महिला दिवस


महिला दिवस

शशांक पुरंदरे

८ मार्च हा महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. मुळात मी कुठलेच दिवस वगैरे फारसे साजरे करत नाही. लहानपणी देखील माझे स्वत:चे वाढदिवस साजरे केल्याचे आठवत नाही. एकदा शाळेत सर्व मुलांना फुटपट्ट्या वाटल्याचे मात्र आठवते. लग्न झाल्यावर मात्र लग्नाचे, बायकोचे आणि स्वत:चे वाढदिवस लहानमोठ्या प्रमाणात साजरे केले गेले. पण एकंदरीतच या गोष्टींचे फारसे अप्रूप मला कधी वाटले नाही. हल्ली मात्र सर्व “दिवस” साजरे करण्याच्या प्रथा पडल्या आहेत. महिला दिवस देखील त्यापैकी एक!

निसर्गाने मानव जातीची विभागणी (ढोबळ मानाने) पुरुष आणि स्त्री अशी केली आहे. सर्वसाधारण जेव्हढे पुरुष तितक्या स्त्रिया या जगाच्या पाठीवर आहेत. त्यामुळे जगाच्या निम्म्या लोकसंख्येसाठी एक दिवस साजरा करण्याचे प्रयोजन मला तरी समजत नाही. असाच एखादा दिवस पुरुष दिवस म्हणून मात्र साजरा केला गेल्याचे ऐकिवात नाही. आता काही दिवस वृत्तपत्र, टीव्ही, समाज माध्यमं वगैरे मध्ये महिलांवर अनेक लेख, व्हीडिओज वगैरे पहायला वा वाचायला मिळतील. माझा हा लेख मात्र थोडासा वेगळा आहे.

नैसर्गिक रचनेनुसार कुठल्याही सजीवाचे मुख्य कामे जगणे, स्वत:ची ऊर्जा निर्माण करून स्वत:ची वाढ करणे आणि प्रजोत्पादन करणे ही आहेत. त्यानुसार पुरुषाला भरभक्कम आणि स्त्रीला आकर्षक बनवले. प्रजोत्पादनाची मूळ जबाबदारी स्त्रीवर टाकण्यात आली. पण मानवातील उत्क्रांतीमुळे गोष्टी बदलू लागल्या. बदलत बदलत आपण आजवर इथे आलो आहोत. सध्याची परिस्थिती काय आहे याचा वेगळा उहापोह करण्याची गरज नाही.

मला समजलेली आजची स्त्री ही माझ्या स्वत:च्या अनुभवातून साकार झालेली आहे. माझी आई, बायको, बहिणी आणि आजूबाजूचे नातेवाईक, ऑफिस स्पेस मधल्या माझ्या सहकारी आणि मैत्रिणी यातून एक प्रतिमा तयार झाली आहे. कशी आहे ही प्रतिमा?

सध्याची स्त्री अतिशय सुंदर आहे. या सौदर्यात आंतरिक आणि बाह्य या दोन्ही गोष्टींचा समावेश होतो. स्त्रीचे बाह्य सौंदर्य ही निसर्गाची देणगी आणि गरज आहे. पुरुषाला स्त्रीचे शारीरिक आकर्षण वाटणे ही नैसर्गिक गरज आहे. नटणे, मुरडणे, पुरुषाला आकर्षित करणे हा स्त्रीचा जन्मसिद्ध अधिकार आहे.

परंतु आजची स्त्री यापुढेही जाऊन बरेच काही करते. आज सर्व क्षेत्रात स्त्रिया पुरुषाच्या बरोबरीने काम करतात. थोडेसे निसर्गाच्या विरुद्ध जाऊन आज स्त्रियांनी ही बरोबरी साधली आहे.

दुर्दैवाने निसर्ग सर्वांनाच सारखी बुद्धी देत नाही. हे जग हे पुरुषप्रधान होते आणि अजूनही आहे. बऱ्याच पुरुषांना स्त्री पुरष समानता मान्य नाही. अजूनही अनेक पुरुष स्त्रीला एक आकर्षक वस्तू समजतात. स्त्रीपुरुष समानता सामाजिक प्रक्रियेचा एक भाग आहे. गोष्टी बदलत आहेत पण बदलाचा वेग अजूनही वाढला पाहिजे.

पण काही स्त्रीयांच्या वागण्याबद्धल मला आक्षेप आहे. अशा स्त्रिया आपल्या सौन्दर्याचा आणि स्त्रीत्वाचा गैरवापर करतात. अशा स्त्रियांची संख्या कमी आहे पण असेही समाजात घडते हे अमान्य करता येणार नाही.

आजची स्त्री अतिशय प्रगत आहे. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत स्त्रियांनी समाजात दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. माझ्या आयुष्यात आलेल्या सर्व स्त्रीयांच्या यशाचा मला अभिमान आहे.

माझ्या दृष्टीने जेव्हा असे महिला दिवस साजरे करण्याची गरज भासणार नाही तेव्हा खरी स्त्री-पुरुष समानता येईल. तोपर्यंत तरी सर्वाना महिला दिवसाच्या शुभेच्छा!

पाच वर्षांपूर्वी लिहिलेले हा लेख आज माझ्या कट्ट्यावर टाकत आहे.

Comments

खूपच छान आर्टिकल आहे . मी आमच्या स्कूल मधे वाचून dakhavale

By : Smita david
11/03/2026 08 : 39 : 46 AM

यापेक्षा चांगले प्रशस्तीपत्र मिळूच शकत नाही

By : Admin
11/03/2026 1 : 43 : 00 PM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article