नात्यांची गोष्ट : भाग १३ : १२० एम एल
लंच टाईम मधे रव्या म्हणाला, “ आज शुक्रवार आहे. मला आणि मृणालला कॅान्फरन्स कॅाल पण नाहीये. बसायचं का?”
बसायला आम्ही नेहमीच तयार असतो.
“आदितीला विचारून कन्फर्म करतो, पण बहुतेक काही प्रॅाब्लेम होऊ नये.”
“ओके, आठ वाजता माझ्याकडे.”
“डन, सब्जेक्ट टू कन्फरमेशन फ्रॅाम एचक्यू!”
आम्ही बरोबर आठ वाजता रव्याकडे पोचलो. अशा बाबतीत मी वेळेचा पक्का आहे. रव्याचे घर म्हणजे एक प्रशस्त डुप्लेक्स बंगला आहे. खाली लिव्हिंग रूम आणि किचन आहे आणि वर चार बेडरुम्स आहेत. लिव्हिंग रूममधे एका बाजूला सीटींग स्पेस आणि वेल इक्विप्ड बार आहे. आम्ही अर्थातच तिथे स्थानापन्न झालो.
रवि आणि मृणाल दोघेही सॅाफ्टवेअर एक्सपर्ट आहेत. एक काळ असा होता की रवि सॅाफ्टवेअर मार्केटिंगसाठी दिवसच्या दिवस बाहेर फिरत असायचा. घरापेक्षा हॅाटेलमधेच जास्ती काळ घालवला जायचा. लिव्हिंग आऊट ऑफ सुटकेसचं रवि उत्तम उदाहरण होता. सर्व हुशार माणसांप्रमाणे रवि पण थोडासा अॅबसेंट माइंडेड आहे. पण एक दिवस त्याने हद्द केली. सकाळी एअरपोर्टवर उतरल्यावर हॅाटेलमधे चेकइन् करून दिवसभर काम करून रात्रीच्या फ्लाईटने दुसऱ्या सिटीला जाण हे रविचं रूटीन झालं होतं. सकाळी दहा वाजता मला फोन करून मला अपडेट देणं हेही त्याचं रोजचंच काम होतं.
त्या दिवशी देखील नेहमीप्रमाणे त्याचा फोन आला.
“हाय अशोक!” रवि.
“हॅलो रवि, कुठे आहेस?” मी.
“आत्ताच हॅाटेलला पोचलो. आता फ्रेश होऊन कामाला लागेन.” रवि.
“हॅाटेलमधे? का?” मी.
“मग काय एअरपोर्टवरच राहू की काय?” रवि.
“अरे पण मृणाल कुठे आहे?” मी.
“ती घरी असेल.” रवि.
“मग तू का हॅाटेलमधे आहेस? मुंबईला आला आहेस ना?” मी जरा काळजीनेच विचारले.
“ओह माय गॅाड, मी नेहमीच्या सवयीने हॅाटेलमधे चेकइन् केले. मुंबईत घर आहे तेच विसरलो!”
रवि उद्गारला. त्यानंतर रविने महिनाभर एकही टूर केली नाही.
“काय घेणार?” रविच्या प्रश्नाने मी भूतकाळातून बाहेर आलो.
“नेहमीचंच.” मी म्हटले.
मी व्हिस्कीचा भोक्ता आहे हे रविला माहित आहे. रविचे देखील हे लाडके पेय आहे. कॉलेजपासून आमची मैत्री ज्या अनेक कारणांनी टिकून आहे आहे त्यापैकी १२० एम एल व्हिस्कीचं सिमेंट सर्वात महत्वाचं कारण आहे. व्हिस्की हे एक अजब पेय आहे. मका, मोहरी, बार्ली, गहू, सातू इत्यादी गोष्टी वाळवून फसफसवून डिस्टिलेशन करून अल्कोहोल एक्स्ट्रॅक्ट करून ओकच्या कास्कस् मध्ये एजिंग करण्याची प्रक्रिया ज्याने शोधली त्याला मानलं पाहिजे.
मृणाल आणि आदिती त्यांचे वाईन ग्लासेस घेऊन आम्हाला जॉईन झाल्या. मी वाईन फारशी पीत नाही. एकदा वाईन टेस्टिंग साठी एका व्हिनेयार्डला भेट देण्याचा योग आला होता. त्यामुळे वाईन अंगूर की बेटी आहे एवढे माहित होतं. त्या व्हाईट, रेड, स्पार्कलिंग आणि रोझ फ्लेवर्स मध्ये मिळतात हे पण माहित होतं. पण टेस्ट करताना पिण्याऐवजी थुंकणे जास्ती महत्वाचे आहे हे ऐकून न पिताच मला भोवळ आली होती.
इतर सामान्य लोकांप्रमाणे आमचे पिण्याचे पहिले धडे कॉलेज मधेच गिरवले गेले. तारुण्याच्या धुंदीत पाचसहा पेगनंतर बाईक चालवू नये हे देखील आम्ही तेव्हाच शिकलो. रविने मृणालला प्रपोज करावे म्हणून त्याला भरपूर पाजूनही पठ्ठयाला काही जमलं नाही. शेवटी मृणालनेच पुढाकार घेतला म्हणून बरं नाहीतर स्वारी अजूनही रडत बसली असती! आता मात्र आम्हा सर्वाना आमचे लिमिट माहिती आहे आणि यदाकदाचित कधी विसरलो तर आठवण करून द्यायला आमच्या अर्धांगिनी आहेतच!
मृणाल आणि अदिती या दोघीही जगजीत सिंगच्या फॅन आहेत, त्यामुळे बॅकग्राउंडला त्याची गझल कानावार पडत होती,
होशवालोंकॉ खबर क्या जिंदगी क्या चीज है
इश्क कीजे फिर समझीये बेखुदी क्या चीज है
“तुम्हाला आपल्या कॉलेज मधल्या पार्ट्या आठवतात का रे? कसली धमाल केली आपण!” मृणाल म्हणाली. “तृप्तीकडची पार्टी तर भन्नाट झाली होती. रात्रभर जागलो होतो आपण! काय एकेक नमुने होते ग्रुपमध्ये!”
आदिती जरी आमच्या आयुष्यात नंतर आली असली तरी तिला आमचा इतिहास पूर्णपणे ठाऊक आहे. त्यामुळे आमच्या गप्पांमध्ये तिलाही तेव्हढाच रस असतो.
“सगळ्यात मोठा नमुना म्हणजे चंद्या! चार पेग झाले की स्वारी ओक्साबोक्शी रडायलाच लागायची.” मृणाल.
“पण झेपत नाही तर घ्यावी कशाला?” अदिती.
“आपलं लिमिट वयाची पन्नाशी झाल्यावरच समजतं.” मी.
“तो बंगाली कोण होता रे? टोपण! खरं तर त्याचं नाव तपन होतं. पण शेवटी बंगालीच ना!” मृणाल उद्गारली.
“अरे तो एकदा मध्यप्रदेशात ट्रीपला गेला होता. तिथे एका गाईडने त्याला शायरी शिकवली म्हणे. ती त्याने त्या पार्टीत म्हणून दाखवली. खरा शेर असा होता,
न गिला है न शिकवा है
तुम सलामत रहो यही दुआ है
पण साहेबांनी तो खास बंगाली शैलीत ऐकवला,
न गिला है न सूखा है
तुम साला मत रहो यही दुआ है
हसून आमची पोटं दुखायला लागली. अजून दोन पेग ‘खाल्यावर’ टोपणचा परत तपन झाला. त्यानंतर पार्टीत एक शब्दही बोलला नाही तो!”
“अजय जरा जादाच होता. तो स्वतःला मोठा गायक समजायचा. पण त्या दिवशी अशोकने त्याची काठीच काढली.” आता रवि फॅार्मात आला होता.v
“जरा कुठे प्यायला सुरवात झाली की अजयला गायची लहर यायची. त्याचा आवाज, सूर, ताल याचा कुठेही मेळ नसायचा. गाऊन झाल्यावर आम्ही सर्व उपहासानेच टाळ्या वाजवायचो. एकदा गाणं संपल्यावर मी त्याला म्हणालो, ’ अजय, मी पण थोडफार शास्त्रीय संगीत शिकलोय. त्यातून तुझ्या गायकीच्या काही गोष्टी मला प्रकर्षाने जाणवल्या. मी थोडं बोलू का?’ ‘हो, हो बोलना!’, अजय एकदम खुशीत येऊन म्हणाला. मी म्हटलं, ‘तुझं गाणं अफलातून आहे. तुझा खर्ज एव्हढा उंच लागतो की त्याला तोड नाही. तुझे उंच स्वर एव्हढे खर्जात तू कसे आणतोस ते पण मला समजत नाही. आणि मध्यमाबद्धल काय बोलावे? मला तर वाटते, तुझ्यासारखा तूच!’. रव्यातर खुर्चीवरून पडायच्याच बेतात होता. पण मी त्याला घट्ट पकडून ठेवला होता म्हणून बरं!”
“हा अशोक पण ग्रेट आहे”, अदिती म्हणाली, ”त्याला वेगवेगळ्या कल्पना कुठून सुचतात कोण जाणे? एकदा आम्ही एका कामाकरता सकाळीच ब्रंच करून घरातून बाहेर पडलो. कामामुळे दिवसभर काहीही खाल्लं नव्हतं. संध्याकाळी घरी परतताना हा मला म्हणाला, ‘आता रात्रीच एकदम ड्रंच करुया.’ ‘म्हणजे?’ मी विचारले. ‘म्हणजे डिनर आणि लंच!’. अशोक म्हणाला. अर्थात मी पण काही कमी नाहीये, ‘अच्छा, मला वाटलं ड्रिंक्स आणि लंच!’
गेल्या वर्षी ‘द स्टुडिओ’ ला साडेतीन कोटींचे कॅान्ट्रॅक्ट मिळाल्यावर आमची जंगी पार्टी झाली. सर्वजण भरपूर प्यायले होते. आपण कितीही प्यायलो तरी काही होणार नाही असा बऱ्याच जणांचा गैरसमज असतो. अन्या पण त्यातलाच एक आहे. माझा पार्टनर, दिसायला हँडसम, अविवाहित आणि एकदम फ्लर्ट! कायम माझ्या मागे असतो. अर्थात त्याला लांब कसं ठेवायचे हे मला बरोबर माहित आहे. त्या दिवशी स्वारी पिऊन टाईट झाली होती. मग त्याचे फ्लर्टिंग सुरु झाले. एकदोनदा माझ्या गळ्यात हात टाकायचा प्रयत्न केल्यावर मी त्याचा ग्लास त्याच्याच डोक्यावर उलटा केला. तेव्हा कुठे तो ताळ्यावर आला. त्यानंतर आजतागायत कधी त्याने माझ्याशी मिसबिहेव केले नाही. तो अजूनही चांगला मित्र आहे माझा. पण कधीकधी लिकर भल्याभल्यांना पण आपले लिमिट दाखवते याचं हे उत्तम उदाहरण आहे, चियर्स!” म्हणून अदितीने आपला ग्लास संपवला.
“रविने मला प्रपोज करावं म्हणून त्याला तुम्ही लोकांनी त्या दिवशी त्याला भरपूर पाजलीत”, मृणाल म्हणाली. ”आज काम होणार म्हणून मी पण अधिरतेने हा कधी विषय काढतो त्याची वाट बघत होते. अपेक्षेप्रमाणे पार्टी संपल्यावर रवि मला म्हणाला की मी तुला घरी सोडतो. माझ्या हार्टबीट्स हळूहळू वाढत होत्या. बाईकवर मागे बसल्यावर माझ्या हृदयाचे ठोके रविला ऐकू येतील याची मला खात्रीच होती. घराबाहेर बाईक उभी केल्यावर रवि मला म्हणाला,
‘मला तुला काहीतरी सांगायचे आहे.’
‘मग सांगना.’ मी उत्सुकतेने म्हणाले.
‘आज तू छान दिसतेयस.’
‘थँक्यू!’
‘उद्या काय प्रोग्राम आहे?’
‘अरे, कॉलेज आहे ना’
‘अरे हो, मी विसरलोच! बरं मग, भेटू उद्या.’
‘अरे पण तू, काहीतरी बोलणार होतास.’
‘हो ग, पण आता खूप उशिर झालाय ना!, उद्या सांगतो.” असं म्हणू रविने बाईकला किक मारली. मी ‘अरे पण--- ‘ म्हणेपर्यंत स्वारी गुल! असा राग आला ना मला या माणसाचा!”
“रव्या,” मी रविला विचारले, “ तुला काय प्रॉब्लेम होता रे विचारायला?”
“खरं सागू,” रवि म्हणाला “ मला सारखी भीती वाटायची की ही मला नाही म्हणणार, म्हणून माझी विचारायची छातीच होत नव्हती.”
“व्वा!, खरा मर्द आहेस गड्या! इतर बाबतीत तुझं डोकं व्यवस्थित चालतं, इथेच का घोडं पेंड खात होतं रे?”
“काय माहित, पण असं होतं खरं!”
बघा, म्हणजे दारू हे जरी केमिकल सोल्यूशन असलं तरी त्यांनी सर्वच प्रश्न सुटतातच असं नाही.
मृणालच्या हाताच्या चविष्ट जेवणाचा आस्वाद घेऊन आम्ही रवि आणि मृणालला गुडनाईट करून घरी जायला निघालो. गाडीत बोलता बोलता अदिती म्हणाली,
”पिणं वाईट असं सर्व (न पिणाऱ्यांच) मत असतं. काहीजण स्वत: पीत नाहीत पण इतरांनी पिण्याबद्धल त्यांचा आक्षेप नसतो. ह्या दुसऱ्या वर्गातील लोकांना पार्टीला बोलावणं मात्र परवडत नाही. अहो सगळा चकणा खाऊन टाकतात हो! माझ्या मते लिमिट मध्ये पिणं वाईट नाही. शेवटी आपल्याला एकच आयुष्य मिळतं. ते सर्वपरीने एन्जॅाय करावं असं माझं मत आहे. बाकी ज्याचे त्याने ठरवावे.”
एका बायकोकडून मिळालेली ही एनडोर्समेंट ऐकताना गाडीचा ताबा सुटून पिऊन गाडी चालविण्यासाठी जेल मध्ये जाण्याची ऑलमोस्ट वेळ आली होती माझ्यावर!



Comments
Khup Chan
By : Smita Cyril David
This subject is not my cup of tea so can't comment.
By : Pratibha Tarabadkar
पिणाऱ्यांचे किस्से प्रत्येक पिणाऱ्या कडे असतात. आणि ते बहुधा मनोरंजकच असतात. पण ते कागदावर उतरवणं हे तुझ्यासारख्या एखाद्यालाच जमतं
By : संदीप नाचणे