याला काय नाव द्यावे?


याला काय नाव द्यावे?

शशांक पुरंदरे

टीप: ही एका संवेदनशील विषयावरची कथा आहे. सर्व वाचकांना रुचेल हे जरुरी नाही. तेव्हा, कृपया काळजीपूर्वक हाताळावी.



“ऐ मुलींनो, आवरा पटापट. पाच वाजलेत. पक्षी निरीक्षण करायचे असेल तर लवकर बाहेर पडायला लागेल. जा, दात घासा आणि आंघोळ करून घ्या लवकर.” कोकाटे बाईंनी आपला खास आवाज लावला आणि सर्व मुली आवरायला पळाल्या. भरतपूर पक्षी अभयारण्यात सरस्वती विद्या मंदिराची स्टडी टूर आली होती. सातवीच्या वर्गातील साधारण १२-१३ वर्षाच्या पंधराएक मुली होत्या.

विभा आणि शुभदा अगदी जीवाभावाच्या मैत्रिणी होत्या. कायम एकमेकी बरोबर असायच्या. दोघीही धावत एकाच बाथरूममधे शिरल्या. एकमेकांकडे पाठ करून दोघींनी कपडे काढले आणि एकाच शॉवर खाली उभ्या राहिल्या. पाणी अतिशय थंड होते. शॉवर बंद करून दोघींनी अंगाला साबण लावायला सुरुवात केली. विभा शुभदाला म्हणाली, “मला जरा पाठीला साबण लावून दे ना!” शुभदाने विभाकडे तोंड केले आणि डोळे मिटून तिच्या पाठीला साबण लावू लागली. विभाला अचानक आपल्याला काहीतरी वेगळे वाटतंय असे जाणवू लागले. पुढच्या मिनिटाला दोघी एकमेकीच्या मिठीत होत्या. कोकाटे बाईंच्या आवाजाने दोघी भानावर आली. पटापट आंघोळ संपवून कपडे घालून दोघी बाहेर पडल्या. नंतर दिवसभरात दोघीही एकमेकींची नजर चुकवीत होत्या.

मुंबईला परतल्यावर अनेक वेळा अभ्यासासाठी म्हणून दोघी एकमेकांच्या घरी रात्री मुक्कामाला असायच्या. अभ्यासात दोघीही हुशार होत्या. पण अभ्यासानंतर अनेक रात्री दोघींनी एकमेकी सोबत घालविल्या होत्या.

कम्प्युटर सायन्स मधे डिग्री घेऊन दोघी लगेचच “न्यू सोल्युशंस” मधे कामाला लागल्या होत्या अवघ्या एकविसाव्या वर्षी!

विभाचे रुपांतर एका सुंदर तरुणीत झाले होते. साडेपाच फूट उंच, गोरीपान आणि त्यालाच साजेशी जिम मधे कष्ट करून कमावलेली फिगर, यामुळे अनेक मुले तिच्या मागे लागली नसती तरच नवल! विभाने त्यांना प्रोत्साहनही दिले नाही किंवा अनुत्साहित पण केले नाही. शुभदा आणि विभाचे “व्यवस्थित” सुरु होते. पण विभा बाय-सेक्शुअल होती हे तिच्या लक्षात आले होते. तिने तसे शुभदाला सांगितले पण होते. शुभदाला पण काही प्रॉब्लेम नव्हता.

शुभदा पण दिसायला छानच होती. तिच्या लांब काळ्याभोर केसांवर विभा फिदा होती. पण शुभदा जरा लाजरी-बुजरी होती आणि मुलांपासून दोन पावले लांबच असायची. लवकरच लोढाच्या एका टॅावरमध्ये दोघींनी आजूबाजूला घरे घेतली आणि तिकडे राहू लागल्या.

काही दिवसानंतर विभाने सर्वकाही घरच्यांना सांगून टाकले. त्यांना तो धक्काच होता, पण परिस्थिती स्वीकारण्याशिवाय पर्याय नव्हता.

शुभदाची परिस्थिती जरा वेगळी होती. तिच्या घरचे लोकं जरा जुन्या वळणाचे होते. त्यांना समजावयाला दोघींनाही जरा जड गेले. पण शेवटी मुलीच्या प्रेमाखातर त्यांनी ते मान्य केले.

आज अठरा वर्षानंतरही विभाला तो शुभदाचा पहिला स्पर्श आठवत होता. रात्रीचे बारा वाजून गेले होते. बाजूला शुभदा शांतपणे झोपली होती. विभाला कशामुळे जाग आली ते आठवत नव्हते. उठून एक ग्लास पाणी पिऊन ती परत बेडवर आली. शुभदा पलीकडे तोंड करून पहुडली होती. तिचे लांबसडक केस पाठीवर अस्ताव्यस्त पसरले होते. विभाने तिला पाठीमागून मिठी मारली आणि एकाच पांघरुणात दोघीही झोपी गेल्या.



विक्रमने शुभाशिषला हलवून जागे केले.
“घोड्या, उठ. आठ वाजलेत. आज ऑफिसला जायचंय, लक्षात आहे ना?”
उत्तरादाखल शुभाशिषने विक्रमलाच जवळ ओढले. “दोन मिनिटे.”

दोघेही आपापल्या गाड्यांनी दहा वाजायला दोन मिनिटे असताना “न्यू सोल्युशंस” च्या ऑफिसमध्ये पोहोचले. दोघे कंपनीचे ५० टक्के भागीदार होते. आज दोघांच्या पस्तिसाव्या वर्षी कंपनीचा शंभर कोटीच्या वर व्यवसाय होता. पंचवीस संगणकीय पदवीधर कंपनीत काम करत होते.

विक्रम जवळजवळ सहा फुट उंच आणि दिसायला आकर्षक होता. शुभाशिष पण पावणे सहा फुट होता, साहजिकच दोघे एकमेकांकडे आकर्षिले गेले होते. आणि संगणक हा दोघांमधील महत्वाचा दुवा होताच.

“सुप्रभात.” विभाने दारातच दोघांना विश केले.
“सुप्रभात,” म्हणून दोघेही आत शिरले. विभादेखील त्यांच्या मागोमाग आत शिरली.

“न्यू सोल्युशंस” ची स्वत:ची तीन मजली इमारत होती. रुंद काचेच्या दरवाजातून आत शिरल्यावर समोरच स्वागत कक्ष होता. डाव्या बाजूला दोन उद्वाहक होते. उजव्या बाजूला दरवाजातून आत गेल्यावर एका बाजूला शासकीय कक्ष होता. उजव्या बाजूला संगणक रूम होती. पहिल्या मजल्यावर संगणक इंजिनियर्स साठी क्युबिकल्स होत्या. तिसऱ्या मजल्यावर वीस बाय वीसची कॉन्फरन्स रूम होती. शेवटी विक्रम, शुभाशिष, विभा आणि शुभदा यांची ऑफिसेस होती.

विक्रम, शुभाशिष, विभा आणि शुभदा एकदमच कॉन्फरन्स रूम मधे शिरले. बाकी सर्व अगोदरच येऊन बसले होते. सर्व स्थानापन्न झाल्यावर विक्रमने माईकचा ताबा घेतला.
“मला सांगायला अतिशय आनंद होत आहे की आजच आपल्या कंपनीला पंचेचाळीस कोटींची ऑर्डर मिळाली आहे. लवकरच कामाचे स्वरूप आपल्याला कळेलच. पण या प्रीत्यर्थ आज संध्याकाळी कॉकटेल पार्टी आयोजित केली आहे. आपल्या कोणालाही मुद्दाम या म्हणून सांगायची गरज आहे असे मला वाटत नाही.” हश्या आणि टाळ्यांच्या गजरात सभा समाप्त झाली.

विक्रमने खुणेनेच विभा आणि शुभदाला आपल्या केबिनमधे यायला सांगितले. त्या दोघी कंपनीच्या प्रोजेक्ट लीडर होत्या. पुढील एक तास चौघांमध्ये प्रोजेक्ट बद्दल चर्चा झाली. कुणाला काय काम द्यायचे हे ठरवले गेले.



रात्रीचा एक वाजून गेला होता. पार्टी संपवून सर्व आपापल्या घरी गेले होते. फक्त विक्रम, शुभाशिष, विभा आणि शुभदा हॉलमधे बसले होते.
“कसे आयुष्य आहे ना?”, शुभाशिष म्हणाला,” कंपनी छान चालली आहे. पैशाची चिंता नाही. पण प्रश्न एकच आहे. मी आणि विक्रम, आम्ही गे आहोत आणि तुम्ही दोघी लेस्बीयन!”
“मला काही फरक पडत नाही.” विभाला जवळ ओढून तिचे चुंबन घेत शुभदा म्हणाली.
“मलाही! आणि मला पुरुषही चालतात!” विभाने म्हणाली.
“या विभाचा वेगळाच प्रॉब्लेम आहे! पण ते जाउदे. प्रत्येकाच्या लैंगिक निवडी वेगळ्या असतात हे मला मान्य आहे. फरक आम्हालाही पडत नाही वैयक्तिक पातळीवर.” विक्रम म्हणाला.
“आमच्या घरी सगळे आलबेल आहे.” शुभदा म्हणाली.
“तुमच्यासारखे आमचेही लागून फ्लॅट्स आहेत. त्यामुळे दैनंदिन जीवनातही सर्व ठीकच आहे म्हणा!” शुभाशिष म्हणाला.
“माझ्या घरातील लोकांनी माझ्याशी संबंधच तोडले आहेत. फक्त माझी बहीण माझ्या बाजूने उभी आहे.” विक्रम म्हणाला.
“आमच्याकडे पण काही समस्या नाही. मला वडील नाहीच आहेत. आईचा मला विरोध नाही. भावाला पण काही प्रॉब्लेम नाही.” शुभाशिष म्हणाला.
“पण इतरांचे काय? आपले सहकारी, मित्रमैत्रिणी, नातेवाईक?? शिवाय सामाजिक पातळीवर देखील समस्या आहेतच. सरकारची देखील या गोष्टींना मान्यता नाही. कायदेशीर समस्या उद्भवू शकतात त्या वेगळ्याच! या सर्व बाबींचा आपल्याला विचार करावा लागेल.” विक्रम म्हणाला.
“ठीक आहे. बघुया पुढे काय करायचे ते. आता रात्रीचे दोन वाजले आहेत. तेव्हा घरी जाणे गरजेचे आहे. परत उद्यापासून नवीन काम सुरु करायचंय ना!” विभा उद्गारली.



सौरभ आणि माधवी तीन वर्षांपूर्वी “न्यू सोल्युशंस” मधे जॉईन झाले होते. सुरवातीला दोघेही एकाच प्रोजेक्ट वर काम करत होते. कधी एकमेकात गुंतून त्याचे प्रेमात रुपांतर झाले हे दोघांनाही कळले नाही. नंतर दोन वर्ष ते एकमेकांबरोबर “लिव्ह इन” मधे रहात होते. पण पुढे काय करायचे ते दोघांनाही कळत नव्हते. लग्न करण्यात काही अडचण होती अशातली गोष्ट नव्हती. पण त्यासाठी दोघांचीही मानसिक तयारी होत नव्हती. त्यामुळेच घोडं अडलं होतं.

शेवटी एक दिवस सौरभने त्याच्या घरी जाहीर केले की तो लिव्ह इन मध्ये रहात आहे. त्याचे वडील शांत होते पण त्याची आणि आईची जुगलबंदी सुरु झाली.

“लिव्ह इन? ते काय असते?” आई.
“म्हणजे मी आणि माधवी एकत्र रहात आहोत.” सौरभ.
“म्हणजे? लग्न न करताच?” आई चिडलीच सौरभ वर!
“हो.”
“अरे तुला काही लाज? लोकं शेण घालतील आमच्या तोंडात! म्हणजे बाई ठेवली आहेस असं सांग ना!”
“काहीही बोलू नकोस. आमचा दोघांचा तसा रीतसर नोंदणी करार झाला आहे.” सौरभ शांतपणे म्हणाला.
“करार? अहो, तुम्ही बोला काहीतरी. हा काय म्हणतोय? डोकं फिरलंय का याचं?”

बाबा फक्त शांतपणे ऐकत होते.

“हे बघ आई, हल्ली हे कॉमन आहे. आत असे पहा, आम्ही दोघांनी लग्न केले, आणि काही कारणांनी आमचे पटले नाही, घटस्फोट झाला तर? त्यापेक्षा करार करून एकत्र राहू. पटले तर ठीक नाहीतर आम्ही सोडून देऊ. मग दोघेही मोकळे!”
“आणि मुलांचे काय?”
“ती जबाबदारी नको आहे आम्हाला.”
“मग काय आयुष्यभर तसेच राहणार?”
“ते वेळ येईल तेव्हा पाहू.”
“अहो, हे सर्व तुम्हाला चालणार आहे?”
“हो.” बाबा शांतपणे म्हणाले.

आईने कपाळाला हात लावला. “पण मग समाजाचे, नातेवाईकांचे काय?”
“त्यांना सांगून टाकू आम्ही लिव्ह इन मध्ये आहोत म्हणून! विषय संपला.”
“तुला सगळं इतकं सोपं वाटतं तसं नाहीये.” आई म्हणाली. “बरं लिव्ह इन चा काही समारंभ असतो का? म्हणजे भटजींना बोलावून वगैरे?”

आता बाबांनी कपाळाला हात लावला.

“आई, तू विचार करणे बंद कर. मी बघतो काय करायचे ते”, असे म्हणून सौरभने विषय संपवला.



सुमित आणि आकाश स्क्रू ड्रायव्हर बार मध्ये बसले होते. आकाश एक फ्रीलॅन्स छायाचित्रकर होता तर सुमित एका इंजिनीरिंग कंपनीत कामाला होता. आज खूप दिवसानंतर दोघं भेटत होते. त्यांच्या कामाच्या वेळा निश्चित नसल्यामुळे दिवसेंदिवस भेटणे अवघड होत चालले होते. दोघे शाळेपासूनचे मित्र होते.

“अरे यार, माझ्या घरचे मागे लागले आहेत लग्न कर म्हणून.” सुमित म्हणाला. “पण माझ्या वेळेचा भरोसा नाही. लग्न केले तर बायकोला भेटू तरी कधी? आणि बायको जॉब करणारी हवी. कारण हल्ली एकाच्या पगारात भागेल, पण खूप तडजोडी कराव्या लागतील आणि ते मला नको आहे.”

“सेम हियर. मी रात्री अपरात्री घरी जाणार, तेव्हा बायको झोपलेली असणार. मग काय करू मी लग्न करून? पण हे घरच्यांना कळतच नाहीये. आणि लग्नानंतर इतरही जबाबदाऱ्या वाढणार, त्याचे काय? सगळे अवघडच आहे एकंदरीत!”

“आणि मला स्क्रू ड्रायव्हर दे म्हटल्यावर फिलिप्स, फ्लॅटहेड की व्होडका विथ ऑरेंज ज्यूस असे विचारणारी बायको हवी. मिळेल का अशी?” सुमित म्हणाला.
“आणि मला फोटोचा काँट्रास्ट जरा जास्ती झालाय हे समजणारी हवी आहे.” आकाशने त्याच्या सुरात सूर मिसळला. “एकंदरीत आपल्या अपेक्षा जरा जास्तच आहेत असेच आपल्या घरच्यांना वाटतंय. जाऊदे, सध्या चाललंय ते चालुदे. पुढचे पुढे पाहू. टू मोर शॅाट्स प्लीज!” आकाशने बारटेंडरला सांगितले.

“माफ करा. मी तुमचे बोलणे ऐकत होते. मी जॉईन करू तुम्हाला?” बाजूच्या टेबलावर बसलेली प्रज्ञा म्हणाली.
“ओह नक्कीच! या ना!” सुमित म्हणाला.

“माझी समस्या वेगळीच आहे.” प्रज्ञा म्हणाली. “मी एका कंपनीची डायरेक्टर आहे. वय चाळीस, महिन्याला दीड कोटी पगार आहे. वरळीला चार बेडरूमचा फ्लॅट आहे. मी माझ्या आईबरोबर राहते. लग्न करायची इच्छा आहे पण तोडीचा जोडीदाराच मिळत नाही अशी स्थिती आहे. आता बोला!” चेहरा आकर्षक असला तरी प्रज्ञाचे वय तिच्याकडे पाहून जाणवत होते. वजनही थोडे जास्त असले तरी एकंदरीत अजूनही व्यक्तिमत्व छानच होते तिचे!

“आम्ही दोघे एकदम तुझ्याशी लग्न करू शकतो! दोघांपैकी एकतरी घरी असेल तुझ्यासाठी नेहमी! चालेल?” हे सुमितचे बोलणे ऐकून तिघेही हसत सुटले.

“अजून एक शॉट!” प्रज्ञा बारटेंडरला म्हणाली.

“एक नाही, दोन!” असे म्हणून मयूर बाजूच्या स्टुलावर बसला. मयूर ३४ वर्षांचा होता.

“मी मयूर. तुमच्या व्यथा ऐकून मला राहवले नाही. आमची कथा अजूनच वेगळी आहे. मी आणि माझी पत्नी, आम्ही वैज्ञानिक आहोत. एका संशोधन संस्थेत पीएचडी करताना आमची ओळख झाली आणि पीएचडी झाल्यावर आम्ही लग्न केले. पण आम्हाला जॉब वेगवेगळ्या शहरात मिळाले त्यामुळे सध्या आम्ही LAT म्हणजे लिव्हिंग अपार्ट टुगेदर आहोत. फक्त दर आठवड्याच्या शेवटी भेटतो.”
“म्हणजे महिन्यातून तीन वेळा ना! ‘त्या’ दिवसात भेटून काही उपयोग नाही.” आकाश म्हणाला आणि सर्वजण मनमुराद हसले.”
“ओपन मॅरेज?” सुमितने गुगली टाकली.
“नाही.” मयूर म्हणाला. “अजून तशी वेळ आलेली नाही. सेक्स हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे पण लग्नानंतर इतरही गोष्टी, सहजीवन, एकमेकाना बळ देणे, एकमेकांच्या सहवासात वेग घालवणे देखील तितकेच महत्त्वाचे असते.”
“एकंदरीत सर्व अवघडच होत चालले आहे.” सुमित म्हणाला, “प्रत्येकाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत.”
“चला, निघूया. अजून शॉटस् मागवले तर काही खरे नाही.” मयूर म्हणाला.
“माझा खरे नावाचा मित्र आहे. त्याला बोलवू शकतो आपल्याला घरी पोहोचवायला!” सुमितने बारटेंडरला हातानेच खुणावले.

तळटीप: वरील कथा आणि त्यातील पात्रे काल्पनिक असली तरी यात नमूद केलेल्या आज गोष्टी खरोखरंच समाजात प्रचलित आहेत. आपल्या आजूबाजूला, नव्हे तर कदाचित आपल्या कुटुंबातही असू शकतात. याबद्दल विचार करण्याची वेळ आलेली आहे.

या शिवाय इतरही अनेक बाबी आहेत ज्यावर लिहिता येईल, पण एका कथेच्या स्वरूपात सर्व गोष्टी आणणे अवघड आहे.
इथे मी नमूद करू इच्छितो की ही कथा कुठलेही मतप्रदर्शन करण्याच्या हेतूने लिहिलेली नाही.

Comments

कथा आणि पात्रे कल्पनेतील असले तरी वास्तववादी समाजात अशा व्यक्ती आणि प्रसंग या समस्या नवीन पिढीच्या बाबतीत समोर येत आहेत. अनेक पालकांसमोर आणि मुलांसमोर तरुण पिढीसमोर हे प्रश्न कसे सोडवावेत हा यक्ष प्रश्न आहे

By : Krupa Nitin Ghag.
04/09/2025 10 : 04 : 36 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article