सकल गुजरात समाज
सकल गुजरात समाज
शशांक पुरंदरे
हल्ली हे माझ्या बाबतीत सतत होतंय, का ते माहित नाही. आज देखील मी योग चटई अंथरली. पद्मासनात स्थानापन्न झालो आणि दरवाजावरील घंटा नादली. एकदा पद्मासनात बसल्यावर त्यातून स्वतःला उलगडून उठणे किती कठीण आहे हे आपण सर्व जाणताच. पत्नी न्हाणीघरात सौंदर्य साबण निरमाची वडी झिजवत असल्यामुळे मला उठणे भाग होते.
मी दरवाजा उघडला. समोर एक सव्वा पाच फूट उंच, कृष व्यक्ति उभी होती. अंगावर हॅंगरवर लटकवल्यावर कसा दिसेल तसा लांब झब्बा आणि खाली सुरवार होती. खांद्याला शबनम लटकत होती. डोळ्यावर सोडावॅाटर बॅाटलच्या तळाएव्हढ्या जाड भिंगांचा चष्मा होता. हल्ली या बाटल्या नाहीश्या झाल्या आहेत.
“साशंक पुरणदेव आपणच ना?” समोरुन पृच्छा झाली.
“नाही.” म्हणून मी दरवाजा बंद करणार तेव्हढ्यात रविंद्र जडेजाला लाजवेल अशा चपळाईने आपला उजवा पाय पुढे टाकत या गृहस्थाने दरवाजा बंद होऊ न देता मला बाजूला ढकलून आत प्रवेश केला.
“बाहेर नावाची पाटी तर तीच हाय.”
“शशांक पुरंदरे असं लिहिले आहे.”
“माफ करा, माझा डोळ्याचा नंबर वाढलाय त्यामुळे नीट दिसले नाय मला.” असे वदून हे गृहस्थ सरळ सोफ्यावर विराजमान झाले.
नवीन चष्मा केला तर किती जाड भिंगांचा असेल याची मी कल्पनाही करु शकत नव्हतो.
“कोण आपण?” मी जरा वैतागूनच म्हणालो. एकतर हा माणूस सरळ घरात शिरला होता आणि माझ्या योगाभ्यासात व्यत्यय आला होता.
“वाय आय पटेल.”
“आता मला काय माहित तुम्ही का पटेल आहात ते?” मला मोहन गोखलेच्या मराठी मालिकेची आठवण झाली.
“यजुवेंद्र इंद्रसेन पटेल. माझं नाव. म्हणून वाय आय पटेल.”
“हे पहा वाय फाय -“
“वाय आय.”
“तेच ते. सध्या मी योगसाधना करतोय. तुम्ही नंतर या. हा मी बर्म्युडा घातलाय. दिसतोय ना?”
“तुम्हाला चांगला नाय दिसत. बदलून या.”
“बदलून काय या? तुम्ही नंतर या.”
“नंतर मला वेळ नाही. अनेक घरी जायचंय.”
“तुम्ही देणगी मागायला आला आहात का? मिळणार नाही.”
वाय आयनी आपली शबनम काढून टीपॅायवर ठेवली. चष्मा काढला आणि खिशातून रुमाल काढून चेहरा पुसला.
“मला जरा पाणी मिळेल का?” मी समोरची पाण्याची बाटली पुढे सरकवली. अर्धी बाटली घटाघटा संपवून वाय आयने आपली तृषा शमवली. कुठल्या वाळवंटातून आला होता कोण
जाणे!
“साशंक सर -“
“शशांक!”
“तेच ते. वडस्वर्थ म्हणाला आहे ना, नावात काय आहे?”
“शेक्सपियर!”
“तेच ते. तुम्ही मधेमधे बोलू नका हो. आम्ही एक सांस्कृतिक संमेलन आयोजित करत आहोत.”
“आम्ही म्हणजे?”
“सकल गुजरात समाज.”
“सकल? म्हणजे किती सभासद आहेत?”
“सध्या मी एकलच आहे. पण पर्वा नाय. आमची सर्व सोसायटी येनार!”
“एम गुजराती नथी. मी मराठी माणूस आहे. पुरंदरे.”
“माहित आहे मला. मी बाजूच्या सोसायटीत राहतो. तुम्ही मराठी आहे पण तुमच्या हिंदी कविता काय लिहिता तुम्ही! परवाच मी वाचली, तुम्हारे आनेसे हम चले गऐ, काय पोयटरी होती.”
“वाय आय, तुम्हारे आनेसे दिन महक गऐ, असं आहे ते!”
“असं काय? ते माझा नंबर वाढलाय म्हणून चुकीचे वाचले.”
“तुम्ही कुठे वाचली?”
“तुमच्या ब्लॅाकवर.”
“ब्लॅाक नाही ब्लॅाग म्हणतात त्याला!”
“माझं इंग्रजी जरा कच्च हाय, पण मराठी गुजराती एकदम चौकस!”
“माझं गुजराती एकदम भंकस! गुजराती नथी आवेश!” मी वाय आयला पुरावाच सादर केला.
“पर्वा नाय. तुमच्या हिंदी पोयटरीने आमच्या सकल गुजराती समाजाला पर्सपिरेशन मिळेल.”
“तुम्हाला इंस्पिरेशन म्हणायचंय का?” याचं इंग्रजी ऐकून मला घाम फुटायचा बाकी होता.
“मी काय तुमचा ऐकणार नाय. तुमी यायचा, वाख्यान द्यायचा, पोयटरी गायचा, आमच्या सकल गुजराती समाजाला खूप आवडेल. पुरणदेव सर, आमच्या समाजात गरबा दांडिया आणि फाफडा जलेबी येव्हढंच चालतंय बघा. तुमच्या सारखे विदूषक-“
“विदुषी!”
“तेच ते. आले तर किती फायदा होईल, शेअर मार्केट पेक्षा जास्त होईल फायदा!”
पोयटरी आणि शेअर मार्केटची तुलना म्हणजे प्रकरण जरा अवघडच होतं.
“पण तुमच्या सकल गुजराती समाजात पण असतीलच ना कवी, लेखक वगैरे. त्यांना बोलला की तुमच्या सांस्कृतिक मंचावर!”
“ते येतीलच हो. पण बाहेरच्या माणसाने शिकवलं तर जास्ती डिफेक्टीव-“
“इफेक्टीव.”
“तेच ते. होईल. सोनारानेच कान टोचले पाहिजेत. आमचा सकल गुजराती समाज फक्त सोनंचादीच गोळा करतो. बाकी साहित्य शून्य. तुमी याच आमच्याकडे. नंतर फक्कड डिनर ठेवू. उंधियो, दाल खिचडी, जलेबी वगैरे.”
“अहो मी गोड खात नाही.”
“चिंता नाय. शुगर फ्री ठेवूया. आंणि भाभीना पण घेवून या!” शुचीर्भूत होऊन आलेल्या माझ्या पत्नीला देखील वाय आयने तिथल्या तिथे निमंत्रण दिले.
“अय्या, कुठे जेवायला बोलावताहेत हे?” हिच्या तीक्ष्ण कानांनी जेवणाचा मेनू बरोबर ऐकला होता.
“हे वाय आय पटेल. शेजारच्या सोसायटीत राहतात. आपल्याला सांस्कृतिक कार्यक्रमाला बोलावयाला आले आहेत.”
“तुम्ही आनंदीबेनचे मिष्टर ना? माझी चांगली मैत्रीण आहे आनंदी!”
“मग ठरलं तर! संडेला पाच वाजता या एकदम नवीन फक्कड पोयटरी घेवून!”
“अरे पण संडेला माझा उपवास असतो.” मी संकटसमयी बाहेर पडण्याचा मार्ग निवडला.
“पर्वा नाय. आपण उपवासाचे पदार्थ ठेवू. साबुदाणा खिचडी, वेफर्स वगैरे.”
“माझा निर्जळी उपवास असतो.”
“पर्वा नाय. तुमी पाणी नको, ज्यूस पिवा.”
“आम्हाला चालेल.” बायकोने परतीचे सर्व दोर कापून टाकले. “यांचा उपवास फ्लेक्सिबल असतो. आठवड्यात कधीही एक दिवस केला तरी चालतो.”
“मग संडे फायनल. पुरणदेव सर, एक विनोदी कथा पण लिवून ठेवा. मजा पडेल.” हा वाय आय काही मला सोडायला तयार नव्हता.
“भाभी, तुमी पण कथा कविता लिवता काय?” आता वाय आयने भाभीला जाळ्यात ओढले.
“नाही, पण मला जोक सांगता येतात.” मी मनातल्या मनात कपाळाला हात लावला. हिचे जोक म्हणजे दोन सरदारजी चेस खेळत होते किंवा उपरके जिनेसे धाडकन पड्या या टाईपचे होते.
“मग तर लई बेस! साशंकसर कविता बोलतील आणि तुमी जोक बोला. चला मी येतो. तुमाला संडेला गाडी पाठवतो.”
बाजूच्याच सोसायटीत जायला गाडी कशाला हे मी म्हणायच्या आता इनोव्हा क्रिस्टा पाठवा असे म्हणून बायकोने मॅाडेलपण फायनल करुन टाकले.
तुम्ही बाहेर कोणीही असते पण घरी बायकोच बॅास असते हेच खरे सत्य आहे. पटत नसेल तर एकदा स्वतःच्या बायकोशी बोलून पहा!!!



Comments
खूप छान. मनोरंजक संवाद .
By : योगिनी लोथे