आठवण आणि बरेच काही
आठवण
तुला मी आठवतो का ग?
सांग ना!
पण थांब!
प्रश्न जरा अवघड आहे
जर तू हो म्हणालीस तर मला विसरली होतीस
कारण विसरल्यावरच गोष्टींची आठवण येते
पण मग सांग ना
तुला मी आठवतो का ग?
साठवण
मी तुला डोळ्यात साठवून ठेवले होते कधीही न विसरण्याकरिता!
पण तू माझ्यापासून दूर निघून गेलास
कदाचित माझी परीक्षा पहात असावास
की तुझे मनपाखरु दुसऱ्याच फुलावर विसावले
सांग ना!
मन पाखरु
तुला पाहिलं की सतत पहात रहावसं वाटतं
पण मनावर ताबा ठेवायला हवा!
मनपाखरु काय कुठल्यातरी फुलावर विसावणारच
मात्र सर्व फुले एकसारखी थोडीच असतात?
म्हणूनच कदाचित
तुला पाहिलं की सतत पहात रहावसं वाटतं!
वचन
तू म्हणाली होतीस
जगाच्या अंतापर्यंत
मी तुला साथ देईन...
आणि तू ते वचन पाळलसं
तू निघून गेलीस
तो क्षण माझ्या दृष्टीने
जगाचा अंतच होता!!
कोजागिरी
कोजागिरीला.......
दोन चंद्र उगवले
एक चांदण्यांशी खेळत होता,
दुसरा माझ्या जीवाशी!!!
का बरं ?
फुललेल्या गुलमोहराला गंधाळलेल्या रातराणीमुळे भोवळ का बरं आली?
मोगऱ्याच्या सड्यावरून जाईजुई का बरं घसरल्या?
तिचे गाल गुलाबांपेक्षा गुलाबी का बरं झाले?
झाडाला बिलगलेल्या वेलीला बघून ती का बरं लाजली?
तिच्यासाठी
दूर कोपऱ्यात बसून तुझ्याकडे पहात वहीच्या पानावर मारलेल्या रेघोट्या मी अजूनही वाचतो आहे
मनाच्या कोपऱ्यात तुझ्यात गुंतलेल्या मनाच्या भांडवलावर चढलेलं व्याज मी अजूनही फेडतो आहे
जगाच्या कोपऱ्यात कुठेतरी तू असशील या एकाच आशेवर मी अजूनही जगतो आहे
कुठेतरी कधीतरी क्षणभर का होईना मला नाही म्हणण्यासाठी तरी भेटशील या आशेवर अजूनही आयुष्य वेचतो आहे
नजर
आज तुला आठवावे
आज तुला मी पहावे
नजरेला मिळता नजर
माझ्यात मी मिटून जावे
असणे
तुझे असणे
तुझे हसणे
तुझे वागणे
तुझे बोलणे
तुझे चालणे
तुझे रुसणे
तुझे लाजणे
तुझे चिडणे
तुझे रागावणे
तुझे न बोलणे
तुझे खुणावणे
आणि या सगळ्यात
माझे असणे



Comments
सगळ्याच कविता सुरेख आहेत.
By :