कॉर्पोरेट सल्लागार


कॉर्पोरेट सल्लागार

शशांक पुरंदरे

“वहिनी….”
“पोहे आणि चहा? आत्ता आणते.” असे म्हणून उमा आत गेली. समोरच्या सोफ्यावर सदा एैसपैस सांडला होता. आज बऱ्याच दिवसांनंतर स्वारी अवतीर्ण झाली होती.

“काय सद्या, काय चाललंय सध्या?” मी विचारणा केली.
“नेहमीचेच. समाजकार्य.”
म्हणजे लोकांना टोप्या घालायचा नवीन उपक्रम याने सुरु केला आहे हे मी लगेच ओळखले.

“जीवन समुपदेशन?”
“ते केव्हाच बंद झाले.”
“कारे?”
“लोकांना त्यांचे भलं कशात आहे ते समजत नाही तर मी काय करु?”
याचा अर्थ याचा धंदा बंद पडला होता.

“मग सध्या पोटाची काय सोय?” मी मुद्यालाच हात घातला.
“मंदाची लायब्ररी सुरु आहे आणि मी नवीन उपक्रम सुरु केला आहे.” एक मात्र मानले पाहिजे. सदू कधीही स्वस्थ बसत नाही.

“कोणता?”
“मी कॅार्पोरेट जगतात प्रवेश केला आहे.”
“म्हणजे?”
“मी कॅार्पोरेटस् ना मार्गदर्शन करतोय. कामाच्या ठिकाणी कसे वागावे आणि धंदा कसा वाढवावा.”
“तू!!?? तू एकही नोकरी सलग दोन महिने पण टिकवली नाहीस. तुला वर्कप्लेसचा काय अनुभव आहे?”
“अरे मी टिकलो नाही म्हणूनच खूप काही शिकलो. आता तोच अनुभव मी इतरांना सांगतो म्हणजे माझ्या चुका ते करणार नाहीत.” हे मात्र बरोबर होते. सदूने इतके जोडे खाल्ले आहेत की त्याला गणती नाही.

“पण तुला गिऱ्हाईकं बरी मिळतात.?”
“कष्ट करण्याची तयारी असेल तर सर्व शक्य आहे.” सदू आणि कष्ट? हे साहेब नाक्यावरच्या सलूनमधे केस कापायला रिक्षा करुन जातात. आता न्हावी घरी येत नाहीत म्हणून नाहीतर आधी कितीतरी वर्ष न्हावी याच्या घरी येत होते.

“पण मग सध्या तू किती कॅार्पोरेटस् ना शिकवतो आहेस तू?” मी विचारणा केली.
“तीन.” मला हा धक्काच होता.
“कोण आहेत हे?”v “पहिला म्हणजे सुजाता सुलभ अंडी विक्री केंद्र.”
“म्हणजे कोपऱ्यावरचा शाम्या शितोळे? त्याच्या मुलीवर, सुजातावर तू लाईन मारत होतास ना?”
“तोच. सुजाता महंमद बरोबर पळून गेली.”
“अरे तो स्वतः धरून तीन कामगार आहेत त्याच्याकडे! ह्याला कॅार्पोरेट कसे म्हणता येईल?”
“तू काहीही म्हण. मला एका सेशनचे ₹२५० आणि रिक्षाभाडे देतो तो!”
“रिक्षा? अरे तुझ्या घरापासून पाच पावलांवर त्याचे दुकान आहे.”
“मग काय झाले? मी सगळ्याच ग्राहकांकडून घेतो भाडे!” सदूला असे लोकं कसे भेटतात हे एक न सुटलेलं कोडं होतं.
“किती?”
“₹१००.” मी (मनातल्या मनात) कपाळावर हात मारला.
“पण तू त्यांना काय शिकवतोस?”
“शाम्या होलसेलमधे अंडी विकत घेऊन किरकोळीत विकतो. अंड्यामागे दोन रुपये कमवत होता. मी दोनाचे तीन केले. ५० टक्के नफा वाढला..”v “पण इतर तर दोनच रुपये वाढवून विकत होते ना?”
“आता त्यांनी पण दोनाचे तीन केले.”
“तरीच मला उमा म्हणत होती की अंडी महाग झाली आहेत. हे तुमचे कर्तृत्व आहे तर!”
“शिवाय आता तो पाव, बिस्किटे पण विकतो.”
“आणि वागणूकीचे काय धडे दिलेत आपण?” “ग्राहक आला की नमस्कार करायचा. त्यांच्याशी आदराने बोलायचे, वगैरे वगैरे.”
“हे तर सामान्य ज्ञान आहे.”
“पण ते सामान्य नसते ना !”
“शाबास, धन्य आहात आपण!” हा सदू मला आता वेगळाच वाटू लागला होता.

“तुझा दुसरा कस्टमर?”
“सुंदर व्हा बटिक! त्याची मालकीण मंदाची मैत्रीण आहे.” उमाच्या म्हणण्यानुसार याचे भावदेखील ₹१०० नी वाढले होते. ही पण सदूचीच करणी होती.

“करुणा माने मला ₹१००० आणि ओलाचे भाडे देते. मी चालतच जातो. शिवाय मंदाला सर्व सेवा फुकट आहेत. तिने दुकानाचे नाव बदलून करूणा सलोन केलंय आणि मनिक्युअर, पेडीक्युअरपण सुरु केलंय.” सदू म्हणाला.
“आणि तुझा तिसरा कस्टमर?”
“प्रशांत आय केअर. त्याने माझ्या सल्ल्यानुसार चष्म्याच्या फ्रेमची किंमत डबल केली आणि एकावर एक फ्रेम फुकट अशी ॲाफर दिली. आता धंदा जोरात चालू आहे त्याचा. प्रशांत मला एका सेशनसाठी ₹५००० देतो. मला आणि मंदाला चष्मे व गॅागल्स फुकट दिले.” मी सदूला फक्त लोटांगण घालायचा बाकी होतो.

उमाने दिलेले चहा व पोहे फस्त करुन सदू उठला.

“चल, मला वेळ नाहीये. कृष्णा स्वीटस् च्या मालकाला भेटायचे आहे. नवीन कस्टमर!”
“भावजी, मी येते तुमच्याबरोबर. मला थोडं श्रीखंड हवे होते आणि एक नवीन गॅागलपण घ्यायचा आहे. तुमच्या ओळखीने स्वस्तात काम होईल ना?”
“स्वस्त? वहिनी, चला तुम्ही. तुम्हाला सर्व फुकटात घेऊन देतो.”

Comments

Great business ideas! Alas, Sadu was not in Consultancy business when I was in a corporate company!

By : Bhalchandra Shrikhande
29/06/2025 5 : 58 : 21 PM

भारी सल्ले. हे हे हे

By : Hemangi Pradeep Kulkarni
29/06/2025 6 : 04 : 58 PM

सध्याच्या तरुणाईत कोणतेही काम करण्यासाठी मुले पुढे येत नाहीत. कष्ट करणं आणि कष्टाने काही मिळवणं याचं गांभीर्य त्यांना राहिलेलं नाही.. आई-वडिलांच्या जीवावर फक्त मजा करणे आणि नोकरी न करण्यासाठी हजार कारण शोधणे. ही आता तरुणाई भेडसावलेली समस्या दिसते. त्यामुळे तर बेरोजगारीचे प्रमाण वाढला आहे. अशा मुलांसाठी ही प्रेरक कथा आहे

By : Krupa Nitin Ghag.
29/06/2025 6 : 25 : 11 PM

Nice satirical. चि वि जोशी विनोदाची आठवण झाली

By : दीपक टिकेकर
30/06/2025 00 : 14 : 12 AM

सुंदर गुंफण. छान संवाद. खूप आवडलं.

By : Sandeep V Nachane
05/07/2025 3 : 07 : 10 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article