मोबाईल गुन्हेगारी


मोबाईल गुन्हेगारी

शशांक पुरंदरे

मोबाईल हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झालेला आहे. मोबईलचे अनेक फायदे आहेत. नाती दुरावलेली असली तर आभासी विश्वात आपण एकमेकांच्या कायम सहवासात आहोत. आज किती वाजता उठलो पासून शुभरात्री पर्यंत प्रत्येक सेकंदाचा हिशोब मोबाईल आणि सामाजिक माध्यमाद्वारे आपण सर्व “सग्यासोयरांना कळवत असतो. त्यात नाश्त्याला काय खाल्ले, काय कपडे घातलेत, काय खरेदी करणार आहोत, कुठे आहोत आणि कुठे जाणार आहोत, लंच, डिनरचा काय प्लॅन आहे, कुठे व कधी भेटूया-वाचून कंटाळलात ना?- हे सर्व आपण पूर्ण जगाला सांगत असतो. आणि हो, सर्वात महत्वाचे म्हणजे तो किंवा ती आज माझ्याकडे पहात होती (असं झालंतर खरंतर प्रथम आपली झिप उघडी नाही ना याची खात्री करुन घ्यावी) हे देखील मित्रमैत्रीणींना लगेच कळवले जाते, अरे हो, रील्स बद्दल लिहायचे राहिले.

तरुणांप्रमाणे इतर वयाची लोकंदेखील मोबाईल वापरतात, काही पारंगत होतात तर काही चाचपडात.

पण केवळ स्मार्ट फोन असण्याने तुम्हीआम्ही स्मार्ट होत नाही. वापरण्यातही स्मार्टनेस आणावा लागतो.

आभासी दुनियेतले शर्विलक मात्र दिवसेंदिवस स्मार्ट होत चालले आहेत. काही नमूने सांगतो.

सुरुवातीला इमेल वापरल्या गेल्या. मला शून्य मोजता न येणाऱ्या अश्या अब्जावधी पाऊंड्सच्या नायजेरियन लॅाटऱ्या अनेक वेळा लागल्या होत्या. केवळ मी बॅंक डिटेल्स दिले नाहीत म्हणून मला पैसे मिळाले नाहीत. क्रिप्टो करन्सीत पैसे द्या नाहीतर तुमचे अश्लील व्हिडीओ समाज माध्यमांवर टाकीन अश्या धमक्या येऊ लागल्या.

नंतर बाईच्या सुंदर आवाजात ओटीपी पाठवण्याबद्दल विनंत्या येऊ लागल्या.(जमतारा १ आणि २ अवश्य पहा) आश्चर्याची गोष्ट अशी की हायकोर्ट जज सारखे सुशिक्षित लोक देखील या स्कॅमला बळी पडले आहेत. कृपा करुन आलेला ओटीपी कुणालाही सांगू किंवा पाठवू नका.

तुमचे जर प्रवासात पाकिट किंवा मोबाईल मारला गेला तर ताबडतोब घरी कळवा. तुमचा अपघात झालाय, हॅास्पिटलमधे दाखल करायला पैसे पाठवा असा मेसेज जाऊ शकतो.

एकदा माझ्या पत्नीला फोन आला. मी तुमच्या पतीकडून पैसे उधार घेतले होते ते मला परत करायचे आहेत असे पलिकडली व्यक्ती सांगत होती. पण पत्नीच्या हुशारीमुळे आणि मी तिथेच असल्यामुळे काही विपरीत घडले नाही.

तुमची जुनी विमा पॅालिसी मॅच्युअर झाली आहे पण एक हप्ता भरायचा बाकी आहे असे फोन तर बहुतेक सर्वांनाच आले असतील. या न घेतलेल्या पॅलिसीचा लाभ किती जणांनी घेतला आहे ते नक्की कळवा.

तुमचे kyc update करायला खालील लिंकवर क्लिक करा असे मेमेजेस येतात. क्लिक केल्यावर तुमचे कल्याण झालेच असे समजा. त्यापेक्षा बॅंकेला फोन करुन चौकशी करा.

पंधरा दिवस सहलीला जातोय हे सामाजिक माध्यमांवर चूकूनही टाकू नका. घर धुतले जाईल.

हल्ली upi पे चा जमाना आहे. पण क्यूआर कोड हा फक्त पैसे देण्यासाठी वापरायचा असतो हे बरेच जणं विसरतात. तुमचे बॅंक अकाऊंट क्षणात रिकामे होते. माहित नसलेल्या लिंकवरती क्लिक करुन लोकांनी लाखो रुपये गमावले आहेत.

बऱ्याच वेळेला तुमचे FB अकाऊंट हॅक होते. त्यावरून तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रीणींना निरोप जातो की तुम्ही अडचणीत आहात आणि दहा पंधरा हजारांची आवश्यकता आहे. अशा वेळी त्या व्यक्तीला फोन करुन खात्री करुन घ्या.

अनेक वेळा तुम्ही स्पॅम कॅाल आलेले नंबर ब्लॅाक करता. परंतु हे लोकं नवीन सिम कार्ड वापरुन परत फोन करतात.

ही यादी वाढतच जाणार आहे. स्मार्ट फोन असेल तुमच्याकडे पण स्पॅमर्स तुमच्यापेक्षा स्मार्ट आहेत. तेव्हा काळजी घ्या. मेरा पैसा सिर्फ मेरा है, हे ब्रीदवाक्य असूद्या.

Comments
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article