा

By : प्रतिभा ताराबादकर
22/04/2023 1 : 37 : 57 PM

साॅल्लीड..आयडियाची कल्पना भारी. हेमांगी

By : हेमांगी
22/04/2023 1 : 54 : 22 PM

भन्नाट कल्पना!! अगदी वि आ बुवांच्या शैलीत कथा लिहिली आहे! लगे रहो!!

By : Bhalchandra Shrikhande
22/04/2023 1 : 57 : 21 PM

मस्त काय काय सूचू शकते रे ....... पण कल्पना एकदम भन्नाट आहे...अनुभव घ्यायला काहीच हरकत नाही.

By : मनीषा पोतदार
22/04/2023 4 : 45 : 23 PM

Fantastic idea!!!!! We also heard of this 'hangam' for the first time. 😅😂

By : Madhuri Vartak
22/04/2023 11 : 00 : 12 PM

Fantastic idea!!!!! We also heard of this 'hangam' for the first time.😅😂

By : Madhuri Vartak
22/04/2023 11 : 02 : 45 PM

कल्पना भन्नाट आहे, वाचताना मजा आली. लगे रहो.

By : वीणा कडेकर
24/04/2023 09 : 43 : 53 AM

कल्पना एकदम भारी आहे.

By : Shubhangi Railkar Joshi
24/04/2023 10 : 02 : 04 PM

Wah wa...mazza aa gaya...keep going...

By : Raju Chitale
25/04/2023 09 : 13 : 22 AM

The core concept of the story is very helpful. Any one interested can start buearu and supply as per demand.i really wonder where you found out such stories. You are genious to draw such ideas but also try to implete it to the possible extent.

By : Prasad khare
25/04/2023 10 : 13 : 17 AM

😂😂😂कसली मस्त भन्नाट कल्पना कशी काय सुचले मस्तच वाचताना अगदी आठवण येत होती तुमची

By : Pratibha Sumant
25/04/2023 3 : 32 : 36 PM

खयाली पुलाव फारच रुचकर 😆

By : स्वाती मराठे
22/09/2024 09 : 37 : 20 AM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article