कॅार्पोरेट बेडरूम


कॅार्पोरेट बेडरूम

शशांक पुरंदरे

मिल्क कुकर आपल्या डबल डोअर फ्रिजमधे ठेवून कावेरीने किचनवरून एक शेवटची नजर फिरवली. सर्व किचन लाईटस् बंद करुन कावेरी हॅालमधे आली. सिया, वय वर्ष बारा आणि समीर, वय वर्ष दहा, आधीच त्यांच्या बेडरुममधे पसार झाले होते. पण दरवाजाच्या खालच्या फटीतून दिसणारी प्रकाशरेषा दोघेही अजून झोपलेले नाहीत हेच दर्शवीत होती. त्यांच्या बेडरुममधे डोकावण्याचा मोह आवरुन कावेरीने घराचा मेन दरवाजा बंद केला, हॅालमधील सर्व लाईटस् बंद केले आणि आपल्या बेडूरुममधे प्रवेश केला.

अभि नेहमीप्रमाणे बेडवर पडून मोबाईल पाहण्यात मग्न होता. कावेरीने किचन एप्रन टिल वॅाश मधे टाकला आणि ड्रेसिंग टेबलासमोर बसली. केसांची क्लिप काढून केस मोकळे केले. तिचे काळेभोर केस छान खांद्याच्याही खालपर्यंत येत होते. दोन्ही हात मागे करुन तिने डोक्यावरुन टॅाप काढला आणि नेम धरुन टिलवॅाशमधे फेकला. तिला आपले कॅालेजचे दिवस आठवले. बास्केटबॅालमुळेच तिची आणि अभिची भेट झाली होती.

“मी अजूनही बास्केटबॅाल खेळू शकेन.” ती अभिला म्हणाली, पण तो मोबाईलमधेच रमला होता.

कावेरीने स्वतःला आरशात निरखून पाहिले. चाळीस वर्षांच्या मानाने अजूनही तिची फिगर वेल मेंटेन्ड होती. अजूनही जमेल तसे आठवड्यातून तीनवेळा तरी ती पाच किलोमीटर धावत होती. मरून रंगाचा लो नेक शिमरी गाऊन घालून कावेरी अभिच्या बाजूला पहुडली. उजव्या हाताने अभिच्या हातातील मोबाईल घेवून तिने नाईट स्टॅंडवर ठेवला आणि डावा हात अभिच्या छातीवर ठेवून म्हणाली, “काय म्हणतोय आमचा अभि?”

उत्तरादाखल अभिने तिला जवळ ओढले आणि तिच्या ओठांचे चुंबन घेतले.

पंधरा मिनिटांनी अभि वॅाशरुम मधून बाहेर आला. कावेरीने वाईनचा एक ग्लास अभिच्या हातात दिला. तिचा स्वतःचा ग्लास निम्मा झालेला होता.
“आज कितीतरी दिवसांनी निवांत वेळ मिळाला नाही?” कावेरीच्या नुकत्याच विंचरलेल्या केसांना आपल्या हाताने परत गुंतवत अभि उद्गारला. कावेरी परत अभिच्या मिठीत शिरली.

“मिठीतला मी पहिला की दुसरा ग?”अभिने विचारले.
“सहावा!” खट्याळपणे हसत कावेरी म्हणाली.
“मोठी आली! मी होतो म्हणून तुला नवरा तरी मिळाला.”
“मोठा हिरो ना तू! कॅालेजमधील पूर्ण मुलांची बास्केटबॅाल टीम माझ्या मागे होती. म्हणून तर तू सहावा!!”
“पण सहावाच आवडला ना!”
“म्हणून नाही. तुझी फॅट सॅलरी आवडली मला!”
“तू पण तितकेच कमावते आहेस ना!”
“जेलस हं! पैसे मिळतील तेव्हढे कमीच असतात रे.”

आज शुक्रवारची रात्र, त्यामुळे पुढचे दोन दिवस जरा निवांत होते. नाही म्हणायला शनिवारी दोन्ही मुलांच्या इतर ॲक्टिव्हिटीज होत्या पण सकाळी उशीरापर्यंत झोपायची मुभा होती.

“तू मुलांशी बोललास का? समीर इलोक्यूशन स्पर्धेत पहिला आलाय.”
“येणारच! ममाचे भांडायचे सगळे गुण उचलले आहेत.”
“आणि सियाने छान पोएम लिहिली आहे.”
“हा मात्र माझा वारसा आहे.”
“आई बाबा दोन दिवस विद्याकडे गेले आहेत.” न ऐकल्यासारखे करून कावेरी म्हणाली. “आणि हो, मला नवीन कार हवी आहे. माझी गाडी सारखी बंद पडते आहे. आज रमेश होता म्हणून कशीबशी मी घरी पोहोचले. तू ऐकतो आहेस ना मी काय म्हणतेय ते?”

अभिने उरलेली वाईन संपवून खुणेनेच कावेरीला रिफील करायला सांगितले.

“मी उद्याच लाखानीला फोन करतो. तो मल्टी-कार डीलर आहे. आणि हो, आमची कंपनी मला नवीन लक्झरी कार देणार आहे. इन फॅक्ट, आम्ही सहा नवीन गाड्या विकत घेत आहोत, त्यात तुझी सातवी! चांगले डील मिळेल.”
“डन !” कावेरी एकदम खूष झाली. “उद्या आपल्याला वेळ आहे. उद्याच नवीन गाडी सिलेक्ट करुया.”
“उद्या नाही, फारतर संध्याकाळी जाऊ शकतो. मला एक अर्जंट प्रेझेंटेशन बनवायचे आहे.”
“काय रे अभि! मी म्हणत होते उद्या आई बाबा नाहीयेत, मुलं पूर्ण दिवस बिझी आहेत. छान बाहेर लंच घेतलं असतं, तर तुझे हे काम! “ हिरमुसली होऊन कावेरी म्हणाली.

“सॅारी! पण एक करता येईल. चार वाजता लाखानीमधे जावू, कार बघू, मग सात वाजता मुलांना पिकअप करुन डिनरला जावू आणि रात्री एखादा मूव्ही पाहू. बच्चाभी खेले और बापभी खेले!” “डन!” कावेरी एकदम खूष झाली.

अभिने वाईन संपवून परत मोबाईल उचलला. कावेरीने तो परत खेचून टेबलावर ठेवला.

“ऐ अभि, सोड ना! बोल जरा माझ्याशी!”
“मला एकच मिनिट दे. मेघनाला एक मेसेज पाठवतो, मग झालं!”
“ओह! मेघना!! युवर ॲाफिस स्पाऊस!!! पाठव पाठव. पूर्ण दोन तासांचा विरह आहे तुमचा!”
“अॅाफिस स्पाऊस काय, कलीग आहे माझी. आणि कामाचाच मेसेज आहे.”
“माझ्यापेक्षा जास्ती वेळ तर तू तिच्याबरोबर घालवतोस! शिवाय तुमच्या ॲाफिस टूर्स पण असतातच.”
“मॅडम, ती माझी को-वर्कर आणि चांगली मैत्रीण आहे. आणि पॅकेजिंग इंडस्ट्रीमधे टुरिंग तर असणारच ना! बाय द वे, तुझा ॲाफिस स्पाऊस, सोहम, काय म्हणतोय?” अभिने गुगली टाकला.

“मजेत!” आता बाजी पलटणार हे कावेरीला समजले. तिने लगेच विषय बदलला.

“आपल्या डायनिंग चेअर्स आणि सोफासेट बदलायला हवाय. हवाय. रविवारी जमेल का बघायला? का तुला अजून एखादे प्रेझेंटेशन आहे?” कावेरीने जरा खोचक प्रश्न केला.

“जमेल.” असे म्हणून अभिने परत मोबाईल उचलला. मेघनाला मेसेज पाठवून त्याने मोबाईल बंद केला. कावेरी वाईनचे ग्लासेस बाजूला ठेवून बेडवर आली.”

“झोपूया?” कावेरीने प्रश्न केला.
“झोपायचे… की सेकंड राऊंड?” असे म्हणून अभिने नाईट लॅम्पस् ॲाफ केले.

Comments

अजुन फांदी हिरवी आहे 👍🤪

By : हेमंत
21/09/2025 12 : 45 : 53 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article