शिवनेरी : परतीचा प्रवास


शिवनेरी : परतीचा प्रवास

शशांक पुरंदरे

टीप: ज्या वाचकांनी माझी शिवनेरी ही कथा आधी वाचली नसेल तर ती वाचून मग ही वाचावी.

मोठ्या कष्टाने पुलमन ओढत ओढत मी स्वारगेटला त्या शिवनेरी मधे शिरलो. माझ्या मागोमाग मानसी तिची पुलमन ओढत वरती चढली. सकाळी सहाची बस, सोमवारची सकाळ, पण पूर्ण भरलेली होती. आम्हाला कशीबशी दोन तिकिटे मिळाली होती ती देखील मार्गिके जवळची, पण नशिबाने एकाच रांगेत होती. पण त्यामुळे मी एका बाजूला, मानसी एका बाजूला आणि मध्ये मार्गिका! एक तर सकाळी पाचला उठून साडेपाचला घरातून निघालो होतो. रात्री झोपायला उशीर झाला होताच. शरद आम्हाला सोडून उरलेल्या झोपेची भरपाई करायला परत गेला होता.

सायलीच्या लग्नात तीन दिवस कसे गेले ते समजलेच नाही. पहिल्या दिवशी संगीत, मग लग्न आणि नंतर घरी पूजा! झोप तर खूपच कमी मिळाली होती. आम्ही खूप दमलो होतो पण मुंबईला जाऊन कामावर रुजू होणे भाग होते.

मी एका चार्टर्ड अकाउंटंट कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करत होतो तर मानसीची स्वत:ची फॅशन डिझाईनची कंपनी होती. त्यामुळे आम्हाला तातडीने मुंबईला पोहोचणे भाग होते.

मी घरून फॉर्मल कपड्यात तयार होऊनच आलो होतो. मानसी अर्थातच तिच्या कंपनीला साजेश्या पेहरावात होती. झोपेतून जरी उठून आली असली तरी हॉट दिसत होती. अर्थात ती कधीही हॉट दिसते ती गोष्ट वेगळी! अगदी रात्री पण, पण जाउदे, तो विषय आत्ता नको.

मी दोघांच्या पुलमन वरती टाकल्या आणि माझ्या सीटवर बसलो. माझ्या बाजूला एक स्त्री आधीच खिडकीकडे तोंड करून निद्रिस्त झाली होती. मागून तरी आकर्षक असावी हे माझ्या पुरुषसुलभ नजरेने लगेच हेरले. अंगात पांढरा शुभ्र शर्ट, खाली निळी जीन्स आणि पाठीवर मोकळे सोडलेले केस! पण त्यामुळे चेहरा दिसत नव्हता. हे सर्व अर्थातच मानसीने पण बघितले होते, पण तिच्या बाजूला विशीच्या आतबाहेर असलेली युवती बसलेली होती, सीट्स बदलून काही उपयोग नव्हता. त्यामुळे मानसी डोळे वटारण्या व्यतिरिक्त काही करू शकत नव्हती. मी तिच्याकडे बघून एक छद्मी हास्य केले. अर्थात माझ्या मनात तसे काही नसते हे तिलाही माहित होते.

"बस फक्त वीस मिनिटे थांबेल." चालकाच्या आरोळीने मी दचकून जागा झालो. तीन दिवसांच्या शिणवट्यामुळे मला कधी झोप लागली होती ते समजलेच नाही. मोठ्या कष्टाने मी डोळे उघडले. माझे लक्ष शेजारी बसलेल्या स्त्रीकडे गेले. मी तिला पहिले, तिने मला पाहिले आणि आम्ही दोघे एकदमच ओरडलो."तू!!!"

"स्वाती?" "भैय्या???" "अरे यार, आता तरी भैय्या म्हणू नकोस मला!" मी आणि स्वाती कॉमर्सला चार वर्षे एकत्र होतो. सर्व मित्रांनी माझे नाव अभय वरून भैय्या केले होते. "होतीस कुठे इतके वर्ष?" मी आश्चर्याचा धक्का ओसरल्यावर पृच्छा केली.

"मी!? आणि आपण कुठे होतात?" या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नव्हते. बी. कॉम. नंतर आमच्या सर्व ग्रुपची पांगापांग झाली होती. काही महिने संपर्क होता पण नंतर सर्वच जण आपापल्या मार्गाने गेले. आज जवळजवळ पंचवीस वर्षांनी स्वाती मला भेटत होती.

"एकटीच आहेस का अजून कोणी आहे बरोबर?"
काही न बोलता स्वातीने एक बोट दाखवले.
"अजून माझी वाट पहात थांबली आहेस की काय?"
"अजूनही तुझा फ्लर्ट करायचा स्वभाव बदललेला दिसत नाहीये." आमचे हे सर्व संभाषण मानसी अचंब्याने कान देऊन ऐकत होती. आता तिने संभाषणात उडी मारली.

"ओ भैय्यासाहेब, मी आहे बाजूला अजून! सरळ माझ्यासमोर दुसर्या बाईशी फ्लर्ट करतो आहेस!" मानसी हसत हसत म्हणाली.
"अरे हो, स्वातीला बघितलं की सगळं विसरायला होतं मला." मी पण काही कमी नव्हतो. "स्वाती, ही मानसी, माझा लगाम हिच्या हाती असतो आणि मानसी, ही स्वाती, आम्ही बी. कॉमला चार वर्षे एकत्र होतो."
"ओह, म्हणजे भेजा कम बॅच!" हे ऐकून स्वाती खळखळून हसली. "मला आवडली तुझी बायको!" स्वाती म्हणाली.
"आणि मलाही तू आवडलीस! तू म्हटलं तर चालेल ना?" मानसी म्हणाली.

"ओ भैय्या, तुम जरा इधर बैठो. मला स्वातीकडून तुझी सगळी सिक्रेट्स ऐकायची आहेत." असे म्हणून मानसीने मला माझ्या जागेवरून उठवले. आलिया भोगासी असावे सादर असे मनाशी म्हणत मी मानसीच्या जागेवर जाऊन बसलो.

बाजूच्या सीटवरील मुलगी हे सर्व ऐकत होती. मी बाजूला बसल्यावर मला तिने "हॅलो अंकल" केले आणि वर "की हॅलो भैय्या म्हणू?" अशी विचारणा करून स्वत:च खोखो हसली.
"तू पण हे सर्व ऐकत होतीस?"
"मी काय, सर्व बस ऐकत होती, इतक्या मोठ्यांनी तुम्ही बोलत होता. मी पूजा."
"आणि मी भैय्या!" मी म्हटले. पूजा परत हसली.

नंतर मी आणि पूजा बराच वेळ गप्पा मारत होतो. तिकडे स्वाती आणि मानसी पूर्वापार मैत्रीणी असल्यासारख्या गपा मारत होत्या. काय बोलत होत्या एव्हढे ते त्यांचे त्यांनाच माहित! पूजा इंटेरियर डिझायनर होती. तिचे वडील लहानपणीच एका अपघातात गेले होते. ती आणि तिची आई दोघीच मुंबईत रहात होत्या. बोलता बोलता माझे डोळे मिटत होते. परत कधी डोळा लागला ते समजलेच नाही.

शिवनेरी दादरला पोहोचल्यावर मानसीने मला हलवून जागे केले. आम्ही उतरलो. मागून स्वाती आणि नंतर पूजा खाली उतरल्या. मी स्वातीशी थोडा वेळ बोलून आमचे फोन नुंबर एकमेकांना दिले. मानसी आणि स्वातीचे नंबर आधीच एकमेकीनी घेतले होते. मला आणि मानसीला फोर्टला जायचे होते. मी उबर बुक केली आणि स्वातीला विचारले, "तुला कुठे सोडू का?" "नको मी इथे जवळच राहते. चालत जाईन. आणि पूजा आहे ना बरोबर!" हे ऐकल्यावर मी खाली पडणारच होतो. "हो, पूजा माझीच मुलगी आहे. आम्हाला दोघींनाही विंडो सीट लागते म्हणून वेगळ्या बसलो होतो." असे म्हणून स्वाती परत खळखळून हसली. पूजादेखील खोखो हसायला लागली. मानसी त्यांना सामील झाली नसती तरच नवल! मी आपला वेड्यासारखा आळीपाळीने तिघांकडे पाहत होतो. माझी चांगलीच फिरकी घेतली गेली होती! स्वाती आणि पूजा चालू लागल्या. जाताना पूजा मला "बाय भैय्या!" म्हणायला विसरली नाही.

उबरमधे बसल्यावर मानसी मला म्हणाली, "प्रेमात होतास ना तिच्या?"
"स्वातीने सागितले?"
"सांगायला कशाला पाहिजे? अश्या गोष्टी लपून थोड्याच राहतात? पण मग विचारले का नाहीस तिला?"
"खरं सांगू? कसे विचारणार? काय होतो मी तेव्हा? फक्त बी. कॉम. डिग्री होती. बाकी काहीच नव्हते."
"तुझ्या या अश्या स्वभावालाच मी भाळले." असे म्हणून मानसीने माझ्या गालाचे चुंबन घेतले.
"अग, समोर ड्रायव्हर आहे."
"मग? बायको आहे मी तुझी! घाबरते की काय मी कोणाला?" उत्तरादाखल मी तिच्या चुंबनाची परतफेड केली.

Comments

Solid... Jabardast

By : Naresh Kadam
16/03/2025 8 : 54 : 22 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article