माझा स्तंभ
काल संध्याकाळी सहाच्या सुमारास दारावरची घंटा वाजली. आमच्या वॉचमन बरोबर एक गृहस्थ समोर उभे होते.
“मी मराठा आरक्षणा संदर्भात सर्वेक्षण करायला आलो आहे. काही प्रश्न विचारू का?”
“विचारा.”
“आपण मराठा आहात का?”
“नाही.”
“आपला धर्म?”
“हिंदू.”
“जात?”
“सांगायला हवीच आहे का?”
“नाही सांगितलीत तरी चालेल.”
“इथे सही करा.” त्यांनी एका पुस्तिकेत माझी सही घेतली आणि घराच्या भिंतीवर सर्वेक्षण झाले म्हणून खूण केली.
“मी तर ऐकले होते की सर्वेक्षणात १८३ प्रश्न विचारतात म्हणून?”
“ते जर तुम्ही मराठा असाल तर, नाहीतर नाही.”
मी समाधानाने दरवाजा बंद केला. माझ्या वहिनीने देशस्थ ऋग्वेदी ब्राम्हण अशी जात सांगितल्यावर अशी जात अस्तित्वात नाही असे तिला सांगण्यात आले होते. आता बोला!!!
माझे मराठीचे ज्ञान साधारणपणे ठीकठाकच आहे असा माझा समज होता. सगेसोयरे याचा अर्थ नातेवाईक, मित्रमैत्रिणी असा होतो असे मला वाटत होते. हल्ली तर मित्रमैत्रिणीच जास्ती जवळच्या वाटतात. पण महाराष्ट्र सरकारने माझा गैरसमज दूर केलाय.
मला दोन व्यक्तींचे विशेष कौतुक वाटते. एक म्हणजे आपले विद्यमान मुख्यमंत्री शिंदे साहेब. त्यांनी ज्या कौशल्याने अख्खा महाराष्ट्र शब्दांमध्ये गुरफटून टाकलाय त्याला तोड नाही. मराठा आंदोलनात आपलाच विजय झालाय अशीच महाराष्ट्राच्या तमाम जनतेची समजूत झाली आहे.
दुसरे म्हणजे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार. ज्या सफाईने ते कोलांट्याउड्या मारतात ते पाहून त्यांना २०२४ च्या ऑलिंपिकमध्ये पाठवावे असे मला वाटतंय. आपली खुर्ची टिकवण्यासाठी काहीही करण्याची या माणसाची तयारी आहे.
सध्या मराठी भाषा आणि मराठीपण टिकवण्याची स्पर्धा सुरु आहे. दुकानावर मराठी पाट्या लावल्यामुळे या दोन्ही गोष्टी सहज साध्य होतील अशी बाळबोध समजूत काही लोकांची झाली असावी असे वाटतंय.
मला हल्लीच्या तरुण मुलांचे कौतुक करावेसे वाटते. या माझ्या वाक्यात अजिबात उपरोधीकता नाही हे कृपया लक्षात घ्यावे. माझा भाचा सौमित आज डायरेक्टर ऑफ फोटोग्राफी म्हणून सिनेसृष्टीत काम करतोय. त्याचा फायटर सिनेमा नुकताच रेलीज झाला आहे. यात त्याने second DOP म्हणून काम केले आहे. सिनेमा पठाण, जवान सारखाच आहे पण फोटोग्राफी साठी जरूर पहा. श्रावणी, गौरी लहान मुलांबरोबर समुपदेशक म्हणून काम करत आहेत. काहीतरी वेगळं करण्याची वृत्ती नक्कीच वाखाणण्याजोगी आहे.
आजकाल सर्वांना सरकारी नोकरी हवी आहे. पण नोकरीबरोबर किती इतर सर्वेक्षणे करावी लागतील याची खात्री नाही. त्यापेक्षा काहीतरी वेगळे करून पहा. सर्वच क्षेत्रात ज्ञान संपादन करत रहा. वाऱ्याची दिशा कधी आणि कशी बदलेल हे सांगता येत नाही.
ता.क. शेवटची बातमी हाती आली तोपर्यंत नितीशकुमार यांची कोलांटी उडी मारून झाली होती. आता गादीवर पडताहेत की जमिनीवर ते बघुया.



Comments
Mast 👌👍
By : Mona
सगेसोयरे याचा अर्थ मला तरी कळला Anyway ज्याच्याशी आपला काडीमात्र संबंध नाही त्याचा विचार का करा? तरुण पिढी नक्कीच आशादायक आहे यात शंका नाही.
By : Pratibha Tarabadkar
👌👌👍
By : Sheela Bahadkar