भजी, चहा आणि ट्रंप
भजी, चहा आणि ट्रंप
शशांक पुरंदरे
“हे जे काय ट्रॅप करतोय त्याबद्दल तुझे काय मत आहे?” दीपा वहिनींनी केलेली कांदा भजी खाताखाता गण्याने विचारणा केली.
“भावजी, भजी कशी झाली आहेत?” मधेच दीपाने प्रश्न विचारुन गण्याचा कात्रज केला.
“व्वा! मोस्त!” तोंडात भजे असल्यामुळे म चा मो करत गण्या उत्तरला.
“पण रशियाकडून तेलाची आयात बंद केली तर शेवटी आपलंच नुकसान नाही का? साधी भजी करायची म्हटली तरी किती महाग पडेल सांग ना?” गण्याने भजे खाऊन झाल्यावर पुन्हा मुद्याला हात घातला.
“भावजी, चहा घ्याल ना?” दीपाने परत मधेच तोंड उघडले.
“हो. पण दिलीप, तुझे काय मत आहे?” गण्या.
“हो, मी पण घेईन.” दिलीप म्हणाला.
“अरे मी तेलाबद्दल बोलतोय.” गण्या.
“चहाचा आणि तेलाचा काय संबंध?” दिलीपने विचारणा केली.
“अरे, मी काय म्हणतोय आणि तू काय म्हणतोयस? मी चर्चगेटला तर तू विरारला आहेस.” गण्याने वैतागून अजून एक भजे तोंडात टाकले.
“माझं विरारला कुणीच नाहीये.” दिलीपने स्पष्टीकरण दिले.
“अरे मी तेलाबद्दल बोलतोय.”गण्या म्हणाला.
“ते बरोबर आहे. भजी तेलात तळल्यामुळे जास्ती खाल्ली तर कोलेस्ट्रॅाल वाढू शकते.” मेडिकलचा फिरता विक्रेता असल्यामुळे हे सर्व दिलीपला तोंडपाठ होते.
“दिल्या, तुझे लक्ष कुठे आहे? रशियाच्या तेलाशी कोलेस्ट्रॅालचा काय संबंध?”
“गण्या, रशियाच्या तेलाचा भजांच्या तेलाशीदेखील काही संबंध नाही. आपण रशियाकडून क्रूड ॲाईल घेतो. शेंगदाण्याचे तेल आपल्या देशात बनते.”
“अरेच्या, हे माझ्या लक्षातच आले नाही.” अजून एक भजे तोंडात टाकत गण्या उद्गारला.
“चहा.” दीपाने चहाचे कप समोर ठेवले.
“वहिनी, भजी संपली का?” रिकाम्या प्लेटकडे हात करत गण्या विचारता झाला.
“हो, आणि तेल महागणार असल्यामुळे आणखी भजी मिळणार नाहीत.”
“पण दिल्या तर म्हणतोय की या तेलाचा त्या तेलाशी संबंध नाही म्हणून!”
“क्रूड महागले की पेट्रोलच्या किंमती वाढणार, मग वाहनखर्च महागणार आणि मग शेंगदाणा तेलपण महागणार!” दीपाने एका वाक्यात अमेरिकन भाषेत इकॅानॅामिक्स १०१ शिकवून टाकले.
“म्हणजे पोटावर पाय येणार आपल्या.” गण्या प्लेटमधील उरल्यासुरल्या बेसनाच्या म्हाताऱ्या तोंडावाटे पोटात ढकलत म्हणाला.
“हा ट्रंप असा काय वागतोय काही कळत नाही.” चहा बशीत ओतून फुर्र करुन पिऊन झाल्यावर गण्याने परत मूळ विषयाला हात घातला.
“भावजी आता चहा पोहे भजी सगळं बंद होणार!”
“पण याचा रशियाच्या क्रूड ॲाईलशी काय संबंध? चहा, साखर, पोहे तर आपणच बनवतो ना!”
“नाही कसा? तेल महागले की पेट्रोल, डिझेल महागणार, मग मालवाहतूकीचा खर्च वाढणार. मग सगळे पदार्थ महागणार ना! दिलीपच्या पगारात सगळे बसवायला नको? शिवाय मुलांचे खर्च, शाळा, वह्या पुस्तके, स्कूल बस यांचे खर्च वाढणार ना!”
“पण तुम्हाला कुठे मुले आहेत?” गण्याने मूळ मुद्यालाच हात घातला.
“इश्य, भावजी, तुम्हीपण ना……! अहो आज नाहीत पण उद्या होतीलच ना!”
“अरे वा, अभिनंदन!”
“अहो, उद्या म्हणजे अगदी उद्याच नाही. मी लौकिक अर्थाने म्हणाले!”
“ठीक आहे, मी अगोदरच अभिनंदन करुन ठेवतो.” गण्यापण काही कमी नव्हता.
“पण ते जाऊदे. दिल्या, ट्रंपचे काय?” विक्रम वेताळ कथेतील विक्रमाप्रमाणे गण्यादेखील आपला हट्ट सोडायला तयार नव्हता. त्याने परत ट्रंपला खांद्यावर घेतलेच.
“ट्रंपचे काय?” दिलीप.
“तेचतर मी केव्हापासून विचारतोय.” गण्या.
“ट्रंप त्याचे पाहून घेईल. आपल्याला काय करायचंय?” दिलीप.
“म्हणजे? इथे माझ्या चहा, पोहे भज्यांचे वांदे झालेत आणि तुला काहीच वाटत नाही?” गण्याने हतबल होऊन प्रश्न केला.
“तू मोदींचा सल्ला मनावर घे.”
“म्हणजे?”
“आत्मनिर्भर बन. स्वतः सर्व करायला शिक.”
“ते मी केले असते रे, पण क्रूड महागले की पेट्रोल महागणार, डिझेल महागणार, मग वाहतूक खर्च महागणार, मग हे सर्व मला कसे परवडणार?” गण्याने एकदम लॅाजिकल प्रश्न केला.
“अरे, तेचतर दीपा मघापासून तुला सांगते आहे, पण तू परतपरत ट्रंपवरच येत आहेस.”
“पण मग आता करायचे तरी काय?”
“सोपं आहे, चहा, कॅाफी, पोहे, भजी वगैरे श्रीमंती षोक आता बंद करा.” असे म्हणून चहाचे कप आणि भज्यांच्या प्लेट्स उचलून आत जाताना दीपाने या विषयावर पडदा पाडला.



Comments
Mast
By : Vaijayanti palkar
नेहेमीप्रमाणे खुसखुशीत
By : दीपक टिकेकर
सही 😁😁 भजी एकदम कुरकुरीत 👌👌👌
By : SHEETAL KHIRE
Niice!
By : Sheela Bahadkar
कांदा भज्यांच्या ऐवजी काॅर्न भजी करा. सध्या कणसं स्वस्त आहेत. आणि एअर फ्राय करा म्हणजे तेलाचा खर्च वाचेल. आणि आम्हालापण खायला बोलवा!
By : भालचंद्र श्रीखंडे
पाऊस आणि कांदा भजी... एकदम जिव्हाळ्याचा विषय. रंगतदारपणे मांडला आहे. 👌
By : Krupa Nitin Ghag.
भजी खुसखुशीत होती. अरेरे, पण ट्रम्प मुळे ती महाग पडणार. आणि म्हणून दुर्लभ पण होतील. जाऊ दे. तू तलाव पाळीला भेट. तिथे आपण वडापाव खाऊ. एनी वे राइट अप आवडलं.
By : Sandeep V Nachane
खुसखुशीत संवाद. मस्तच.
By : योगिनी लोथे