मानपाडा ते कुलाबा: एक प्रवास
वेळ हातघाईची; सकाळी सवा:सातची; मी माझ्या सहाव्या मजल्यावरच्या घराच्या बाहेर एका पायात मोजा चढवला आहे. तेवढ्यात दुधवाला आणि पेपरवाला दोघेही एकदम येतात. हा पेपरवाला कधीही माझ्या वेळेत येत नाही. त्यामुळे सकाळचा पेपर माझा नेहमी रात्रीच वाचला जातो. आमच्या कामवाल्या बाईला माझ्या पायाखालचा केर काढायला नेमकी हीच वेळ सापडते. आतमधे टीव्हीवर न्यूजअॅन्कर जोरजोरात दरडावून विचारात असतो “यांचे मत आहे की भ्रष्टाचार झालेला नाही तर ते म्हणतात की प्रचंड भ्रष्टाचार माजला आहे, तर तुमचे काय मत आहे?” या सर्व रणधुमाळीत आतून आवाज येतो.
“डबा आणि मोबाईल घेतलास का? जाताना टीव्ही बंद कर. संध्याकाळी लवकर येणार आहेस का?”
“होय, होय आणि नाही”. रोज तेच प्रश्न आणि उत्तरे पण तीच असतात. मी बोलता बोलता दुसरा मोजा चढवतो. पायात बूट घालतो आणि मग लक्षात येते की पाकीट आतच राहिले आहे. हा मोरूचा पापा म्हणजे मोबाईल, रुमाल, चावी, पास आणि पाकीट घेतल्या शिवाय घराच्या बाहेर पडू शकत नाही. बाहेर येउन लिफ्टचे बटण दाबेपर्यंत ती तळमजल्यावर गेलेली असते. मग वरती येते तेव्हा आधी सातव्या मजल्यावर जाऊन मग खाली येते. बऱ्याच वेळेला तर लिफ्टचा दरवाजा नीट बंद न केल्यामुळे ती वरती येतच नाही, चालतच खाली उतरावे लागते.
आमच्या कॉम्प्लेक्स पासून टीएमटीचा बस थांबा पाच मिनिटांच्या अंतरावर आहे. धावतपळत तिथे पोहोचल्यावर असे समजते की अजून आधीची बस आलेली नाहीये. मोठी रांग लागलेली असते. तब्बल दहा मिनिटांनी तुडुंब भरलेली बस उगवते. मी कसाबसा बस मध्ये चढतो. बस मध्ये कंडक्टर आणि प्रवासी यांची बस उशिरा आल्या बद्धल रोजचीच शाब्दिक मारामारी चालू असते. थोड्या वेळाने तह होतो. कंडक्टर जवळ आल्यावर मी काही न बोलता त्याला दहाची नोट देतो. तो देखील ओळखीचा असल्याने काही न बोलता नऊ रुपयाचे तिकीट देतो व एक रुपया परत देतो. पुढच्या प्रवाश्यावर मात्र उगाचच खेकसून सुटे पैसे मागतो. तो माणूस बिचारा एका हाताने बॅग सांभाळत बसचा दांडा पकडून खिश्यातून सुटे पैसे शोधण्याचा प्रयत्न करतो. शेवटी त्याला सुटे पैसे मिळतात व कंडक्टर समाधान पावतो. मात्र काही वेळा कंडक्टरला सव्वाशेर भेटतो. आता हाच संवाद पहा.
“बोला तिकीट?”
“तिकीट”
“अहो तिकीट काय म्हणताय? कुठे जायचं ते सांगा?”
“पुण्याला”
“अहो, ही बस पुण्याला नाही ठाणे स्टेशनला जाते.”
“माहिती आहे.”
“मग तरी पुणे काय म्हणताय?”
“मी ठाण्यावरून पुण्याला जाणार आहे.”
“मग ठाणे स्टेशन सांगा ना.”
“ठाणे स्टेशन.”
“कुठे बसलात?”
“काय साहेब, गरिबाची थट्टा करता काय? या बस मध्ये पाय ठेवायला जागा नाही आणि तुम्ही कुठे बसला म्हणून काय विचारताय?”
“अहो, म्हणजे कुठे चढलात?”
“बसमध्ये.”
“अहो म्हणजे कुठल्या स्टॅापवर?”
“मग असं नीट विचारा की, मानपाड्याला चढलो.”
“सात रुपये द्या.” तो दहा रुपये देतो.
“दोन रुपये सुटे द्या.”
“आज घरची टांकसाळ बंद होती साहेब.” भीक नको पण कुत्रा आवर या हिशोबाने कंडक्टर गपचूप त्याला तिकीट व तीन रुपये परत देतो.
बस कापुरबावडीला येते आणि बऱ्याच शाळेतल्या मुली पुढील दरवाज्याने आत शिरतात. आता त्यांना तिकीट काढायला मागे यायला आणि कंडक्टरला पुढे यायला जागा नसते. मग कंडक्टरची विनोद बुद्धी जागृत होते. तो मागूनच ओरडतो, “ पुढून चढलेल्या सर्व सिनियर सिटिझन्सनी आपल्या तिकिटाचे पैसे मागे पाठवावेत.” तेवढ्यात एक माणूस दुसऱ्याच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्यांची लढाई जुंपते. मला खिडकीशी बसायला जागा मिळते. मग बाहेर सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या वाढदिवसाच्या शुभेछयांचे बोर्डस बघण्यात वेळ चांगला जातो. फक्त नेता कुठला आणि शुभेछयु कोण हे फोटोंच्या साईझ वरून पटकन लक्ष्यात येत नाही. परंतु सर्वात छोटा फोटो हा नेत्याचा असतो हे ध्यानात ठेवले की झाले.
टीएमटीचा आणि वेळेवर बस चालविण्याचा काही संबंध नाही. बऱ्याच वेळेला अर्धा-अर्धा तास बस येत नाही. आली तर पूर्ण भरलेली असते. एकदा मी बसमध्ये शिरलो तेव्हा फक्त जेष्ठ नागरिकांसाठी आरक्षित जागा रिकामी होती. मग नाईलाजाने मी तिथे जाऊन बसलो. थोड्यावेळाने कंडक्टर माझ्या जवळ येऊन मला म्हणाला,
“तुम्ही तर चांगले तरुण वाटताय, मग जेष्ठ नागरिकांच्या जागेवर का बसलाय?”
“त्याचे काय आहे साहेब,” मी म्हटले,” मी सकाळी घरून निघालो तेव्हा बऱ्यापैकी तरुण होतो, पण तुमची बसच इतकी उशिरा आली की तोपर्यंत मी जेष्ठ नागरिक बनलोय.” कंडक्टरने दोन्ही हात जोडून मला नमस्कार केला व काहीही न बोलता तिकीट दिले.
हल्ली महिलांना बरे दिवस आलेत. अर्धी बस ही त्यांच्या साठी आरक्षित असते. उजव्या बाजूच्या सर्व जागा महिलांसाठी असतात. बऱ्याच वेळेला महिला प्रवासी मात्र या जागा रिकाम्या ठेऊन इतर जागांवर बसतात आणि बिचारे पुरुष उभ्याने प्रवास करतात. शिवाय डाव्या बाजूच्या पहिल्या दोन जागा अपंगांसाठी राखीव असतात. मात्र त्या बसच्या चाकावर आल्यामुळे उंचावर असतात. सामान्य माणसालाही त्यावर चढून बसने कठीण जाते. त्यावर एखादा अपंग माणूस कसा चढू शकेल याचा विचार मात्र कोणी केलेला नसावा. पहिल्या जागेच्या बरोबर वरती एक आडवा दांडा असतो. बसेल त्याच्या डोक्याला हा लागलाच पहिजे अशी व्यवस्था मुद्दामच केलेली असावी.
बस गावदेवीला पोचली की सर्व प्रवासी उडी मारून स्टेशनकडे धावत सुटतात. गाडी स्टेशनमध्ये येण्याच्या आत तेथे पोचणे अतिशय महत्वाचे असते. गाडी थांबायच्या आधी उडी मारली तरच बसायला जागा मिळते हे सर्वमान्य रहस्य आहे. ठाण्याहून सुटणारी गाडी भांडुप मुलुंडलाच येताना बरीचशी भरते त्यामुळे बसायला चारपाचच जागा शिल्लक असतात. जागा मिळेपर्यंत एकमेकांना धक्के मारणारे लोक बसल्यानंतर मात्र सभ्य गृहस्थ होतात. फर्स्टक्लासच्या डब्यात तीन जणांच्या बाकावर तिघांनीच बसण्याचा अलिखित नियम आहे. बाकीचे लोक मग शांतपणे उभे राहतात. काही पेपर वाचायला घेतात तर काही मोबाईलवर गाणी ऐकू लागतात. माझ्यासारखे काही बॅगमधून पुस्तक काढून वाचायला लागतात. डब्यात बहुतेक सर्व ओळखीचेच असतात. काही बघून हसतात तर काही बघून न बघितल्या सारखे करतात.
माझ्या नशिबाने मला खिडकीची जागा मिळते. गाडी मुलुंड स्टेशनात शिरता शिरता माझ्या बाजूला बसलेला गृहस्थ मला दोन्ही हात जोडून नमस्कार करतो. हा काय प्रकार आहे हे काही क्षण माझ्या लक्षात येत नाही. अचानक मला काही सिद्धी प्राप्त झाली आहे की काय असे वाटायला लागते. तेवढ्यात स्टेशनच्या बाहेर असलेले देऊळ नजरेत येते आणि हा नमस्कार मला केलेला नसून त्या देवळातील देवासाठी आहे हा साक्षात्कार होतो.
मुलुंडला गाडी पॅक होते. त्यातही एखादे जोडपे डब्यात शिरले तर ती बाई तीन जणांची जागा आडवते आणि त्यातील पुरुष हा दोन्ही हातानी त्या बाईच्या भोवती कडे करून तिचे गर्दीपासून रक्षण करत असतो. मग बाजूचे लोकं अंग चोरून उभे राहातात. त्या दोघांना मात्र आजूबाजूचे ध्यान नसते.
कोपऱ्यातल्या सहा जागा मुलुंडलाच गुजराती टोळीने पकडलेल्या असतात. मग त्यांची फाफडा आणि जिलेबीची न्याहरी सुरु होते. भांडुप येईपर्यंत गाडी स्थिरस्थावर होते. कारण नंतर आत शिरायला जागच नसते. मग डब्यात खेळीमेळीचे वातावरण निर्माण होते. मग आतील लोकं दरवाजातील भांडणांचा चवीने आस्वाद घेतात. कधी कधी “ पकडो, मारो सालेको, चूप बैठो यार, छोड दो, जाने दो” अशा विविध सूचनाही करतात. फार क्वचित हातघाईवर प्रकरण जाते. मग आजूबाजूचे लोकं मारामारी सोडवितात.
विक्रोळी येईपर्यंत निम्मे जण झोपी गेलेले असतात. काही उभे प्रवासी देखील डोळे मिटून घेतात. काही गप्पा मारत असतात तर काही अखंड मोबाईलवर बोलत असतात. काही गेम्स खेळत असतात. हल्ली लॅपटॉप वापरणारे वाढू लागले आहेत. काही चक्क ऑफिसचे काम करत असतात. काही जण व्हिडीओविंडोतून सृष्टीसौन्दर्य बघण्यात मग्न असतात. काही स्वताःशीच गात असतात. एकदा एक माणूस माझ्या बाजूला बसून ठाणे ते सीएसटी अखंड वेळ अगम्य भाषेत गात होता. गाडीतील पत्ते खेळणारी मंडळी आणि भजनी मंडळ हा तर एक स्वतंत्र विषय आहे.
गाडीमध्ये बसण्याच्या लोकांच्या तऱ्हा पण विचित्र असतात. काही अंग चोरून बसतात, तर काही दोघांची जागा अडवतात. काही पेपर वाचताना दोन्ही हात पसरून बसतात तर काही अखंड चुळबूळ करत असतात. आपल्यामुळे बाजुच्याला काही त्रास होईल याची त्यांना जाणच नसते.
बहुतेक वेळेला नेहमीचेच लोक आजूबाजूला बसलेले असतात. एकाच ऑफिसमधले लोक ऑफिसच्याच गप्पा मारत असतात. मुलुंडहून बसून आलेले मारवाडी एक टक्का दोन टक्क्याच्या गप्पा मारायला लागतात. काही मुलं अभ्यास करत असतात, तर काही देवभक्त वहीवर रामराम असे असंख्य वेळा लिहीत बसलेले असतात. गाडीमध्ये भेटणाऱ्या असंख्य माणसांचे असंख्य नमुने मात्र बघणीय असतात. प्रवासाचा वेळ कसा जातो ते समजत देखील नाही.
परंतु काही कारणाने जर गाडी रखडली तर मात्र जे हाल होतात ते अवर्णनीय आहेत. गाडी दोन स्टेशनांच्या मध्ये बराच वेळ थांबलेली असते. गाडीत पाय ठेवायला जागा नसते. अश्या वेळी धड सरळ देखील उभे रहाता येत नाही. नेमका आपल्या डोक्यावरचा पंखा बंद असतो. कंगवा घालून फिरवण्याचा प्रयत्न देखील अयशस्वी होतो. पंख्यातल्या काळ्या कचऱ्याने घातलेला शर्ट मात्र खराब होतो. घामाच्या धारा लागलेल्या असतात. प्रचंड तहान लागलेली असते पण बॅगेतून पाण्याची बाटली काढणे अशक्य असते. बाजूचा माणूस स्वतःला कम्फर्टेबल करण्याच्या प्रयत्नात इतरांना अन्-कम्फर्टेबल करत असतो. कोणाची बॅग टोचत असते तर कोणी कोपराने ढुश्या देत असतो. दुसऱ्या बाजूला पुस्तक वाचणारा माणूस इतरांची पर्वा न करता आपले ज्ञानार्जन करत असतो.
शेवटी गाडी एकदाची हलते. दादर परळ पर्यंत बऱ्यापैकी रिकामी होते. मग समोर एक नवविवाहित बंगाली जोडपं येऊन बसते. मुंबई कॉस्मोपोलीटीन झाल्या पासून यांची मुंबईतील संख्या वाढू लागली आहे. त्यातील मुलगी “भीषण” सुंदर असते आणि तिचे डोळे “रोसोगुल्ल्याएवढे” मोठे असतात. दोघे इतक्या बारीक आवाजात गुलुगुलू बोलत असतात की साऱ्या डब्यात त्यांचे बोलणे ऐकू जाते. तो मग तिला बॅगमधून पाण्याची बाटली काढून पाणी “खाणार” का असे विचारतो. ती लाजून हो म्हणते. मग यांचे पेयखान होते. मग पर्समधून तळहाताच्या आकाराचा रुमाल काढून ती त्याचा घाम पुसते. तो मग तिच्या कानात काहीतरी सांगतो. त्यावर तिचे “रोसोगुल्ल्याएवढे” मोठे डोळे अजून मोठे करून ती अजूनच लाजण्याचा अभिनय करते.
या सगळ्या करमणुकीच्या कार्यक्रमामध्ये गाडी सॅंडहर्स्ट रोडला पोहोचते. मी आखडलेले पाय मोकळे करायला उठतो आणि दरवाज्यात येऊन उभा राहतो. दादर पर्यंत रखडत आलेली असली तरी शेवटी गाडी ही स्त्रीलिंगी असल्यामुळे मेकअप करते आणि मस्जीदला वेळेत पोहोचते. आता लवकरच आपल्याला छत्रपती शिवाजी टर्मिनसचे दर्शन होणार या विचाराने सर्व जण दरवाज्यात गर्दी करतात. मात्र गाडी मस्जीद स्टेशन बाहेर येऊन शांतपणे उभी रहाते. थोड्या वेळाने डाऊन लोकल गेल्यावर ती हलते आणि स्टेशनात शिरते. लोकं धडाधड उड्या मारून पळत सुटतात. दरवाजातले मेटल डिटेक्टर सारखे वाजत असतात. पण ते कशासाठी लावले आहेत ते मला अजूनही कळलेले नाही. कारण बघायला तिथे कधीच कोणीही नसते.
मी आपला शांतपणे सबवेत शिरतो. आजूबाजूला खाण्यापिण्याची दुकाने उघडलेली असतात. मुंबईत एक मात्र आहे, चोवीस तास कधीही कुठेही खायलाप्यायला मिळते. काही लॉटरीची तिकिटे विकत असतात. मोबाईल कव्हर पासून हेडफोन्स पर्यंत आणि सुटापासून बुटापर्यंत सर्व काही सबवेत मिळते. मी बाहेर येतो आणि आमच्या रोजच्या बसस्टॅापवर येऊन उभा रहातो.
बाजूला एक ज्योतिषी पोपटाच्या मदतीने एखाद्याचे भविष्य सांगत असतो. तर दुसरा एक काळा कोट मळलेला पांढरा शर्ट, फाटके बूट आणि पांढरा बो लावून कोर्टातल्या गिऱ्हाईकाची वाट पाहत असतो. बस येईपर्यंत झाडावर बसलेले कावळे रांगेतल्या एकदोघांवर अभिषेक करून दिवसाची चांगली सुरवात करून देतात.
पाच मिनिटांनी बस येते. मी बसमध्ये चढतो आणि संध्याकाळी ६.४५ ही ठाणे लोकल मिळेलका आणि बसायला चौथीका होईना पण सीट मिळेल का या विवंचनेत कुलाब्याच्या दिशेने प्रवासाला लागतो.



Comments
कंटाळवाण्या रेल्वे प्रवासाचे खुसखुशीत, विनोदी वर्णन
By : Pratibha Tarabadkar
वाह, अगदी तंतोतंत --भाग्यश्री
By : भाग्यश्री
Verynicely written
By : Prasad khare
Very good and lot details
By : Subhash
Very well written, very interesting description of the daily routine life
By : Cyril David