मानसोपचार
परवा फूटपाथवरून चालता चालता एकजण मला धडकला. साहेबाच्या डोळ्यावर मोठा काळा गॅागल, हातात मोबाईल, आणि कानाला हेडफोन्स होते. त्यामुळे मी त्याला दिसलो नाही बहुतेक. अर्थात मी पण माझा मोबाईल बघत चालत होतो हेही तेव्हढेच खरे.
“सॉरी हं”, मोबाईलवरून नजर न हटवता आम्ही दोघेही एकदमच म्हणालो. मग मी वर पाहिले तर समोर सुहास! पण मी त्याला काही बोलायच्या आत स्वारी पुढे निघून गेली. कानाला हेडफोन्स असल्यामुळे मी मारलेली हाक त्याला ऐकू जाणे तर अशक्यच होतं. मग मी त्याला फोन लावला. आमच्या एका कॉमन मित्राने मला सुहासचा नंबर दिला होता. पण काही कारणांनी मला फोन करायला जमले नव्हते.
>
“हॅलो, कोण बोलतय?” सुहास.
“अरे, मी सचिन.”
“हं बोल बोल. काय म्हणतोस? कुठे आहेस तू?”
“तुझ्या मागे.”
“मागे?”
“हो, मागे वळून पहा. आत्ता माझ्यावरच आपटलास तू!”
“काय सांगतोस? अरे माझे लक्षच नव्हते. काय म्हणतोस?”
मागे वळून पहायच्या ऐवजी सुहास फोनवरच बोलत होता. बाकी हल्ली समोर आल्यावर लोकांना बोलायला वेळ नसतो, पण फोनवर कितीही वेळ बोलतील.
“फोनवरच बोलणार आहेस का?”
“अरे सॉरी, माझ्या लक्षातच नाही आलं.” असे म्हणून सुहास मागे वळला. समोर येऊन डोळ्यावरचा गॅागल आणि कानातले हेडफोन्स काढून मला म्हणाला, “ बोल, काय म्हणतोस? कसा आहेस?”
“मी मजेत.” ठराविक प्रश्नांना ठराविकच उत्तरे असतात. “किती वर्षांनी भेटतो आहेस? काय करतोस सध्या?”
उत्तरादाखल त्याने मला त्याचे बिझिनेस कार्ड काढून दिले. “ मी समुपदेशन म्हणजे कौन्सेलिंग करतो.”
सुहास पळशीकर, सायकोथेरपीस्ट या नावापुढे अे टू झेड मधील बऱ्याच आद्याक्षरांची मालिका होती.
“ओह, सायको द रेपिस्ट!”. मी म्हटले. नाव सुहास असूनही माझा विनोद त्याच्या डोक्यावरून गेला.
“अरे, सायकोथेरपीस्ट असे आहे ते! तुझे इंग्रजी शाळेपासून जरा कच्चेच होते, नाही?”, हे वर मला ऐकावे लागले ते वेगळेच!
ही वैचारिक देवाणघेवाण चालू असताना सुहासच्या चेहऱ्यावर पुसटशी स्मितरेखा पण उमटायला तयार नव्हती.
“कुठल्या एव्हढया गहन विचारात आहेस? आजूबाजूला अजिबात लक्ष नाहीये तुझं.”
“अरे एक विचार असेल तर सांगेन ना! डोक्यात विचारांचा नुसता गुंता झालाय बघ. कुठली गाडी घ्यावी, नवीन घर घ्यावे की नाही, कुठली कुठली बिले भरायची राहिली आहेत, इत्यादी, इत्यादी. जगणं म्हणजे एक टेन्शनचं काम झालंय.” सुहास अगदी मनापासून बोलत होता.
“अरे हे काही नवीन नाही. हे प्रश्न तर सर्वांनाच पडलेले असतात. पण ते जाउदे. तुझी प्रॅक्टिस कशी चालली आहे?”
“छान चालली आहे. पण डोकेदुखीचे काम आहे. दिवसाच्या शेवटी डोक्याचा पार भुगा होऊन जातो बघ. घरी गेल्यावर बायको मुलांशी बोलायला देखील एनर्जी शिल्लक रहात नाही.”
मला ये जो है जिंदगी मधला सतीश शहा आठवला. एका एपिसोडमध्ये समुपदेशकाचा रोल करताना त्याचे ‘बहुत टेन्शन है’ एव्हढं एक वाक्य माझ्या कायमचं लक्षात राहिलंय. सुहासपण तसाच वागत होता.
इतर काही सुखदुख्खांच्या गोष्टी बोलून आम्ही एकमेकांना बाय केले. घरी परतताना मी हाच विचार करत होतो की आपण जगण्याकरता जरी काहीही करत असलो तरी डोक्यात विचारचक्रं मात्र तशीच फिरत असतात. काहीवेळा विचारांच्या नादात आपण काही अशा गोष्टी करतो की ज्याचे नाव ते! आता परवाचीच गम्मत पहा.
मी मॅालच्या दारात शनायाची वाट पहात होतो. अर्धा तास झाला पण शनायाचा पत्ता नव्हता. ती मोबाईल देखील उचलत नव्हती. शेवटी एकदाचा फोन लागला.
“अर्धा तास झाला मी तुझी वाट पहात इथे उभा आहे. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक मुलीकडे ती तूच असशील म्हणून बघतोय. आता इतकं झालंय की कोणीतरी येऊन मला चपलेने बडवायचे फक्त बाकी आहे. आणि तरीही तुझा पत्ता नाही. आहेस कुठे तू?” मी म्हणालो.
“छान! इथे मी तुझी गेले अर्धा तास वाट पहाते आहे आणि तू वर मलाच विचारतोयस की तू कुठे आहेस?”
“ऑ! तू इथे आहेस? मग मला का नाही दिसत?”
“इतर मुलींवरून तुझी नजर हटेल तेव्हा मी दिसेन ना! लग्न होऊन इतकी वर्षे झाली तरी तुझ्या जुन्या सवयी काही सुटत नाहीत अजून! नीट डोळे उघडून पहा! मी हॉलच्या दारातच उभी आहे.”
“हॉलच्या दारात? एक मिनिट, आपलं मॉलच्या दारात भेटायचे ठरले होते ना?”
“मॉलच्या दारात? सचिन, तुझे कान तपासून घे एकदा! आपण मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरील हॉलच्या दारात भेटायचे ठरले होते! काय रे हे सचिन! तुझं हे नेहमीचेच झाले आहे हल्ली. इतका अब्सेंट माईनडेडपणा बरा नाही.” शनाया वैतागून म्हणाली.
मी एक शब्दही न बोलता फोन बंद केला आणि दोन्ही हातातील बॅगज् सांभाळत एस्कलेटर गाठला. नशिबाने सकाळचे नऊच वाजले होते. त्यामुळे मॉलमध्ये फारशी गर्दी नव्हती. तिसऱ्या मजल्यावर हॉलच्या दारातच शनाया उभी होती. तिने माझ्या हातातून दोन्ही बॅगज् खेचून घेतल्या.
“सचिन, धिस इज द लिमिट! अस्मिता आज माझा खूनच करणार बहुतेक!”
“एव्हढे काही झालेले नाही. अकरा वाजताचा मुहूर्त आहे. आत्ता कुठे नऊ वाजताहेत.” मी शनायाच्या बरोबर आत शिरता शिरता आपली बाजू मांडण्याचा एक केविलवाणा प्रयत्न केला.
“शहाण्या, अरे तिचे लग्न आहे! मुलींना तयार व्हायला किती वेळ लागतो ते तुला नक्कीच माहिती आहे. कपडे वेळेवर मिळावेत म्हणून तिने माझ्यावर जबाबदारी टाकली होती.”
“आणि तू सोयीस्करपणे ती मला दिलीस!” आता मी पण वैतागलो होता. एकतर सकाळी सात वाजता निघून कपडे कलेक्ट करून बरोबर साडेआठ वाजता मी मॉलच्या दाराशी हजर होतो. ब्रेकफास्टपण केला नव्हता. अर्धा तास उभे राहून माझे पाय दुखायला लागले होते. आता हॉल ऐवजी मॉल अशी ऐकण्यात छोटीशी चूक झाली होती, पण म्हणून काय झाले?
शनायाला पाहून अस्मिता काही बोलली नाही, पण डोळे मात्र मोठे केले. शनायाने पण काहीही न बोलता माझ्याकडे पाहून फक्त मान डोलावली, आणि दोन्ही बॅगज् अस्मिताच्या स्वाधीन केल्या.
मी पण काहीही न बोलता ब्रेकफास्ट बुफेकडे आपला मोर्चा वळवला. आपली प्लेट भरून घेतली आणि एक रिकामे टेबल पकडले. इडलीचा पहिला घास पोटात गेल्यावर माझ्या जीवात जीव आला.
खरंतर अलीकडे अश्या गोष्टी वारंवार होऊ लागल्या होत्या. पण सध्या उदरभरण हेच माझे एकमेव ध्येय होते. त्यामुळे बाकीचे विचार बाजूला ठेवून मी वडासांबाराकडे आपला मोर्चा वळवला. परंतु शांतपणे खाणे आज माझ्या नशिबात नव्हते. दोनच मिनिटात शनाया आपली प्लेट घेऊन मला जॉईन झाली. एकीकडे खाताखाता तिचा तोंडाचा पट्टा पण सुरु होता.
“सचिन, तू म्हणजे आज विसरभोळेपणाचा कळस केलास. तुला हॉल आणि मॉल मधला फरक कळत नाही का? आणि हे आजचे नाही. परवा काय केलेस ते लक्षात आहे ना? संध्याकाळची फ्लाईटची तिकिटे बुक करायच्या ऐवजी सकाळची काढलीस आणि फक्त बारा तास उशिरा पोहोचलो आपण एअरपोर्टला! मग डबल पैसे भरून यावे लागले आपल्याला! काय चाललंय काय तुझे?”
तोंडात वडा असल्यामुळे मी काही बोलू शकत नव्हता. तसेपण बोलायला काही नव्हते ही गोष्ट वेगळी! शेवटी वैतागून शनाया टेबलावरून उठली आणि “दुपारी जेवायची आठवण ठेव म्हणजे झालं!”, असा एक मौलिक सल्ला देऊन निघून गेली.
हे सर्व होण्याचे कारण म्हणजे विसरभोळेपणा नव्हे तर डोक्यात चाललेले विचार! त्यामुळे इतर गोष्टींकडे आपले लक्ष नसते आणि अशा गोष्टी घडतात.
मग मी यावर एक उपाय शोधला. मी खिशात एक छोटी डायरी ठेऊन त्यात करण्याच्या गोष्टी लिहून ठेऊ लागलो. पण याने प्रॅाब्लेम्स कमी झाले नाहीत. आता बघा, एखादे बिल भरण्याची शेवटची तारीख १५ असेल, पण डायरीत चुकून २५ लिहिली गेली तर काय होईल. कधीकधी डायरीत गोष्टी लिहायला विसरलो तर काय होणार? कधी डायरी कुठे ठेवली आहे तेच आठवले नाही तर? आणि शिवाय डायरीत नको त्या गोष्टी लिहिल्या आणि डायरी बायकोच्या हाताला लागली तर मग मरणच!
मला आता समजेनासे झाले की हा मेमरी लॅासमुळे होणारा प्रॉब्लेम आहे की डोक्यात चालणाऱ्या विचारचक्रांचा परिणाम आहे. सध्या व्हॅाटस् अॅप विद्यापीठात किंवा गुगलवर सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतात. व्हॅाटस् अॅपवर मला काही उपाय मिळाले. त्यात मेमरी वाढविण्यासाठी वाचलेले लिहून काढा अशापासून एकाच गोष्टीकडे दहा मिनिटे टक लावून पहात रहा असे काही उपाय सापडले. तर अनेक काढ्या-जडीबुटीपासून ते गोमुत्र सेवनापर्यंत अनेक औषधेपण मिळाली. मी सुरवातीला एकाच गोष्टीकडे टक लावून बघण्याचा उपाय वापरायचे ठरवले.
आमच्या दिवाणखान्यात समोरच काही फोटोफ्रेम्स लावलेल्या होत्या. मी शनायाच्या फोटोकडे एकटक पापणी न हलवता बसलो. मी पापणी न लववता बसून पाचेक मिनिटे झाली असतील आणि शनाया आत आली.
“काय रे, मैत्रिणींच्या फोटोकडे एकटक बघतोयस? त्यांची नावे आठवण्याचा प्रयत्न करतोयस की काय?”
शनायाच्या फ्रेमच्या बाजूला आमच्या जुन्या मित्र-मैत्रिणींची फ्रेम लावली आहे हे मी विसरलो होतो. पण आता शनायाला समजावून सांगण्यात काहीच उपयोग नव्हता. मी आपले काही न बोलता एकटक बघणे चालू ठेवले.
हे प्रयोग मी दहाबारा दिवस रोज केले. आणि काय आश्चर्य? मला शनायाचा आणि लग्नाचा वाढदिवस बरोबर वेळेवर आठवला. अर्थात मोबाईलची मदत पण झाली, नाही असे नाही. काही गोष्टी फेसबुक आपल्याला विसरूच देत नाही. त्यामुळे सध्यातरी सुहासकडे जाण्याची गरज वाटत नाही असे वाटले.
पण काही दिवस गेले आणि परत मी गोष्टी विसरू लागलो. हे जर शनायाच्या लक्षात आले तर लवकरच आपले लग्न झाले आहे ही गोष्ट विसरावी लागेल अशी भीती मला वाटू लागली. शेवटी एकदा सुहासकडे जाऊन तर येऊ आणि बघू काही उपयोग होतोय का असा विचार करून एक दिवस मी त्याला फोन केला.
“हॅलो, मी सचिन बोलतोय?”
“कोण सचिन? सध्या माझ्याकडे उपचार घेताय का?”
“अरे मी सचिन, तुझा कॉलेज फ्रेंड. परवा आपण भेटलो नव्हतो का?”
“कुठे?”
“अरे रस्त्यावर नाही का आपण एकमेकांवर आपटलो होतो?”
“कधी?”
“अरे, चारपाच दिवस झाले असतील.”
“चार की पाच?”
“मला नक्की आठवत नाही. म्हणून तर तुला भेटायचे आहे.”
खरं तर याला देखील काही आठवत नव्हते. जर हा स्वत:ची मेमरी ठीक करू शकत नसेल तर इतरांची काय करणार असा एक विचार मनात डोकावला. पण काय करणार? म्हणतात ना, अडला हरि....
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सात वाजता मी सुहासच्या क्लिनिकवर गेलो. बाहेर एक सुंदर स्वागतिका बसली होती. तिने आपल्या पांढऱ्याशुभ्र कुंदकळ्या दाखवत माझे स्वागत केले. माझे नाव, पत्ता विचारून एका फॉर्ममध्ये माहिती स्वत:च लिहिली आणि तो फॉर्म एका फाईलमध्ये घालून फाईल मला दिली. त्या फॉर्ममध्ये पेशंटच्या नावापासून त्याच्या पेटच्या नावाबद्धल सर्व माहिती विचारलेली होती. मी आता हा फॉर्म कसा भरावा या विचारात असताना त्या स्वागतिकेने मला फॉर्म भरण्याची गरज नाही असे सांगितले. मी (मनातल्या मनात) हुश्य केले. मला कुठलाही फॉर्म भरण्याचा अतिशय तिटकारा आहे.
जवळजवळ पंधरा मिनिटे त्या स्वागत कक्षाची टेहळणी करून झाल्यावर समोरच्या रूमचे दार उघडले आणि एक साधारण तिशीतील सुंदरी बाहेर आली. तिने आधी मला आणि मग त्या स्वागतिकेला एक छानसे स्माईल दिले. स्वागतिकेने फोन उचलून कोणालाही ऐकू जाणार नाही अशा आवाजात दोन मिनिटे संभाषण केले आणि त्या सुंदर पेशंटकडे एक हजार रुपयांची मागणी केली. आपल्या पर्स मधून पाचशेच्या दोन नोटा त्या स्वागतिकेला देऊन आधी तिला आणि मग मला अजून एक स्माईल देऊन ती बाला चालती झाली. मी त्या स्माईलमधून रिकव्हर होण्याआधीच स्वागतिकेने अजून एकदा आपल्या कुंदकळ्या दाखवत मला आत जाण्याची खूण केली.
परवा टी शर्टमध्ये बघितलेला सुहास आज मात्र एकदम सुटाबुटात बसला होता. गळ्यात स्टेथोस्कोप लटकवलेला होता. मानसोपचारतज्ज्ञाला स्टेथोस्कोपची काय गरज असा एक विचार माझ्या मनाला चाटून गेला. नाजूक गुलाबी रंगात त्याची ती कन्सल्टन्सी सजवलेली होती. टेबलावर फुलदाणीत छानसा पुष्पगुच्छ होता. त्यातील फुले ताजीतवानी दिसत होती. न दिसणाऱ्या स्पीकर्स मधून मधूर संगीत पाझरत होते. समोरच एक आरामदायी सोफा ठेवलेला होता.
“अरे सचिन, ये, बस ना.” सुहास म्हणाला.
मी त्या सोफ्यावर बसल्यावर त्याची गादी जवळजवळ सहा इंच आत गेली.
“अरे पेशंटला कम्फर्टेबल वाटावे म्हणून मुद्दाम तसा सोफा बनवला आहे.” सुहास म्हणाला. पण उठताना अनकम्फर्टेबल वाटेल त्याचे काय असा प्रश्न मी (मलाच मनातल्या मनात) विचारला. प्रत्यक्षात मात्र बाहेर मिळालेल्या चार स्माईलस् पैकी एक मी सुहासला परत केले.
“बोल, काय प्रॉब्लेम आहे?” माझी फाईल उघडून सुहासने सुरुवात केली.
वास्तविक माझा विसरभोळेपणा हा काही सायकोलॅाजिकल प्रॉब्लेम नव्हता. मुळात हा प्रॅाब्लेमच नव्हता हे मलाही मान्य आहे. वयोमानाप्रमाणे असं सर्वांचेच होते हे तुम्हीही मान्य कराल. पण त्यानिमित्ताने सुहासशी जरा परत ओळख होईल म्हणून मी त्याच्याकडे आलो होतो. पण या बाबतीत सुहास माझा बाप निघाला.
मी माझा विसरभोळेपणाचा प्रॉब्लेम सुहासला एकदोन प्रसंगांसह वर्णन करून सांगितल्यावर त्याने माझी फाईल बंद केली.
“काय राव, फिरकी घेण्याची तुझी कॅालेजची सवय अजूनही तशीच आहे वाटतं! अरे, फोन करून घरी यायचं. तीनचार ड्रिंक्स तरी घेतले असते.” सुहास म्हणाला. एखाद्याने आपला सूट टाय काढून शर्टाच्या बाह्या वर करून मैदानात यावे तसाच मला सुहास वाटला एकदम!
“तसे झाले असते तर तुझी सुंदर स्वागतिका आणि त्याहुनही सुंदर पेशंट कशी भेटली असती मग?” मीही काही बोलायला कमी नाही.
“ठीक आहे. चल, शनिवारी संध्याकाळी मी मोकळा आहे. तेव्हा बसुया. आता निघ. उगाच माझा वेळ फुकट घालवू नकोस. आणि जाताना स्वागतिकेला एक हजार रुपये देऊन जा.”
बाहेर आल्यावर मी अजून एक स्माईल स्वागतिकेला परत केले. ती पण आत फोन लावून दोन मिनिटे बोलली आणि परत एक स्माईल देऊन मला, तुम्ही जाऊ शकता, असे खुणावले.
अशा रीतीने मी तीन एक्स्ट्रॅा स्माईलस् बरोबर घेऊन बाहेर पडलो. मी आणि सुहास कॉलेजमध्ये चांगले मित्र होतो. पण कालांतराने आमच्या भेटी कमी झाल्या आणि मग बंद झाल्या. पण परवाच्या टक्करीनंतर पुन्हा एकदा जुने दिवस परत आले. शेवटी सर्व गोष्टींवर दोस्ती हा सर्वात उत्तम मानसोपचार आहे हे मात्र खरं!



Comments
कोणत्या विषयावर होती बरं तुझी गोष्ट?? जाऊ दे, आठवत नाही. पण छान आहे! आता मला विसरला असशील तर मात्र अति होतंय!!
By : Bhalchandra Shrikhande
तुला कसे विसरीन? गेल्याच जन्मी तर भेटलो होतो!
By : Admin
गंमतीशीर गोष्ट...विसरभोळेपणाची
By : Pratibha Tarabadkar
दोस्ती...उत्तम मानसोपचार...मस्तच शेवट.
By : हेमांगी