अश्लेषा


अश्लेषा

शशांक पुरंदरे

सकाळचा साडेसातचा सुमार होता. मो.ह. विद्यालयाच्या आठवी अ च्या वर्गातील मुले आणि मुली वर्गशिक्षिकेच्या प्रतीक्षेत एकमेकांशी मारामारी, बाचाबाची करण्यात मग्न होते. खडू, टोकाला निळी शाई लावलेले कागदी बाण इत्यादी हत्यारे दोन्ही बाजूनी वापरली जात होती. या लढायांमध्ये मागील बाकांवरील विद्यार्थी जास्ती सक्रीय होते. अनेक वर्षांच्या सरावामुळे त्यांच्या मिसाईल्स बरोबर निशाण्यावर लागत होती. पुढील बाकांवरील मुलांना मागे वळून प्रतिकार करणे जास्ती अवघड जात होते. त्यातच मुले एकमेकांच्या पाठीत गुध्दे मारत होते तर मुली वेण्या खेचत होत्या. एकंदरीतच वर्गात अतिशय आनंदाचे वातावरण होते.

बरोबर साडेसात वाजता पांडूने शाळेची घंटा बडवून सगळ्यांच्या आनंदावर विरजण घातले. भरीला देशपांडे बाई वर्गात शिरल्या मुळे सर्व मुलांनी आपापली स्थाने ग्रहण केली आणि Good morning teacher चा नारा लावला. देशपांडे बाई टेबलामागील खुर्चीवर स्थानापन्न झाल्या. आज मागे दोन खुर्च्या ठेवलेल्या होत्या. बाईंनी Good morning म्हणून सर्वांना बसायला सांगितले. परंतु पहिल्या बाकांवरील मुलांतर्फे खंडू आणि मुलींच्या बाजूने मंदा उभेच होते.

“बाई, बंडूने मला पाठीत गुद्धा मारला.” खंडू म्हणाला.
“आणि कुंदाने माझी वेणी ओढली.” मंदाने खंडूच्या सुरात सूर मिसळला.
“आत्ता तुम्ही खाली बसा. लवकरच आपण तुमचे तक्रार निवारण करू.” बाई म्हणाल्या.
“आज आपला इंग्रजीचा तास होता, पण तो होणार नाही. आजचे होमवर्क उद्या तपासले जाईल.” असे देशपांडे बाईंनी म्हणताच सर्व मुलांनी टाळ्या वाजवल्या. “पण घाबरू नका, आज अधिकचे होमवर्क देण्यात येईल”, असे म्हणून देशपांडे बाईंनी सर्वांची हवा काढली. पंधरा वर्षांचा शिकविण्याचा अनुभव किती मोलाचा असतो हे बाईंनी सिध्द केले.
“आत्ता थोड्याच वेळात आपल्या वर्गात “अश्लेषा” येणार आहे. अश्लेषा ही एक ROBOT आहे. ठाणे येथील एका नामवंत कंपनीने याची निर्मिती केली आहे.

आज सकाळी नेहमीप्रमाणे पांडूने तुम्हा मुलांकडून चार मोबाईल जप्त केले आहेत. ते जाताना परत घेऊन जा. असे तीन वेळा झाले तर मोबाईल परत मिळत नाहीत हे सर्वांना माहित आहेच. आठवड्यातून एकदाच मोबाईल शाळेत आणता येतो, जेव्हा त्याचा वापर कसा करायचा हे शिकवले जाते. तर सांगायचा मुद्दा हा, की या मोबाईलमध्ये ALEXA नावाचे अॅप आहे. शिवाय त्यातून CHATGPT देखील आपण सर्व वापरतो.
आपल्याकडे आज येणारी अश्लेषा ही एक DEMO ROBOT आहे. तिच्यात ALEXA आणि CHATGPT या दोन्हींचा समावेश आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी आपल्या उपयोगासाठी कशा वापरता येतील हे आपल्याला शिकता येईल. पैसे उपलब्ध झाल्यावर आपली शाळा हा ROBOT कालांतराने विकत घेणार आहे. पण आज फक्त कंपनीचे तंत्रज्ञ आपल्याला प्रात्यक्षिक दाखविणार आहेत. हे काय, अश्लेषाचे आगमन झाले आहे. बरोबर डॉ. नाडकर्णी सर आहेत. नमस्कार अश्लेषा! नमस्कार नाडकर्णी सर!” असे म्हणून देशपांडे बाईंनी दोघांचे स्वागत केले.

नाडकर्णी सर देशपांडे बाईंच्या बाजूला खुर्चीत येऊन बसले. मागोमाग अश्लेषा ROBOT आत येऊन टेबलाच्या बाजूला उभा राहिली. साडेतीन फुट उंच अश्लेषा पॉलीमर पासून बनवलेली होती. तिला मानवाप्रमाणे दोन हात आणि दोन पाय होते. हाताला पाच बोटे देखील होती. चेहऱ्यावर तोंडाच्या जागी एक स्पीकर होता. डोळ्याच्या जागी दोन LED LIGHTS होते. कपाळावर एक शक्तिशाली मायक्रोफोन होता. त्याच्यावर एक पूर्ण डोक्यावर एक रिंग होती.

नाडकर्णी सरांनी मुलांना गुड मॉर्निंग केले.
“हॅलो, मी अश्लेषा! सुप्रभात!” ROBOT च्या स्पीकर मधून आवाज आला.

“नमस्कार! मी अशोक नाडकर्णी. मी इझी सोल्युशन्स मध्ये संगणक प्रणालीचा हेड म्हणून काम करतो. आम्ही हा ROBOT बनवला आहे. मी आता तुम्हाला याबध्दल माहिती देतो. वास्तविक अश्लेषा मधे ROBOT आणि CHATGPT या दोन्हींचा समावेश आहे. तिला आपल्यासारखे हात आणि पाय आहेत. कपाळावरील मायक्रोफोन मधून ती आपले बोलणे ऐकू शकते आणि स्पीकर वापरून आपल्याशी बोलू शकते. कपाळावरील रिंगमधे इन्फ्रारेड SENSORS आहेत जे वापरून ती चारी बाजूला “बघू” शकते. आत्तापर्यंत कोणाला काही शंका, प्रश्न आहेत? पण ठीक आहे, आपण प्रश्नोत्तरे सर्वात शेवटी घेऊ. आपण प्रथम अश्लेषाशी गप्पा मारुया. हो, अश्लेषा तुमच्या आमच्या सारखी गप्पा देखील मारू शकते. नमस्कार, अश्लेषा!” नाडकर्णी सर म्हणाले.

“सुप्रभात, डॉ. नाडकर्णी! सुप्रभात, सौ. देशपांडे आणि माझ्या सर्व मित्रांनो!” अश्लेषाच्या स्पीकर मधून आवाज आला. बोलताना अश्लेषाचे डोळे, म्हणजे LEDs मिचमिचत होते. तिने दोन्ही हात जोडून सर्वांना नमस्कार केला.

“अश्लेषा, आम्हा सर्वांना तुझ्याबध्दल माहिती सांग.” नाडकर्णी सर म्हणाले.

“नक्कीच!”, अश्लेषाने सुरुवात केली. “माझा जन्म इझी सोल्युशन्स मधे झाला. मी फक्त सहा महिन्याची आहे, म्हणजे तुम्हा सर्वांपेक्षा तरुण आहे. पण मी एक मशीन आहे. मानवाचे ९५ टक्के गुणविशेष माझ्यात आहेत. फक्त मी emotionless आहे. म्हणजे माझ्यात सुख, दु:ख, आनंद, नैराश्य वगैरे भावना नाहीत. मात्र तुमच्याप्रमाणे मी नवनवीन गोष्टी शिकू शकते. ज्या गोष्टी शिकायला तुम्हाला दहा-पंधरा वर्ष लागतील त्या गोष्ट मी काही सेकंदात शिकू शकते. मी थोड्याच वेळात तुम्हाला कसे ते सांगेन पण त्या आधी आपण एक प्रात्याक्षिक बघुया. बंडू, कुंदा, जरा तुम्ही पुढे याल?” अश्लेषा म्हणाली.

बंडू आणि कुंदा जरा घाबरतच बाकावरून उठून पुढे आले. अश्लेषाने दोघांशी हस्तांदोलन केले. मग दोघांनाही तिने वर्गाकडे तोंड करून उभे राहण्याची खुण केली. मग प्रथम तिने बंडूच्या पाठीत हलकेच धपाटा मारला आणि कुंदाची वेणी ओढली. दोघेही चमकून अश्लेषाकडे पाहू लागले.

“हे लहानसे प्रात्यक्षिक होते, मी काय करू शकते याचे. पण यात तुम्हाला त्रास देण्याचा हेतू नाहीये.” अश्लेषा म्हणाली. “पाठीवर हळूच आघात झाला तर आपली पाठीची हाडे तो धक्का सहन करू शकतात. पण आघात जोराचा असेल तर पाठीचे हाड, म्हणजे मणका मोडू शकतो आणि मणक्याच्या आत असलेल्या मज्जावाहिनी, म्हणजे SPINAL CORD ला धोका पोचू शकतो आणि मनुष्य अर्धांगवायुचा शिकार होऊ शकतो. म्हणून पाठीत गुध्दे मारणे योग्य नाही.
तसेच वेणी हळूच ओढली तर ठीक पण जोरात ओढली तर केस तुटू शकतात. आणि जर मंदाने विग घातला असेल तर तो निघून येऊ शकतो.” हे ऐकून सर्व वर्ग हसू लागला. अश्लेषा मात्र निर्विकारपणे हे सर्व सांगत होती.
बंडू आणि कुंदा परत बाकावर जाऊन बसल्यावर अश्लेषाने परत बोलायला सुरुवात केली.

“आता हे सर्व मला कसे जमते हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मी जी आपणाला दिसते आहे त्याची सर्व बांधणी इझी सोल्युशन्सच्या वैज्ञानिकांनी आणि तंत्रज्ञांनी केली आहे. माझ्या सर्व भागांचे संयोजन म्हणजे CONTROL एक संगणक प्रणाली करते. ही एक आज्ञावली किंवा COMMANDS, WIFI द्वारे माझ्या हृदयात म्हणजे CPU किंवा CENTRAL PROCESSING UNIT मधे घातली जाते. माझी सर्व आज्ञावली ही संगणक तंत्रज्ञांनी लिहिलेली आहे. माझी सर्व कामे त्यानुसारच चालतात. फक्त तुमच्यासारखी मी दमत नाही. हे देखील तितकेसे खरे नाही. माझी बॅटरी संपली तर मी बंद पडते. मग परत बॅटरी चार्ज केली की कामाला लागते. सध्या आमचे तंत्रज्ञ सौरऊर्जा वापरून चार्जीग करण्यावर काम करत आहेत. ते झाले तर मी कधीच बंद पडणार नाही.

“एखाद्या मित्राशी बोलण्यासाठी, त्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी आपण त्याला नावाने हाक मारतो. माझेही तसेच आहे. आपण मला अश्लेषा म्हणून हाक मारली की मी आपले बोलणे ऐकायला तयार होते.”

“अश्लेषा”, नाडकर्णी सर म्हणाले, “आपण आता कार्यक्रमाच्या महत्वाच्या भागाकडे वळूया. त्या आधी मागे बसलेल्या संजयला एक प्रश्न पडलाय.”
“अश्लेषा, तू माझे होमवर्क करशील का?” संजयने विचारणा केली.
“नाही.” अश्लेषा म्हणाली. “तुझे होमवर्क तुलाच करावे लागेल. मी फक्त तुझे शंका निरसन करू शकते, तुला मदत करू शकते. पण त्यासाठी तुला मला विकत घ्यावे लागेल. सध्या तरी माझी किंमत तुला परवडणार नाही.” हे ऐकून सर्व वर्ग हसू लागला.

“जसे मी आधी म्हणालो त्याप्रमाणे, अश्लेषा एक यंत्रमानव आहे. पण तिच्या ARTIFICIAL INTELLIGENCE किंवा कृत्रिम बुध्दिमत्ता देखील आहे. हे काम कसे केले जाते हे तिच्याकडूनच ऐकुया, अश्लेषा?” नाडकर्णी सर अश्लेषाला म्हणाले.

“नक्कीच!” अश्लेषा म्हणाली. “मी इथे एक गोष्ट सांगू इच्छिते की ROBOT मध्ये लिंगभेद किंवा स्त्री-पुरुष असे काही नसते. मी माझ्या आज्ञावली प्रमाणे काम करते. ही नेहमी बदलता येते. आज मो. ह. विद्यालयात येण्या आधी विशेष आज्ञावली बनविण्यात आली होती. यात शाळेची, शिक्षकांची, मुलांची पूर्ण माहिती म्हणजे DATA माझ्या DATA BANK मधे भरण्यात आला. उदाहरणार्थ, तिमाही परीक्षेत संतोष भालेराव वर्गात पहिला आला होता तर ... शेवटचा आला होता, ज्याचे नाव मी सांगू नये अशी मला आज्ञा आहे.” परत सर्वजण हसू लागले. “पण त्याला देखील ८५ टक्के गुण मिळाले आहेत. शाळेच्या शिक्षकांचे म्हणून विशेष कौतुक करणे आवश्यक आहे.
“जरा विषयांतर झाले. मानवाचे काही नको ते गुणधर्म देखील माझ्यात आले आहेत. असो! मला जगातील ९५ टक्के गोष्टींचे ज्ञान आहे जे आपण पूर्ण जन्म घालविल्यावर देखील प्राप्त करू शकणार नाही. शिवाय मी आपल्याप्रमाणे स्वत: शिकू शकते, म्हणजे अधिक ज्ञान स्वत:हून प्राप्त करू शकते. आता हे सर्व कसे होते?
माझी कार्यसंस्था WIFI, GPS आणि उपग्रहाद्वारे जगातील इंटरनेट ला जोडली गेली आहे. इंटरनेट वर असलेल्या सर्व संगणक किंवा DATA प्रणाली मधील माहिती मी काही सेकंदात मिळवून आपणास सांगू शकते. आता आपण प्रात्याक्षिकच पाहूया. आपण कुणीही मला काहीही प्रश्न विचारू शकता. मी उत्तरे द्यायचा प्रयत्न करेन.”

बंडू लगेचच उभा राहिला. “अश्लेषा, आज या तासानंतर उपहाराची काय व्यवस्था आहे? खूप भूक लागली आहे.”
“ही माहिती मला आहे, पण ती गोपनीय असल्यामुळे मी सांगू शकत नाही.” बंडू हिरमसून खाली बसला.
“अश्लेषा, सध्या अमेरिकेच्या अध्यक्षांनी भारतावर किती TARIFF लावला आहे?” संतोषने विचारणा केली.
“५० टक्के!”
“अश्लेषा, सध्या जगातील स्त्री-पुरुष लोकसंख्येचा RATIO किती आहे?” संध्या जोशीने प्रश्न केला.
“९७३/१०००.”
“अश्लेषा, पुढील तिमाहीत भारताचा विकासदार किती असेल?”
“८.९ टक्के.”
“अश्लेषा, सोलर सेल कसा काम करतो?” ज्योती शिर्के.

“सोलर सेल मुख्यत: SILICON पासून बनतो. SILICON SEMICONDUCTOR DIODE मधे एक P-N JUNCTION बनवले जाते. त्याच्यात ELECTRON-HOLES हे वाहक म्हणून काम करतात. या दोन्हींचे CHARGE, NEGATIVE आणि POSITIVE, हे एकमेकांना आपल्यापासून दूर ढकलतात. सूर्यकिरण पडल्यावर हे वाहक JUNCTION पासून विभक्त होऊन विरुध्द दिशेला प्रवास करतात. त्यातून विद्युत तारेत प्रवाह निर्माण होऊन वीजनिर्मिती होते. हा प्रवाह वापरून बॅटरी चार्ज करता येते.”

“अश्लेषा, रस्त्यावर किती वाहनांची गर्दी आहे हे आपल्याला मोबाईल वर पाहता येते, ते कसे?” अजयने प्रश्न केला.
“हल्ली सर्वांच्या मोबाईलमध्ये GLOBAL POSITIONING SYSTEM म्हणजे GPS प्रणाली असते. ते सर्व उपग्रहाला जोडलेले असतात. शिवाय अनेक गाड्यांमधे GPS असतात. रस्त्यावरील सर्व GPS ची REAL-TIME मोजदाद करून रस्त्यावर एका वेळेस किती वाहने आहेत ते समजते. त्यावरून रस्त्यावरील वाहतूक मुराम्ब्याचा (TRAFFIC JAM) चा अंदाज येतो.”

“अश्लेषा, COMPUTER म्हणजे काय आणि तो कसे काम करतो?” देशपांडे बाईंनी प्रश्न केला.

“या आधी मी तुम्हाला संगणकीय भाषेबध्दल माहिती देते. मानवाला दहा बोटे आहेत म्हणून आपण दशमान पध्दत वापरतो. पण COMPUTER ला ० वा १, किंवा होय/नाही, म्हणजे BINARY भाषा समजते. आपण दिलेली माहिती BINARY मध्ये रुपांतरीत करून संगणकात साठवली जाते. संगणकाचे मुख्य चार भाग आहेत. स्थायी म्हणजे PERMENANT MEMORY, अस्थायी किंवा तात्पुरती MEMORY, CENTRAL PROCESSING UNIT, जिथे आकडेमोड केली जाते आणि INPUT/OUTPUT DEVISES, जसे की KEYBOARD, TERMINAL किंवा DISPLAY UNIT. शिवाय हल्ली WIFI ने पण जोडणी होऊ शकते. संगणकाची आज्ञावली स्थायी मेमरी मध्ये ठेवली जाते. त्याप्रमाणे संगणक काम करतो. सर्व आकडेमोड अस्थायी मेमरीत असते. तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला DISPLAY वा PRINTER वर उपलब्ध होतात. ही सर्व संगणक प्रणालीची ढोबळ माहिती आहे. तुम्हाला सविस्तर माहिती COMPUTER, गुगल किंवा AI देऊ शकेल.” एव्हढे बोलून अश्लेषाने विराम घेतला.

“अश्लेषा म्हणजे तारा.” नाडकर्णी सर म्हणाले. तारा म्हणजे दूरच्या एखाद्या ग्रहमालेतील सूर्य. ज्याप्रमाणे सूर्य आपल्याला प्रकाश देतो तसेच AI आपल्याला ज्ञान देण्याचा प्रयत्न करत आहे. हल्ली AI चा उपयोग आणि वापर वाढू लागला आहे. पण याचा उपयोग जसा चांगला मार्ग दाखवेल तसाच वाईट गोष्टींसाठी देखील होऊ शकतो. AI आपणच निर्माण केली आहे. याचा वापर कसा करायचा ते आपणच ठरवायचे आहे.

“अश्लेषा, मुलांनी वर्गात चोहीकडे खडू आणि कागदी बाण टाकले आहेत. कृपया ते सर्व उचलून कचरा कुंडीत टाक.” नाडकर्णी सरांनी आज्ञा दिली. अश्लेषाने दोन मिनिटात सर्व काम पूर्ण केले.

“अश्लेषा, या शिवाय तू सध्या काय माहिती विद्यार्थ्यांना देऊ शकशील?”

“आत्तापर्यंत मी जे काही दाखवले किंवा संगितले त्यात कृत्रिम बुध्दिमत्ता अथवा AI चा फारसा समावेश नव्हता. मी तुम्हाला एक समजेल असे उदाहरण देते. समजा तुमच्यापैकी एखादा मुलगा खेळताना पडला आणि त्याच्या गुडघ्याला खरचटले तर त्याला मलम लावा हे मी सांगू शकते. पण पाय मोडला तर X-ray काढून निदान करणे हे माझ्या DATA मध्ये नसेल तरी पूर्ण जगात अशी घटना आधी झाली असेल तर ती शोधून त्यावेळेला केलेल्या उपचारांचा मी माझ्या DATA मध्ये स्वत: समावेश करू शकते. थोडक्यात माझ्या बुध्दिमत्तेत स्वत:च वाढ करू शकते. तुमच्या आजाराचे निदान AI करेल. तुमच्यावरील शस्त्रक्रिया माझ्यासारखी एखादी अश्लेषा करेल. आकाश नावाचा ROBOT फॅक्टरीतील सर्व कामे करेल. मी तुम्हाला अभ्यासात मदत करू शकते. एखाद्या विषयावर निबंध कसा लिहावा किंवा जर काही कारणांनी तुम्हाला शाळेत येता येत नसेल तर वर्गशिक्षकांना कशी EMAIL लिहायची ते शिकवू शकते. मी चित्र काढू शकते, कथा, कविता लिहू शकते.
“यापेक्षा मोठ्या स्तरावर वाहतूक नियंत्रण करणे, आपत्काल परिस्थितीत उपग्रहाद्वारे लक्ष ठेवून सरकारला मदत करणे हे सर्व करू शकते.
“कंपनीमधे अनेक नैमित्तिक कामे जी हल्ली कर्मचारी करतात, ते मी करू शकते. यामुळे कंपनीचे खर्च कमी होतील. तुम्ही म्हणाल की यामुळे बेरोजगारी वाढेल. काही प्रमाणात हे खरे आहे. पण ही सर्व कामे AI कडून करून घेण्यासाठी कुशल तंत्रज्ञांची गरज वाढणार आहे. त्यामुळे तुम्ही आत्ता जे शिकत आहात त्यात आमुलाग्र बदल करणे गरजेचे आहे आणि हे खूप लवकर करावे लागेल.
“नैमित्तिक कामे AI करू लागल्यामुळे तुम्हा विद्यार्थ्यांना इतर गोष्टी, जसे की चित्रकला शिकणे, गाणे शिकणे, नवीन फॅशनचे कपडे बनवणे अशा अनेक कलात्मक गोष्टी करायला वेळ मिळेल आणि तुम्ही नवीन गोष्टींसाठी बाजारपेठा बनवू शकाल ज्यातून तुम्ही पैसे कमवू शकाल. इंग्रजीत एक म्हण आहे, “THINK OUT OF THE BOX”, म्हणजे नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे करा. हेच आपल्याला करावे लागणार आहे.

“मी अजूनही बरेच काही सांगू किंवा शिकवू शकते पण त्याला बराच वेळ लागेल जो आता आपल्याकडे @##$%%^&*#*()-”, अचानक अश्लेषा असंबध्द बोलू लागली. तिचे हातपाय वेडेवाकडे हलू लागले. तिचे LEDs उघडझाप करू लागले. वर्गातील सर्व विद्यार्थी घाबरून गेले. पण नाडकर्णी सर शांत होते. त्यांनी अश्लेषाच्या मागे जाऊन एक कप्पा उघडला आणि त्यातून एक वायर बाहेर काढली. तिचा प्लग घरात वापरात असलेल्या उपकरणांसारखा होता. तो सरांनी भिंतीवरील सॉकेटला जोडला आणि बटण चालू केले. त्याबरोबर अश्लेषा शांतपणे उभी राहिली. मागून एक कळ दाबून नाडकर्णी सरांनी तिला STANDBY वर टाकले.

“विशेष काही नाही. अश्लेषाचा चार्ज कमी झाला आहे. तिला अर्धा तास चार्ज केल्यावर ती पूर्वपदावर येईल. त्यामुळे आजचे हे प्रात्यक्षिक इथेच थांबवण्यात येत आहे.” नाडकर्णी सरांनी माहिती दिली.

“नाडकर्णी सर, आपण आज इथे आलात आणि आम्हाला हे प्रात्यक्षिक दाखवले म्हणून मी मो.ह. विद्यालयातर्फे आपले आभार मानते.” देशपांडे बाई म्हणाल्या.

“धन्यवाद. मला सांगायला आवडेल की इझी सोल्युशन्स शाळेशी लवकरच एक करार करणार आहे. त्यानुसार आठवड्यातून एक दिवस तुम्ही अश्लेषाला भेटू शकाल आणि नवीन गोष्टी शिकू शकाल. तेव्हा लवकरच भेटू. थोड्याच वेळात मी अश्लेषाला घेऊन कंपनीत परत जाईन. तेव्हा लवकरच परत भेटूया.”

“मुलांनो, आजचा हा तास इथेच संपत आहे. आपण सर्वांनी गडबड गोंधळ न करता वर्गाबाहेर जा. उगाच इथे घुटमळू नका.” देशपांडे बाईंनी आपल्या खास आवाजात सुचना देऊन मुलांना वर्गाबाहेर काढले.

तळटीप. ही एक काल्पनिक कथा आहे पण हे वाचून स्फूर्ती घेऊन एखादी कंपनी असा ROBOT बनवू शकेल जो शाळांना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरता वापरता येईल. असे झाले तर मला खूप आनंद होईल.

Comments

ही शक्यता नाकारता येत नाही. फक्त अश्लेषा ने देशपांडे बाईंची जागा घेऊ नये

By : Deepak Tikekar
13/09/2025 09 : 32 : 25 AM

कथेतून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाशी अगदी सहज जोडले गेले आहे. याचा वापर करून एखाद्या कंपनीने जर शैक्षणिक कार्यासाठी रोबोट तयार केला... तरी याहून दुसरे काय हवे आहे... कथेतून शाळेचे वास्तव दर्शन झाले आहे.. ही कथा विद्यार्थ्यांना प्रेरक नक्की. ठरेल.

By : Krupa Nitin Ghag.
13/09/2025 6 : 29 : 40 PM

शशांक कथा काल्पनिक असली तरी आजच्या युग साजेशी आहे....उत्तम लेखन..छान विश्लेषण सध्याच्या काळाचे...

By : Nitin Pagedar
14/09/2025 07 : 24 : 47 AM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article