आमची चाळीतील ५० वर्षे


१९५७ साली माझे लग्न झाले. मला एकटे राहण्याची अजिबात सवय नव्हती. माहेर आणि सासर दोन्ही घरे माणसांनी फुललेली असायची. ह्यांना सख्या अशा फक्त दोन बहिणी होत्या. त्यामुळे लहानपणापासून ते काका-काकूंकडेच वाढले. नोकरी मुंबईत असल्यामुळे आम्ही लग्नानंतर दादरला त्यांच्या काकांकडे मुक्काम ठोकला. माझी सासरची सर्व मंडळी सुशिक्षित आणि अतिशय चांगली होती. त्यामुळे दोन-तीन वर्षे मी त्यांच्याबरोबरच काढली. पण पुढे काकांची मुले पण मोठी झाली आणि माझा संसारही वाढत होता. जागा वगैरे सगळ्याचा विचार करून आम्ही सायन चुनाभट्टी येथे बिर्‍हाड थाटले. चुनाभट्टीच्या या घरानेच मला सुख, समृद्धी, आपलेपणा, प्रेम आणि जगण्यातल्या बऱ्याच चांगल्या गोष्टी शिकवल्या.

चुनाभट्टीच्या चाळीत आम्ही रहायला आलो खरे, पण त्यावेळी चुनाभट्टी म्हणजे डास, माश्या, दलदल, सरपटणारे प्राणी, बेडूक यांचेच घर होते. जंगलच होते ते! आणि भरीला अट्टल गुन्हेगारी, मारामार्‍या, खून यांची भाऊगर्दी! स्वयंपाकघर आणि एका खोलीच्या त्या घरात गणेशाला स्मरून आम्ही १९६० साली प्रवेश केला. वास्तविक पु. लं. च्या गिरगावातील चाळीप्रमाणे आमची चाळ नव्हती. चार भाडेकरू अशी एक विंग आणि तीन मजली वाडी. ह्यामध्ये बिर्‍हाडाला त्रास होईल असे काहीच नव्हते. आणि मुख्य म्हणजे आम्ही दोघे आणि प्रत्येकाला एकेक बाळ एव्हढेच लोक एका घरात होते. त्यामुळे कुणालाही कोणत्याही प्रकारची अडचण भासू शकली नाही. उलट, राहिला आल्याबरोबर एका महिन्यातच चुनाभट्टी स्टेशन सुरु झाले आणि व्हीटी, बांद्रा, कुर्ला, ठाणा इथपर्यंत प्रवास सहज साध्य झाला.

दोन चाळी आणि बाकीच्या आठ बिल्डींग्स अशी आमची सोसायटी होती. बरेचसे सोसायटीतील जागेचे मालक समवयस्क आणि मध्यम स्थितीतील होते. त्यामुळे सोसायटीतील वातावरण खूपच चांगले होते. एकमेकांना मदत करणे, सर्वांना जाणून घेणे हे आपोआपच होत असे. तरीदेखील कुणीतरी एखादे वेळी, अरे, तुम्ही चाळीत राहता! असे कुत्सितपणे विचारी. तरीदेखील त्यांच्यावर न रागावता आम्ही त्यांना चाळीतले सुख तुम्हाला काय माहित असे हिणवत असू.

खरोखरच आमची चाळ, विशेषत: आमची विंग, म्हणजे आमची चार बिर्‍हाडे अगदी एका घरातली असल्या सारखीच होतो. मी त्या घरी रहायला येण्या आधीच माझ्या शेजारच्या सोनटक्के काकूंनी माझ्यासाठी भांडेवाली बघून माझे घर झाडून पुसून व भांडी घासून घेतली होती. मी वाण सामान वगैरे आणून घरी लावले आणि माझा घर संसार सुरु झाला. आईकडे असल्यापासून मला घर, स्वयंपाक या सर्वांचीच कामाची सवय असल्यामुळे फारसे जड जात नव्हते. शेजारच्या काकू मुलाला खूप सांभाळत. त्यांना मुलांची आवड तर होतीच पण त्यांची मुलगी मोठी होती. त्यामुळे त्यांना वेळ असे. तरी त्या मुलांचे खूप प्रेमाने करत असत. त्यांचा मला खूपच आधार होता. वडील बहिणी प्रमाणे त्या मदत करत असत. आणि दुसरे म्हणजे आम्ही चार बिर्‍हाडे एकमेकांत इतकी गुंतून गेलो की दुपारचे खाणे जरा वेगळे केले, तर ते चारी बिर्‍हाडांत दिले जाई. दिवाळी, होळी, गणपती उत्सव, १ मे हे तर जोरदारपणे उत्साहात साजरे होत. दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला गाण्याचा कार्यक्रम गच्चीवर आखला जाई. १२ नंतर कॉफीपान होत असे. दिवाळीची भाजणी रोज एकेकीची भाजून आम्ही घरीच दळत असू. मसाले एकत्र तयार करून वाटून घेत असू.

आमच्या सोसायटीतील मुले साधारण समवयस्क आणि सायनच्या ध. श्री. हायस्कूलचे विद्यार्थी असल्यामुळे सकाळी बरोबर शाळेत जाणे, एकत्र अभ्यास करणे, एकत्र संध्याकाळी क्रिकेट, डबा ऐसपैस, लपंडाव असे खेळ खेळून त्यांचा धुडगूस सुरु असे. या सर्व मुलामुलींचा एक ग्रुपच तयार झाला होता. पण त्यांच्यात कधी फार मोठी भांडणे किंवा मारामार्‍या वगैरे होत नसत. छोटेमोठे वाद किंवा चकमकी झाल्या तरी देखील वडील मंडळी त्या टोकाला नेत नसत, आपापसातच ते मिटवत असत.

आम्हा चाळीतील बायकांची देखील कधी कडाकडा भांडणे झाल्याची मला आठवत नाहीत. उलट हरितालिका, वटपौर्णिमा या पूजा ठरवून तीन्ही मजले मिळून एका घरात होत असत. रात्री जागरण करून बारा वाजता कॉफी वगैरे पिऊन आम्ही घरी परतत असू. मुली मोठ्या झाल्यावर त्यांच्या मंगळागौरी वगैरे झाल्या तर सर्व चाळीला रात्री जागरणाचे व फराळाचे आमंत्रण असे. रात्री जागरण करून जुने खेळ, गाण्याच्या भेंड्या यामध्ये वेळ कसा जाई हे लक्षात पण येत नसे. त्यामुळे गरीब श्रीमंत भेद, भांडणे याला पूर्णपणे आळा बसला. एकमेकांची चांगल्या वाईट प्रसंगी निर्मळ प्रेम, आपलेपणा याची जाणीव निर्माण झाली आणि हीच जाणीव आजही आमच्या मुलांच्यात दिसून येते. नोकरी निमित्त किंवा जागे अभावी जरी हे मित्र दूरदूर निघून गेले असले पण त्यांच्यातील प्रेम आदर अजूनही आम्हाला जाणवतो. खूप दिवसांनी ते परत सोसायटीत आल्यावर एकमेकांना भेटल्याशिवाय परत जात नाहीत.

दादरच्या छबिलदास (मुलींच्या) हायस्कूलचे मुख्याध्यापक श्रीयुत बर्वेसर आणि सत्यकथेचे संपादक श्रीयुत राम पटवर्धन हे पण आपल्या चाळीत रहात असतं पण आपण कोणी खूप मोठे आहोत हे त्यांच्या वागण्यातून कधी जाणवू दिले नाही. अतिशय निगर्वी, नम्र वृत्तीने ते सगळ्यांत मिसळत. साधी रहाणी आणि उच्च विचारसरणी याचे अद्भुत मिश्रण त्यांच्या वागण्यात दिसत असे. यानंतर २६ वर्षांपूर्वी श्रीयुत बाळ लिमये, प्राध्यापक आंबर्डेकर, श्रीयुत राणे, श्रीयुत वैद्य यांनी वसंत व्याख्यान मालेची स्थापना केली ती आजपर्यंत आमच्याकडे चालू आहे.

या व्याख्यानमालेतून आम्हाला अनेक बुद्धिमान लोकांचे चांगले विचार ऐकायला मिळाले. नाट्य व चित्रपटसृष्टीतील कलावंतांच्या कला बघायला मिळाल्या. सुधीर फडके व श्रीधर फडक्यांसारखे अनेक चांगले गायक आम्ही ऐकले. या सर्वामुळे आम्हाला चांगले व उच्च विचार ऐकण्याची सवय लागली, चांगल्या वाईटाची जाण निर्माण झाली आणि मानसिक समृद्धी प्राप्त झाली.

एकमेकांबद्धल ओढ, प्रेम, सहकार्य, सुखदु:खात एकमेकांना मिळालेली साथ, सुखदु:ख वाटून घेण्याची सुबुद्धी निर्माण झाली. दु:ख शीतल झाले आणि सुखाची बरसात झाली. या गोष्टींमुळे जीवनातील कोणत्याही लहानसहान व खूप मोठ्या प्रसंगातही निभावून नेण्याची ताकद मनात निर्माण झाली. प्रसंगी आपण एकटे आहोत ही भावना नष्ट होऊन आपल्याला मदत करणारे हात सदैव आपल्या जवळ आहेत ह्याची खात्री झाली आणि जीवन जगण्याचे एक आगळे वेगळे चैतन्य स्फुरण पावले. मन शांत आणि निर्भय झाले आणि कळले की तू एक हात पुढे केलास तर असंख्य हात तुला सोबत करतील. ह्या चाळीमुळे जीवनाचा एक अनमोल सिद्धांत मला लाभला आणि आयुष्यात सर्वकाही मिळवल्याचा उत्कट आनंद प्राप्त झाला.

आणखी काय हवं! धन, पैसा, संपत्ती हे काही सर्वच आपल्याला मिळवून देत नाही. याचा कधीतरी नाश होतो आणि ते देवूनही आपल्याला खरा आनंद मिळेलच असे नाही. आज मी माझ्या जीवनात आनंदी, तृप्त आहे याचे बरेचसे श्रेय माझ्या चाळकरी मैत्रिणींना आहे. त्यांनी त्यांच्या प्रेमळ वागणुकीतून, आपलेपणातून, सहकार्यातून मला खूप काही शिकवले. ते या जगाच्या बाजारात मोल देऊनही शिकता येणार नाही. त्यांची मी आजन्म ॠणीच राहीन.

मार्च २७, २०१४.

माझ्या आईचे २२ ऑक्टोबर, २०१८ रोजी निधन झाले. तिने लिहून ठेवलेल्या काही आठवणी या लेखात नमूद केल्या आहेत.

- शशांक पुरंदरे

Comments

लेख वाचताना जुन्या आठवणी जाग्या झाल्या.माझं बालपण जरी माटुंग्याला गेलं असलं तरी काही काळ चुनाभट्टीत होते त्यामुळे तो काळ पुनः जगले. पुरंदरे काकूंची भाषा अतिशय ओघवती आहे.सकारात्मक आणि शेजाऱ्यांचा आदराने उल्लेख करणारी.वाचताना प्रसन्न वाटले.

By : Pratibha Tarabadkar
31/05/2023 8 : 23 : 18 PM

खूपच छान ! कृतांत आयुष्य🙏

By : ऋता कुलकर्णी
31/05/2023 8 : 25 : 30 PM

खूप छान. साधं, सरळ, समाधानी आयुष्य. आणखी काय हवे. आमची भेट ऑक्टोबर २०१४ ला झाली होती त्या वेळच्या आठवणी ताज्या झाल्या.

By : Sanjay Korgaonkar
02/06/2023 8 : 49 : 29 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article