तारीफ
तारीफ
शशांक पुरंदरे
संध्याकाळचे चार वाजले होते. उमा चहा टाकणार एव्हढ्यात बंडूची स्वारी अवतीर्ण झाली. राजा पेपर वाचत होता. त्याने बंडूला खुणेनेच बसण्याची विनंती केली. आत उमाने चहाचे आधण वाढवले. पुढील दोन मिनिटे शांततेत गेली. दोन मिनिटांनी उमा चहा आणि मस्का खारी घेऊन बाहेर आली. उमाने बंडूला चहाचा कप हातात दिला आणि खारीची बशी पुढे केली. बंडूने एक बिस्कीट उचलून चहात बुडवले. अपेक्षेप्रमाणे त्यातील अर्धे विरघळून कपात पडले. मग उमाने दिलेल्या चमच्याने बंडूने ते कपातून काढून खाल्ले. पुढील चार पाच मिनिटे ही मासेमारी सुरु होती. चहाचा शेवटचा घोट घेण बंडूने कप खाली ठेवला. राजा आणि उमाचा चहा केव्हाच संपला होता. टेबलावर पडलेला खारीचा चुरा आणि कप गोळा करून उमा आत गेली.
"राजा, तारीफ म्हणजे काय?" बंडूने विचारणा केली.
"काय?" राजाने पेपरातून डोके वर काढून विचारले.
"हो, काय."
"काय काय ?" राजाने बंडूचा प्रश्न ऐकला नव्हता.
"अरे, तारीफ म्हणजे काय?"
"तारीफ हा उर्दू शब्द आहे. तारीफ म्हणजे प्रशंसा. तो ओळख या अर्थाने पण वापरतात. पण मला उर्दूचा फारसा गंध नाही."
"उर्दूला वास असतो?"
"अरे, गंध नाही म्हणजे मला समजत नाही. एकतर ती उलटी लिहितात."
"उलटी म्हणजे?"
"म्हणजे आपण कसे डावीकडून उजवीकडे लिहितो, तर उर्दू उजवीकडून डावीकडे लिहितात. आता समजा मराठी हा शब्द मी ठीराम असा लिहिला तर तुला वाचता येईल का?"
"हो, ठीराम!"
"हो पण अर्थ कळेल का? म्हणून मला उर्दू समजत नाही."
"पण तारीफ म्हणजे प्रशंसा हे तर नक्की ना?"
"हो."
"मग मला सांग, २७ टक्के तारीफ म्हणजे काय?"
"काय??"
"तेच तर मला समजत नाही. त्या ट्रंपने भारताची २७ टक्के तारीफ केली आहे ना?"
"बंडू, तुझे ज्ञान अगाध आहे. अरे त्याने भारतावर २७ टक्के टॅरिफ लावला आहे?"
"म्हणजे?"
"म्हणजे वाघाचे पंजे! तुला अबकड पासून शिकवावे लागणार! आता असे बघ, आपण परदेशातून एखादी वस्तू भारतात आणली तर आपण काय करतो?"
"मला काय माहित? मी कधी परदेशात गेलोय?"
"अरे हे सामान्य ज्ञान आहे. आपण सीमा शुल्क भरतो. कस्टम ड्युटी म्हणतात त्याला! जेव्हा आपण एखादी गोष्ट आयात करतो, त्यावर कर द्यावा लागतो. आपण समजा शंभर डॉलरची वस्तू आणली तर त्यावर १० ते ५२ टक्यांपर्यंत कर द्यावा लागतो. कर वस्तू प्रमाणे बदलतो. याला टॅरिफ म्हणतात. पण आपण एखादी गोष्ट अमेरिकेला निर्यात केली तर त्यांचा टॅरिफ अतिशय कमी आहे. त्यामुळे त्यांना ती गोष्ट स्वस्तात मिळते."
"मग प्रॉब्लेम कुठे आहे?"
"यामुळे झालय असे की बहुतेक सर्व गोष्टी अमेरिकेत बाहेरून येतात. कारण त्यांना स्वस्तात मिळतात. अमेरिकेत काहीच बनत नाही."
"मग?"
"ट्रंपला ते नको आहे. यामुळे अमेरिका इतरांवर अवलंबून होत चालली आहे. त्यांचे कर्ज वाढत चालले आहे. चीन वगैरे गब्बर होत आहेत. म्हणून आता त्याने इतरांवर भरमसाठ कर लावायची घोषणा केली आहे."
"त्याने काय होईल?"
"महाग वस्तूंची आयात थांबेल आणि कंपन्या सर्व वस्तू अमेरिकेत बनवतील असे त्याला वाटतंय."
"म्हणजे ट्रंपचा मोदी झालाय म्हण की!आत्मनिर्भर अमेरिका!!"
"आता कसे तू बरोबर म्हणालास!"
"मग ठीक आहे की."
"पण यामुळे इतर राष्ट्रे निर्यात करू शकणार नाहीत. त्यांची अर्थव्यवस्था कोलमडेल. आणि अमरिकेत महागाई बेरोजगारी वाढेल. कारण कंपन्यांनी जरी ठरवले तरी सर्व वस्तू तिथे बनवायला अनेक वर्षे लागतील. परत अमेरिकेत वस्तू बनवणे महाग आहे कारण तेथील कामगार कमी पैशात काम करत नाहीत जे इतर देशात शक्य आहे. परत लोकांना शिकायला वेळ लागेल तो वेगळाच. अमेरिकेत उच्च शिक्षित लोकं कमी आहेत. त्यांना हाताने काम करायची सवय नाही. अमेरिका बेरोजगारांना भत्ता देते मग ते काम का करतील?"
"थोडक्यात पूर्ण जगाची वाट लागणार!!"
"तर काय!अमेरिकेने टॅरिफ वाढवल्यामुळे चीन आणि युरोपिअन देशांनी पण टॅरिफ वाढवले. हे काही दिवस असेच चालेल. बघू पुढे काय होतंय ते."
"हे सगळे पाहून मला एक गाणे आठवले."
"कुठले?"
"तारीफ करू क्या उसकी जिसने इसे बनाया!!!!



Comments
Sunder
By : mona
आम्ही तुमच्या लेखाची मुक्तकंठाने तारीफ करतो कारण कोणताही टॅरीफ न भरता आम्हाला वाचायला आनंद मिळतो
By : Deepak Tikekar