दैनंदिनी


कधी काळी दैनंदिनी लिहिणे हे नेहमीचे झाले होते. पण नंतर ते हळूहळू बंद होत गेले. कोरोना काळात भरपूर वेळ असल्यामुळे काही लोकांनी परत दैनंदिनी लिहायला सुरुवात केली होती. अशाच काही नोंदी आम्हाला सापडल्या आहेत. त्या आपाल्यासाठी प्रकाशित करत आहोत.

बाल दैनंदिनी मधील दोन पाने

महालक्ष्मी पेपर मार्टच्या दुकानात जुनी पुस्तके शोधताना दोन दैनंदिनी आमच्या हाती लागल्या. त्यापैकी एक १९७० च्या आसपास संजय नावाच्या मुलाची आहे. साधारण दहा-अकरा वर्षाचा संजय पाचवी सहावी मध्ये मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत असावा. अर्णव गेल्या वर्षीच फिफ्थ मधून सिक्स्थ मध्ये गेला होता.

संजय:

सोमवार (तारीखेची नोंद नाही) स. ६.०० - ७.००.
सकाळची सातची शाळा म्हणजे कठीण आहे. कसाबसा सहाला उठलो. बादलीभर थंड पाण्याने आंघोळ करून आईने केलेले पोहे खाल्ले, दूध पिऊन गणवेश घातला. आरेचे छोट्या बाटलीतले दूध प्यायला मला खूप आवडते. छान थंड पण असते. आईने दिलेला पोळीभाजीचा डबा दप्तरात घालून, कॅनव्हासचे बूट घालून घराबाहेर पडलो. गेल्यावर्षी पर्यंत बाबा सोडायला येत होते. आता मात्र माझा मीच जातो. चालत पंधरा मिनिटे लागतात.

राजन आणि सुमन माझी वाट पहात उभे होते. “आले लेट लतीफ!”, सुमनने टोला लगावलाच. राजन मात्र दगड मारून झाडावरून पेरू पाडायचा प्रयत्न करत होता. सुमन म्हणजे एकदम अभ्यास एके अभ्यास! राजन मात्र अभ्यास सोडून बाकी सर्व करतो. चालत चालत टिवल्या बावल्या करत पहिली घंटा वाजायच्या आत आम्ही वर्गात शिरलो.

स. ७.०० – १.००
वंदे मातरमने वर्गाला सुरुवात झाली. सकाळी सकाळीच तिमाही परीक्षेचा निकाल लागला. नेहमीप्रमाणे सुमनला माझ्यापेक्षा जास्त मार्क मिळाले. माझे पण ठीकठाकच होते. आश्चर्य म्हणजे राजन चक्क सर्व विषयात पास झाला. त्यामुळे मधल्या सुट्टीत राजनने आम्हाला बटाटावडा खायला घातला.

घाईघाईत भूगोलाची वही मी घरीच विसरलो होतो. त्यामुळे बाईंनी पाच मिनिटे बाकावर उभे केले.

आशाला सुमनपेक्षा दोन मार्क कमी मिळाले. म्हणून दोघींचे जोरदार भांडण झाले. सोडवताना आमचा दम निघाला.

अकरा ते एक वर्गात बसून आमचा घाम निघाला, कारण पंखा बंद पडला होता. कधी एकदा शाळा सुटते असे झाले होते.

शेवटी पसायदानाने शाळेची सांगता झाली.

दु. १-०० – ४.००
शाळा सुटल्यावर शाळेच्या समोर गाडीवरील आईस्प्रुटची कांडी घेऊन आम्ही निघालो. राजनला तू पास कसा काय झालास हे खोदूनखोदून विचारले, पण पठ्ठ्या बोलायला तयार नव्हता. काहीतरी गोची होती हे मात्र नक्की!

घरी आलो तर तीर्थरूप दारात उभे! झाले, म्हणजे दुपारचे सगळे कार्यक्रम रद्ध! आल्याआल्या त्यांनी लाल धागा शिवाजी बीडी आणायला परत दुकानात पाठवले. दहा पैशाला वीस विड्या! मी गपचूप दोन खिशात टाकल्या. बघुया तरी एकदा ओढून!

जेवणानंतर बाबांनी अपेक्षेप्रमाणे अभ्यासाला बसवले. त्यामुळे चार आणे मालेचे वाचन पुढे ढकलावे लागले. स्वत: तीर्थरूप मात्र तारसप्तकात घोरत होते. अजून खूप वर्ष हे शाळेचे आणि अभ्यासाचे अत्याचार सहन करावे लागणार आहेत.

सं. ४.०० – ७.००
तीर्थरुपांच्या आज्ञेप्रमाणे चार वाजेपर्यंत अभ्यास केल्यावर चार आणे माला वाचायची परवानगी मिळाली. ही पुस्तकं मला खूप आवडतात. पाच वाजता दूध पिऊन बाहेर बॅटबॉल खेळायला गेलो. शिरीषची बॅट असल्यामुळे त्याची पहिली बॅटिंग होती. माझा रबरी बॉल होता म्हणून माझी बॉलिंग! बाकी राजन, अजित वगैरे मुलं फिल्डिंगला! सुमन, रेखा, रोहिणी वगैरे मुली देखील आमच्या बरोबर खेळायला होत्या. खूप मजा आली.

रा. ७.०० – 1०.००
घरी आलो तर समोर शशी काका! त्याने माझ्यासाठी क्रीमची बिस्किटे आणली होती. आईने केलेल्या गोडाच्या शिऱ्यावर ताव मारताना मजा आली. आणि बरोबर लिंबाच्या लोणच्याची फोड म्हणजे क्या बात है!

खाऊन झाल्यावर मी आणि संतोष सापशिडीचा डाव खेळत बसलो होतो. गृहपाठ तर दुपारीच झाला होता. त्यामुळे डोक्याला चिंता नव्हती. नंतर जेवताना वरण, भात, मीठ, लिंबू आणि त्यावर कळीदार तुपाची धार, हे सर्व खाऊन आत्मा तृप्त झाला. काका आणि संतोष गेल्यावर परत चार आणे माला उघडली. वाचताना कधी झोप लागली ते समजले देखील नाही.

अर्णव:

अर्णवची डायरी इंग्रजीत आहे. आम्ही आपल्यासाठी त्याचा मराठी अनुवाद करण्याचा प्रयत्न केला आहे.

सोमवार स. ६-०० – ७.००
सहा वाजता मोबाईलच्या अलार्मने जाग आली. पटकन ब्रश करून शॉवर घेतला. कॅार्नफ्लेक्स आणि मिल्क ब्रेडचा ब्रेकफास्ट करून मॉमने दिलेला टिफिन सॅकमध्ये टाकला आणि खाली आलो. डॅड पोर्चमध्ये गाडी लावून उभाच होता. त्याने स्कूलच्या गेटवर मला सोडले. निम्मी गँग आधीच क्लासमध्ये पोचली होती. सर्वांना हायफाय करे पर्यंत बेल झालीच.

स. ७.०० – १.००
रुममध्ये एसी असल्यामुळे छान वाटत होते. प्रणोती मॅम आल्यावर आम्ही सर्वांनी गुड मॉर्निंग केले. प्रेयर नंतर स्कूल सुरु झाली. प्रणोती मॅम आज एकदम हॉट दिसत होती. पिरीयड कधी संपला ते समजलेच नाही.

ब्रेकमध्ये मी, अमित, साक्षी आणि बिना कँटीनमध्ये पिझ्झा खायला गेलो. अगदी पिझ्झा हट सारखा नाही पण ओके होता. सेकंड हाफ मध्ये संदेश सरांचे लेक्चर होते. सो बोअरिंग! मी मधेमधे डुलक्या काढत होतो. नंतर पॉवरपॅाईट बघितला की झाले. शेवटी फर्स्ट सेमचे मार्क्स दिले गेले. मला अव्हरेज A मिळाला. नॉट बॅड!

दु. १.०० – ४.००.
खाली उतरल्यावर ओला बुक केली. चालत जायचा कंटाळा आला होता. आज दिवसभर घरी कुणीच नव्हते. अमित माझ्याबरोबर घरी आला. त्याने अभ्यासाला माझ्याकडे जातो असे त्याच्या घरी सांगितले होते. घरी गेल्यावर द इटालिया मधून पास्ता, गार्लिक ब्रेड आणि कोक मागवला. लंच नंतर मी माझा xbox काढला आणि आम्ही स्पीडिंग कार्स खेळलो. अर्थातच मी अमितला हरवले. नंतर फ्रेंडस चे दोन एपिसोड पहिले. सिम्पली हिलेरीयस!

सं. ४.०० – 8.००
अजून ममा घरी आली नव्हती. मी आणि अमित एव्हीनिंग पोस्टला पोहोचलो तर सगळे जण आधीच हजर होते. आज साक्षीचा बर्थडे होता. मग केक कटिंग झाले. भरपूर स्नॅक्स आणि सॅाफ्ट ड्रिंक्स होते.

रा. 8.०० – ११.००
घरी पोचलो तेव्हा आठ वाजून गेले होते. पोट तुडुंब भरले होते. ममाला भूक नाही असे सांगून रूम मध्ये गेलो. डॅड अजून आला नव्हता. मोबाईल वर थोडा टाईमपास केला. मग फ्रेंडस चे अजून दोन एपिसोड पहिले. अगदी डोळे मिटताना आठवले की होमवर्क झालेले नाही. जाऊदे, उद्या ममाकडून सॉरी नोट घेईन.

दैनंदिनी/डायरी मध्ये अशाच प्रकारच्या नोंदी आहेत. वरील दोन नोंदी नमुने म्हणून दिल्या आहेत.

आम्ही काही मुलींच्या किंवा कॉलेज मधील विद्यार्थ्यांच्या दैनंदिनी मिळतात का ते बघतोय. अनेक जुनी पेपरची दुकाने पालथी घातली आहेत. तुम्हाला मिळाल्या तर अवश्य कळवा.

ता. क. चौकशी अंती असे निष्पन्न झाले आहे की हल्ली कुणीही डायरी लिहित नाही. फेसबुक, इंस्टाग्रॅम, व्हॅाटसअॅप मधील नोंदीच वैयक्तिक डायरीतील नोंदी मानल्या जातात. त्यामुळे यावर विशेष टिप्पणी करणे निरर्थक ठरेल. “ओह माय गॅाड! त्याने माझ्या फोटोला लाईक केले!” किंवा “हलकट मेला! मुद्दाम मला इग्नोअर करतोय!” यासारख्या गोष्टींमध्ये वाचकांना रस असेल असे आम्हाला वाटत नाही.

दैनंदिनी कोरोना काळातली

कोरोना कुलूपबंदीच्या काळात आम्ही एक अॅप विकसित केलंय. त्यामुळे इतरांच्या मनातले विचार आम्हाला रेकॅार्ड करता येतात. त्यातील काही दैनंदिन नोंदी आमच्या हाती लागल्या आहेत. त्या आम्ही तुमच्याकरता सादर करत आहोत.

सुनंदा: काही म्हणा, रात्री मजा आली. मोदीपण ग्रेटच आहेत. एक दिवस पूर्ण जनता कर्फ्यू लावला आणि सर्वांनी ऐकले पण! घरातील सर्व दिवे बंद करून बाहेर पणत्या, मेणबत्त्या लावायच्या. त्याच्या तेजाने कोरोना विषाणू मरतो म्हणे! आणि हे जे इतर लोकं आपली सेवा करताहेत त्यांच्या साठी टाळ्या, झांजा, प्लेट्स वाजवणे पण भन्नाटच! कधी नव्हेते घरातीलं सर्व माणसं एकत्र बाल्कनीमध्ये टाळ्या वाजवत होती. अर्धा तास छान गेला. आणि त्यामुळे जेवणे पण वेळेत आटोपली. नाहीतर रोज सर्व आवरून झोपायला बारा वाजतात. सूनबाई ऑनलाईन कामे करतात आणि मी लायनीत सकाळ संध्याकाळ भांडी घासते. आत हा लॉकडाऊन किती चालणार आहे देव जाणे. माझे काम वाढणार हे मात्र नक्की! चला, परत सकाळी सहा वाजता उठून नेहमीचं रहाटगाडगे सुरु! आता उद्या पासून सर्व बंदच आहे. त्यामुळे सावकाश उठले तरी चालेल.

बाल्कनीतून का होईना शेजारी तर दिसले. अभय अजूनही किती हँडसम आहे. नाहीतर आमचे ध्यान! अजून तेच चट्टेरीपट्टेरी लेंगे घालून फिरतात. माणसाने जरा तरी बरं रहाव. ती रमा जरा जास्तच मॉड आहे म्हणा! काय तो लो कट ब्लाउज, अर्धी पाठ उघडी आणि झिरझिरीत साडी! आमचं ध्यान तर तिच्याकडे बघूनच टाळ्या वाजवत होतं. दोन्ही मुले मात्र हुशार आहेत.

सुरेश: ह्या मोदीला एक उद्योग नाही. उठसूट टीव्हीवर भाषण द्यायचं आणि काहीतरी नवीन चालू करायचं! अरे असे दिवे लावून कोरोना मेला असता तर मुळात जन्मालाच आला असता का तो? पण ठीक आहे, वेळ चांगला गेला. बाल्कनीतून का होईना शेजारी भेटले. देशमुख पती-पत्नी, रमा आणि अभय आणि त्यांची मुलं. अगदी लग्नाला जाण्यासाठी तयार व्हावे तसे तयार होईन आले होते बाहेर. नाहीतर आमच अर्धांग! कधी त्या स्वयंपाकघरातून बाहेर येणार काय माहित! चला, देशमुख आत गेलेत, आपणही जावे. ती वेब सिरीस बघुया जरावेळ.

सुनंदा: आता हे आत जाऊन ती वेब सिरीज लावणार. म्हणजे झोपेचं खोबरं. मला एकतर इंग्रजी काय बोलतात ते समजत नाही. सब टायटल आणि चित्र एकदम कसे बघायचे? काहीच कळत नाही. दर दोन मिनिटाला शिट आणि फक शिवाय काहीच नसत. सारख्या नागड्या बाया दाखवायच्या! पण तशी फिगर पाहिजे! उद्यापासून रोज गच्चीत धावायला जाणार मी आता.

सुधा: व्हॅाट अ वेस्ट ऑफ टाइम! आता बारा वाजेपर्यंत प्रोजेक्ट कसा संपणार? वर्क फ्रॉम होम म्हणजे त्रास आहे. आणि हे किती दिवस करायचे? अनिलचे बरं आहे, मार्केटिंगला लोडच नाहीये. छान मित्रांशी चॅट करते आहे स्वारी! आणि म्हणे गर्ल्स हॅव इट इझी. इथे कशी फाटते काय सांगू याला. तो साला डिसुझा तर वाटच बघतोय मी कधी चूक करते याची. पण वाट बघच तू! मी पण काही कमी नाहीये. उद्या अशी मारते साल्याची, परत वाटेला जाणार नाही माझ्या.

मघाशी केदारशी बोलल्यावर जरा बरं वाटले. सेम प्रोफेशन मध्ये असल्यामुळे ही अंडरस्टँडस् द इशूज. अनिलला तर काही समजतच नाही. कधीकधी वाटते.... पण जाऊदे, आता काय फायदा वाटून! चला अजून तासभर तरी मी आणि लॅपटॅाप याला पर्याय नाही. माझा लॅपटॅाप पाहून अनिल चिडणार आहे. कारण स्वारी वेगळ्याच मूड अधे आहे. पण इलाज नाही. आलीया भोगासी असावे सादर!

सासूबाई पण जरा वैतागलेल्या वाटल्या. मान्य आहे, त्यांना खूप काम पडतं. पिंटूचंपण सगळ त्याच करतात. पण काय करणार? घराचे ईमआय भरायला जॉब तर केलाच पाहिजे. आणि माझी पण करीयर आहेच ना!

यापुढील नोंदी आम्ही सध्यातरी सादर करु शकत नाही. कनेक्टिव्हीटीचा प्रॉब्लेम वाटतोय. प्रॉब्लेम सुटला की लगेच अपलोड करू पुढील नोंदी. तोपर्यंत शुभरात्री.

Comments

अगदी सूक्ष्म निरीक्षण आहे की कोण कसा विचार करत असेल.काची मुलं,आजची मुलं,सासू, सून,सासरे, मुलगा... छान वाटलं वाचायला.

By : Pratibha Tarabadkar
26/07/2023 11 : 25 : 18 AM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article