मराठी दिवसाच्या निमित्ताने


मराठी दिवसाच्या निमित्ताने

शशांक पुरंदरे

वास्तविक कुठलेही दिवस साजरा करण्याचा मी फारसा चाहता नाही. हल्ली उठसूट रोज कुठला तरी दिवस साजरा करण्याचे फॅड आलेले आहे. आमच्या लहानपणी तर आमचे वाढदिवस देखील साजरे केल्याचे मला आठवत नाही. शाळेत एक वर्ष सर्व मुलांना वाढदिवसानिमित्त पट्ट्या वाटल्याचे मला आठवते. नंतर आमच्या गुरुजींनीच त्यांचा उत्तम प्रकारे वापर केल्याच्या जखमा हातावर आणि इतर वर्णन न करता येणाऱ्या भागांवर अजूनही जाणवतात. हल्ली अशा हिंस्त्र प्रवृत्तींना आळा घालण्यात आला आहे असे ऐकतो आहे.

हे सांगण्याचे प्रयोजन असे की मराठीचा वाढदिवस कसा साजरा करावा हा प्रश्न म्यां बालबुध्दीला पडला आहे. एकतर आपली ही मातृभाषा किती वर्षांची झाली आहे हा मूलभूत प्रश्न आहे. सामान्यतः सरकार दरबाराचे जन्माचे प्रमाणपत्र यासाठी वापरले जाते. पण भाषेसाठी असे कागदपत्र उपलब्ध आहे असे माझ्या तरी ऐकिवात नाही. तेव्हा कवि कुसुमाग्रज यांचा वाढदिवस प्रमाण मानून हा प्रश्न सोडविण्यात आला आहे. मराठीला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने देऊ केला आहे. वास्तविक एखाद्या भाषेचा दर्जा ठरविण्याचा अधिकार सरकारला आहे का हाच मुळात प्रश्न आहे. भाषेचा दर्जा भाषेतील साहित्य आणि भाषेचा बोली आणि लेखी वापर यावर ठरतो असे मला वाटते. पण मला कोण विचारतो?

आपल्याकडे वाढदिवस म्हणजे पार्टी करणे, केक कापणे, डीजे बोलावून नाचून मोठ्या आवाजात गाणी/ॲार्केस्ट्रा वाजवून शेजाऱ्यापाजााऱ्यांना त्रास देऊन साजरे करण्याची सर्वसाधारण पध्दत आहे. पण मराठी साठी काय कापणार? पार्टी ठेवली तरी लिंबूपाणी प्यायला कोणी येणार नाही. फारतर डीजे लावून बाराची गाडी निघाल्यावर बाईंना जपून दांडा धरण्याची सूचना देणारी किंवा चंद्रा अवतरल्याची वगैरे गाणी वाजवून त्यावर ताल धरू शकतो. कुसुमाग्रजांचे पूर्ण नाव जरी बऱ्याच जणांना माहित नसले तरी त्यांच्या प्रतिमेला हार घालून समोर दीप प्रज्वलित करु शकतो.

मराठी भाषिक घरामधे मम्मी पप्पा आपल्या किडस् ना एक दिवस तरी घरात मराठी स्पीक करण्यासाठी इंसिस्ट करुच शकतात. त्यांना समजतील अशी बाळबोध भाषेतील, म्हणजे आयुष, सी लोटस अर्थात बबन, कमळ बघ यासारखी पुस्तके वाचून दाखवू शकतात.

हल्ली बहुतेक सर्व मराठी घरात इंग्रजी बोलीभाषा म्हणून वापरली जाते. सर्व मुले इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातात. बाबा, तू असा बावळटासारखा (इडियॅाटिक) का बिहेव करतो आहेस असे प्रेमळ संवाद घराघरातून ऐकू येतात. मराठी पुस्तके विकत घेऊन वाचणे बंद झाले आहे, कारण मराठी वाचताच येत नाही. प्र के अत्रे, वि स खांडेकर, वपु, पुल, इतिहासजमा होऊ घातले आहेत. दे आर सो ओल्ड फॅशन्ड!

वास्तविक डिजिटल समाज माध्यमांच्या वाढत्या वापरामुळे नवीन लेखकांना नवीन व्यासपीठे तयार झाली आहेत. अनेक नवीन मराठी कवी आणि लेखक लिहिते झाले आहेत. पण हे नवीन साहित्य जास्ती लोकांपर्यंत पोहोचवणे आणि लोकांना वाचनास उद्युक्त करणे हे मोठे आव्हान आहे.

एखादी भाषा बोलता येणे आणि शुध्द स्वरुपात बोलता येणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हल्ली तर भाषेत शुद्ध अशुद्ध असे काही नसते असेदेखील बोलले जाते. बोली भाषेतून उपभाषा निर्माण होतात. इतर भाषांचा प्रभाव आपल्या बोलण्यावर होतो हे देखील काही प्रमाणात खरे असले तरी त्यासाठी अशुद्ध बोलण्याचे समर्थन करणे चुकच आहे. लेखी भाषेचे नियम पाळणे हे तर गरजेचे आहे. ळ, ण सारख्या अक्षरांमधेच मराठीचे सौंदर्य आणि वेगळेपण आहे.

एकंदरीतच, ज्याला पाणी म्हणता येते तोच खरा मराठी! एखादी व्यक्ति ‘भेटते’ आणि वस्तु ‘मिळते’ हे समजले तर तो खरा मराठी!! बाकी सर्व तसे अमराठीच !!।

Comments

छान लेख.

By : Shirish joshi
27/02/2026 9 : 20 : 02 PM

अप्रतिम लेख आहे, वास्तविक मराठी भाषेची स्थिती तुम्ही अगदी समर्पक शब्दांत सांगीतली आहे. समीर पेशवे

By : समीर पेशवे
27/02/2026 9 : 56 : 30 PM

शशांक, फारच छान पद्धतीत व्यथा मांडली आहेस. तसे पाहिल्यास याला आपण सर्वच जबाबदार आहोत. यात मला एक आवर्जून सांगावेसे वाटते की तुलना केल्यास आजही शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात मराठीचा वापर बऱ्यापैकी आहे. भले ती "पानी" किंवा "आनी" असो. तळागाळापर्यंत पोहोचायचे तर राजकारण्यांपासून सरकारी अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच ती स्वीकारून समजून घ्यावीच लागते. संभाषणात "१ कोटी" पेक्षा "१०० लाखाचा" निधी आला हे वाक्य टाळ्या घेऊन जाते. त्यामुळेच काही ठिकाणी बोलीभाषा ही शुद्ध भाषेपेक्षा अधीक प्रभावी ठरते. 🙏😊

By : नंदकुमार आनंद थोरात
27/02/2026 10 : 13 : 43 PM

बोली भाषेत शुद्ध अशुद्ध नसते असे नाही पण घरात बोललेली भाषाच तोंडात बसते.पण लेखी भाषा शुद्ध असावी हा आग्रह धरलाच पाहिजे

By : Admin
28/02/2026 08 : 03 : 59 AM

शशांक, मान्य आहे. 🙏😊

By : नंदकुमार आनंद थोरात
28/02/2026 5 : 07 : 47 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article