लिफ्ट
“ठीक है. पाच मिनिट.”, असे म्हणून मी माझा आयफोन बंद केला, लॅपटॅापची बॅग गळ्यात लटकवली, ऑफिसमधील सर्व दिवे बंद केले आणि दरवाज्यातून लॅाबीमध्ये आलो. नेहमीप्रमाणे फक्त एकच लिफ्ट चालू होती. कारण नरीमन पॅाईंटच्या त्या वीस मजली बिल्डींगमध्ये शनिवारी रात्री नऊनंतर ऑफिसमध्ये काम करणारा माझ्यासारखा एखादाच असतो. लिफ्टची बेल वाजून दरवाजा उघडला आणि मी आत शिरलो. दरवाजा बंद होत असतानाच बाहेरून कोणीतरी बटण दाबले. दरवाजा परत उघडला आणि रागिणी आत शिरली.
“हाय अजय!”, मला बघून रागिणी उद्गारली.
“हॅलो, इतका वेळ ऑफिस मध्ये काय करते आहेस?” मी विचारले.
रागिणी समोरच्याच इंव्हेस्टमेंट फर्म मध्ये रिस्क अॅनॅलिस्ट म्हणून काम करत होती. मी देखील शेअर ब्रोकिंग फर्म मध्ये काम करत असल्यामुळे आमची हायबाय एव्हढी ओळख होती. रागिणी कुणाचेही लक्ष सहज वेधून घेईल अशीच होती. आज टिपीकल पँटसूट मध्ये पण खूप छान दिसत होती. गोरापान वर्ण, साडेपाच फुट उंची आणि चेहऱ्यावर एक हलकीशी गुलाबी लिपस्टिक सोडली तर कुठलाही मेकअप नव्हता. गुलाबी रबर बॅंडने मागे बांधलेला पोनीटेल पाठीवर हेलकावे खात होता. एका हातात अर्थातच लॅपटॅापची बॅग आणि खांद्यावर लटकणारी हाय डिझाईनची पर्स सांभाळत रागिणीने लिफ्टचे बटण दाबून दरवाजा बंद केला. हे सर्व करताना तिने डिस्प्ले केलेला स्त्रीसुलभ एलीगन्स कुणालाही मोहात पाडेल असाच होता.
लिफ्ट दोन मजले खाली आली आणि अचानक बंद पडली.
“ओह माय गॅाड! आत्ताच काय झालं या लिफ्टला?” रागिणी वैतागून म्हणाली.
“बहुतेक पॉवर गेली असावी. एनी वे, बॅकअप आहे, त्यामुळे लगेचच चालू होईल.” मी म्हणालो.
“हो ना, नाहीतर काही खरं नाही.” एक सुस्कारा टाकून रागिणी म्हणाली.
सर्वच दिवे गेल्यामुळे लिफ्ट मध्ये पूर्ण काळोख झाला होता. काहीही दिसत नव्हते. मी खिशात हात घालून आयफोन काढला आणि टॅार्च ऑन केला. दोनतीन मिनिटे गेली तरी लिफ्ट सुरू होण्याचे चिन्ह दिसत नव्हते. आम्ही दोघेही आपापल्या विचारात मग्न होतो.
“मी सिक्यूरिटीला फोन करून बघते.” रागिणी म्हणाली. पण लिफ्टमधील इमर्जन्सी फोन बंदच होता. मी आयफोनने कॉल करायचा प्रयत्न केला पण लिफ्टमध्ये सिग्नलच नव्हता.
“थांब जरा, येईलच पॉवर एव्हढ्यात. सहसा खूप वेळ नाही लागत.” मी म्हटले.
“हो रे, पण आधीच उशिर झालाय, त्यात आता हे नाटक! एकतर दिवसभर काम करून डोळे आणि बोटं दोन्ही दुखायला लागतात, दुसरे काही नाही. इथून पुढे अंधेरीला पोचायला कमीतकमी दीडतास तरी कुठेच जात नाही.” रागिणी जरा इर्रीटेट झाली होती. पण वाट पहाण्याशिवाय आमच्या हातात फारसे काही नव्हते.
लिफ्ट बंद होऊन अर्धा तास उलटला होता. बॅटरी ड्रेन होऊ नये म्हणून मी टॅार्च पण बंद केला होता. आता अंधार जणू अंगावर येऊ लागला होता. कंटाळून रागिणी खाली बसली होती. मी पण तिच्या बाजूला बसलो. दिसत काहीच नव्हते पण एकमेकांचं अस्तित्व मात्र जाणवत होते.
“मला भूक लागली आहे. माझ्या पर्समध्ये बिस्किटे आहेत. जरा टॅार्च लावशील का?” रागिणी म्हणाली.
मी टॅार्च लावला. त्याच्या प्रकाशात आमचे चेहरे आता भुतासारखे दिसत होते. रागिणीने बिस्किटाचा पुडा काढला. आम्ही काही न बोलता बिस्किटे खाऊ लागलो. माझ्या पाण्याच्या बाटलीने आमची क्षुधाशांती झाली. परत अंधाराचे साम्राज्य पसरले. निदान एकेमेकांचे भुतासारखे चेहरे तरी आता दिसत नव्हते.
दहा पंधरा मिनिटे शांततेत गेल्यावर रागिणी म्हणाली, “पॉवर काही येता दिसत नाही. काय करायचे आपण?” तिचा आवाज जरा मलूल झाला होता.
“काय करणार? आपण काहीच करू शकत नाही.” मी म्हटले, “पण घाबरू नकोस, कोणीतरी काढेल बाहेर आपल्याला.”
“ते ठीक आहे रे. पण किती वेळ?”
“बघुया. वाट बघण्याशिवाय काही पर्याय नाही.”
परत दहाएक मिनिटे शांततेत गेली.
“जरा टॅार्च लाव ना. अंधारात कसतरीच वाटतंय.” मी टॅार्च लावला.
“इतके वर्ष आपण एकाच बिल्डींगमध्ये आहोत पण एकमेकांविषयी काहीच माहिती नाही आपल्याला.” मी म्हटले.
“हो ना, पण तशी वेळच आली नाही.” रागिणी म्हणाली.
“आता वेळच वेळ आहे.” मी.
“बाबारे, काहीतरी बोलू नकोस. कधी एकदा घरी जाते असं झालाय मला.”
“आपण एक काम करू या. मी माझी माहिती सांगतो, तू तुझी सांग.”
“नकोरे, माझा मूड नाहीये.”
“ठीक आहे. तू नको सांगूस, मी सांगतो ते तरी ऐक. तुला माहिती आहे का, माझ्या घरचे मागे लागले आहेत, लग्न कर म्हणून. मीच थोपवून धरलाय त्यांना.”
“का रे, तू तर आता सेटल झाला आहेस.”
“ते झालंच. आणि घराचे खूपच प्रेशर टाकताहेत.”
“मग?”
“मग काय, भारत मॅट्रिमोनी मध्ये नाव नोंदवलय.”
“काय सांगतोस काय, मला वाटले तुझी कोणी गर्लफ्रेंड पण असेल आत्तापर्यंत.”
“रोज रात्री बाराला घरी पोचून सकाळी आठ वाजता घर सोडतो मी, वेळ आहे कुठे मुलींच्या मागे जायला?”
“म्हणजे वेळ मिळाला तर जाशील वाटतं?”
“मी तसा वाटतो का तुला?”
“कसं समजणार कोण कसे आहे ते?”
“ते पण बरोबरच आहे म्हणा.”
“आपण एक गेम खेळूया. आपण दोघे भारत मॅट्रिमोनीच्या माध्यमातून एकमेकाना भेटलोय असे समजूया.” आता रागिणी मूडमध्ये आली होती. आपण लिफ्टमध्ये अडकलो आहोत हे पण विसरली होती बहुतेक. ”मी सुरुवात करते. तुझ्या मुलीबद्धल काय अपेक्षा आहेत?”
“तुझ्यासारखी चालेल.”
“काय?, हे जरा जास्तीच होतंय हं!”
“अग तसं नाही पण बघ ना. मला तुझ्यासारखी प्रोफेशनल मुलगी हवी. तू दिसायला पण ठीकच आहेस.”
“नुसती ठीकच?” बहुतेक रागिणीने डोळे मोठे करून भुवया उंचावल्या असणार, दिसत नसलं तरी आवाजात जाणवत होतं.
“नाही, म्हणजे सुंदर आहेस, स्मार्ट आहेस, चांगला जॉब आहे. अजून काय पाहिजे?”
“आहेच मी सुंदर. सुंदर मुलीला सुंदर म्हणायला तुला प्रॉब्लेम आहे वाटतं?”
“नाही, पण असं एकदम कसं म्हणणार? मी आत्तापर्यंत कोणालाच कधी असं सांगितलं नाही.”
“त्याला काय झाले? मी म्हणते की तू हॅंडसम आहेस म्हणून.”
“थॅंक्स.” बरं झाल अंधार होता म्हणून. ही बया तर माझी बाप निघाली.
यानंतर लग्न ठरविताना विचारल्या जाणाऱ्या सर्व प्रश्नाोत्तरांची देवाणघेवाण झाली. शेवटी रागिणी म्हणाली, “मला तू पसंत आहेस, आपल्याला पुढे जायला हरकत नाही.”
मी पुन्हा एकदा अंधाराला मनातल्या मनात धन्यवाद दिले. ”मला पण तू पसंत आहेस. चल लग्न करुया?”
नंतरचा दीडतास कसा गेला हे वर्णन मी करू शकत नाही. चार तासांनी लिफ्ट सुरु झाली तेव्हा आम्ही एकमेकांच्या मिठीत झोपलो होतो. दिवे लागल्यावर खाडकन भानावर आलो. उठून स्वत:ला सावरेपर्यंत लिफ्ट ग्राउंड फ्लोअरला पोचली देखील. रात्रीचा एक वाजून गेला होता. लिफ्टचा दरवाजा उघडला आणि समोरच रामशरण, आमचा वॅाचमन उभा होता.
“साब इतना देर आप अंदर था? हमे पता ही नही था.”
“लेकिन हुआ क्या” मी विचारले.
“क्या बताऊ साब, लिफ्टका पॉवर अचानक बंद हो गया. बॅकप रिपेर को दिया था. इसलिये चालू करने को देर लगा. सॉरी साब.”
“ठीक है. तुम्हारा गलती नाही है.”
“गुडनाईट साब.”
पाच मिनिटात उबर कॅब आली. मी रागिणीला अंधेरीला तिच्या घरी सोडून माझ्या घरी गेलो. नरीमन पॅाईंट ते अंधेरी या एक तासाच्या प्रवासात आम्ही एक अक्षरही बोललो नाही. बोलायला काही शिल्लकच नव्हतं म्हणा! पूर्ण प्रवासात रागिणी माझ्या खांद्यावर डोकं ठेवून शांत झोपली होती.
***
दुसऱ्या दिवशी सकाळीच ऑफिसला पोहोचल्यावर मी रामशरणला बाजूला घेऊन ठरल्या प्रमाणे हजार रुपये दिले.
“काम हो गया साब?”
“बिलकुल हो गया. पर मैने तुमको दो घंटा लिफ्ट बंद रखनेको बोला था. तुमने चार घंटे क्यू लगाये?”
“साब, आप खुदको जितना स्मार्ट समझते हो उससे जादा मॅडम स्मार्ट है.
“क्या मतलब?” मी जरा चक्रावलोच.
“अरे साब, मॅडमने हमारी सारी बाते सुनली थी. उन्होनेही मुझे चार घंटे लिफ्ट बंद रखनेको कहां था और मुझे और एक हजार रुपये भी दिये.”
“अबे, इसमे सबसे ज्यादा फायदा तो तुम्हाराही हुआ है.”
“आपका भी तो नुकसान कहां हुआ है? साब डरो नही, मै शादी में अच्छा गिफ्ट दूंगा.”
मी ऑफिस मधून निघताना फोन करून रामशरणला पाच मिनिटांनी लिफ्ट बंद करायला सांगितले होते. मला माहित होतं की रागिणी त्याच वेळेला लिफ्ट मध्ये येणार. मॅट्रिमोनीच्या साईट वर रागिणीचा बायोडाटा बघून मला ती आवडली होती. आणि प्रत्यक्ष बघून मी तर तिच्या प्रेमातच पडलो होतो. तिला प्रपोज करण्यासाठीच मी हा सगळा बनाव रचला होता. पण मला हे माहित नव्हतं की आग दोनो तरफ बराबर लगी है. ठीक आहे, म्हणतात ना, युध्दात आणि प्रेमात सर्व क्षम्य असतं म्हणून!



Comments
वाह क्या बात है! कहाणी मध्ये ट्विस्ट!! तोडफोड आयडिया!!
By : Bhalchandra Shrikhande
Wah kya bat hai
By : Mona
Mast
By : Mona
😀😀😀😀😀😀😀😀😀 Good One !!!
By : Aniruddha Patwardhan
रोमॅंटिक कथा , गंमतीशीर.
By : Pratibha Tarabadkar