चिरंतन प्रेम हे माझे तुझे
चिरंतन प्रेम हे माझे तुझे
शशांक पुरंदरे
आकाश-पूजा आणि रेवा-आशिषच्या लग्नांना एक वर्ष होऊन गेले होते. साधारण पंधरा दिवसांतून एकदा आम्ही सर्वजण डिनरला भेटत होतो. आजही स्वातीकडे जेवण झाल्यावर आम्ही वाईनचे सिप घेत बाल्कनीत बसलो होतो. स्वातीच्या पंधराव्या मजल्यावरची बाल्कनी ही जणू डिनर नंतरच्या वाईनबारसाठीच बनविलेली होती. समोर अरबी समुद्र पसरलेला होता. बांद्रा वरळी सी लिंक वरचे दिवे चमकत होते. पश्चिमवाऱ्याची झुळूक हृदयाला आणि शरीराला गुदगुल्या करत होती. माझ्या बाजूला बसलेल्या मानसीचा हात माझ्या हातात गुंफलेला होता. रेवा-आशिष आणि पूजा- आकाश आपल्याच दुनियेत होते. स्वर्गसुख ते यापलिकडे काय असू शकत असेल?
समोर बसलेली स्वाती मात्र आज जरा वेगळीच वाटत होती. नेहमी अखंड बडबड करणारी स्वाती आज जरा गप्प गप्प होती. तिच्यावर कसलेतरी दडपण असावे असे वाटत होते.
“काय ग स्वाती, आज गप्प का? एनी प्रॅाब्लेम?” मी तिला विचारले.
“नाही रे भैय्या!” हिचा भैय्या काही सुटत नव्हता. “जरा दमायला झालंय एव्हढंच!”
“वय झालंय तुझं आता!”
“आणि आपण काय तरुण होताय दिवसेंदिवस!” स्वाती म्हणाली.
मी उत्तर देणार एव्हढ्यात डोअरबेल वाजली.
“मी उघडते.” असे म्हणून स्वाती ताडकन उठली. ही बया दमली आहे हे तिच्याकडे पाहून कुणालाही खरं वाटलं नसतं. काहीतरी गडबड नक्की होती.
दोनच मिनिटांत स्वाती आणि गडबड, दोघेही आत आले. स्वाती बरोबर एक साधारण पंचावन्नच्या आसपासचा एक “तरुण” आत आला.
“मी ओळख करुन देते. हा अरविंद, अरविंद देसाई. स्वातीच्या चेहऱ्यावर ओळख करुन देताना एक वेगळाच ब्लश उमटला होता.
“नमस्कार.” अरविंदने सर्वांना एक कॅामन नमस्कार ठोकला आणि साहेब समोरच्या सोफ्यावर विराजमान झाले. आम्ही सर्वजण एकमेकांकडे पहात हा काय प्रकार आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. पूजा आणि आकाश मात्र गालातल्या गालात हसत होते. रेवा पण कूल वाटत होती.
“मी आणि अरविंद लग्न करत आहोत.”
स्वातीने बॅाम्ब टाकला. मानसीने उठून स्वातीला आनंदाने मिठी मारली.
“अभिनंदन!” मी म्हणालो.
“अरविंदला मी चार वर्षांपूर्वी भेटले.” स्वाती म्हणाली. “आमची हॅंडीक्राफ्टची निर्यात अरविंदची कंपनी अनेक वर्ष सांभाळते आहे. अरविंदची पत्नी सहा वर्षांपूर्वी गेली. त्यांना मुले नव्हती. आम्ही दोघे कधी एकमेकांच्या प्रेमात पडले ते आम्हालाच कळले नाही. पण पूजाचे लग्न होईपर्यंत काही करायचे नाही असे आम्ही ठरवले होते. अर्थात पूजाला हे माहित होते. ती तर आम्हाला आधीच लग्न करण्याचा आग्रह करत होती पण आम्हीच नाही म्हणालो.”
“भैय्या, तुला मात्र हा शॅाक असेल नाही?” अरविंद हसत हसत म्हणाला.
“थांब, तू बाहेर भेट, दाखवतो तुला!” मी पण काही कमी नव्हतो.
“बाहेर कशाला? इथेच भेटूया ना!” असे म्हणून अरविंद उठून माझ्या जवळ आला. आम्ही दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले.
“स्वाती, आय ॲम व्हेरी हॅपी!” मी म्हणालो. “मधे मी आणि मानसी या विषयावर बोलत होतो. तुझ्यापुढे एव्हढे आयुष्य पडले आहे. ते एकट्याने का घालवावे? खूप छान निर्णय घेतलास तू! आपल्या समाजात पुनर्विवाहाचा उगाचच बाऊ केला जातो. माझा पुनर्विवाहाचा नेहमीच आग्रह असतो.”
आमच्या सर्वांच्या डोळ्यात पाणी तरळले होते.
शेवटी पूजा म्हणाली,
“काय सगळे सेंटी होताय? हा काय रियालिटी शो आहे का?! चला लेट अस सेलिब्रिटी विथ वाईन!”
पूजाने सर्वांचे ग्लासेस रिफील केले. ग्लासेस वर करुन आम्ही सर्व एका सुरात म्हणालो,
“टू स्वाती आणि अरविंद !!!
लेखनसीमा



Comments
वावा मस्त शेवट केलास 👌👌
By : सीमा
छान शेवट
By : Swati Marathe
End Chan
By : Viju
positive ending.....
By : Pradnya Gore