हेअरस्पा अर्थात केसांची मशागत
वास्तविक मी या लेखाचे शीर्षक फक्त हेअरस्पा असेच ठेवणार होतो पण मराठी माणसांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत ( आणि इंग्रजीच अज्ञान उघडं पडू नये ) म्हणून त्याचे सुलभ मराठी भाषांतर देखील शीर्षकाला जोडले आहे. उगाच माझ्यावर चिखलफेक नको! आणि तशीही हल्ली नावे मराठी व इंग्रजीत लिहिण्याची पद्धत आहेच!
एक महिन्यापासून डोक्यावरचे केस कापायला वेळ न मिळाल्यामुळे ते आता वयानुसार वाढले होते. ( याच्यात माझ्या आणि केसांच्या, दोन्ही वयांचा समावेश होतो. ) त्यामुळे शेवटी आज सलूनमध्ये जाण्यासाठी वेळ काढण्याशिवाय गत्यंतर नव्हते. सलून मध्ये कस्टमर नसल्यामुळे दोन्ही केशकर्तन तज्ञ (हल्ली न्हावी म्हणणे बरं दिसत नाही, मराठीत त्याना हेयरस्टायलिस्ट देखील म्हणतात.), बेंचवर पाय ठेवून टीव्हीवर ऐश्वर्या रायचे ठुमके पहात बसले होते. त्यापैकी एकाने या या म्हणत मला त्यांच्या खुर्चीवर बसवले. एक शब्दही अधिक न बोलता त्याने एका पांढऱ्या पट्टीने माझा गळा आवळला आणि त्या पट्टीत एक लांबसडक गाऊन अडकवला. माझे जे काही थोडेफार केस शिल्लक आहेत त्याचे काय करायचे हे त्याला ठाऊक होते. त्यामुळे माझी मान त्याच्या ताब्यात देऊन मी डोळे मिटले. थोडा वेळ कात्री चालाविण्याचाच आवाज येत होता. त्याला सुलभ जावे म्हणून माझी मानही तो मधूनमधून पूर्वपश्चिम वळवत होता.
“साहेब”, मला डोळा लागल्यामुळे तो माझ्याशी बोलतोय हे समजायला दोन मिनिटे लागली.
“अं?”
“तुमच्या केसात खूपच कोंडा (मराठीत त्याला डँड्रफ म्हणतात) झालाय.”
हे मलापण काही दिवस जाणवत होतं. बायकोचे सर्व शाम्पू आलटून पालटून वापरूनही तो कमी होत नव्हता.
“हो, झालाय खरा, पण काय करणार?”
“हेअरस्पा करून घ्या साहेब.”
“तो कसा आणि कुठे करायचा?”, असं विचारून मी माझ्या अज्ञानाचे आणि बावळटपणाचे प्रदर्शन केले.
“आम्ही करून देतो ना इथेच.”
मराठी माणसाला कुठलीही गोष्ट विकत घ्यायची किंवा करून घ्यायची म्हटली तर ती कितीला पडेल हा पहिला प्रश्न पडतो. साधे केस कापायचे दर देखील हाहा म्हणता दहा रुपयांवरून शंभर रुपयांवर गेले होते. लहानपणी तर रस्त्यावर एक पत्र्याची पेटी घेऊन न्हावी फिरायचे आणि पाच दहा पैशात आमची हजामत केली जायची. माझी बायको सलोनमध्ये जाऊन एका वेळेला हजार रुपये देते. आणि एव्हढं करून केस कापले आहेत की नाहीत ते पण समजत नाही ती गोष्ट वेगळी! आम्ही अमेरिकेत काही वर्ष वास्तव्याला असताना तिथल्या सलूनमध्ये जाण्याशिवाय गत्यंतर नव्हते. तिथे केस कापायला नऊ ते दहा डॅालर्स लागायचे. त्यापेक्षा भारतात केव्हढी स्वस्ताई आहे ना? उगाच नाही मेरा भारत महान! त्यावेळेला डोक्यावर केस बऱ्यापैकी होते, त्यामुळे व्हॅल्यू फॉर मनी पण होती. शिवाय केस कापायला बहुतेक सर्व लेडी स्टायलिस्ट असायच्या. मात्र या दोन्ही कारणांमुळे आमचे विद्यार्थी मित्र स्वत:च घरी केस कापणं पसंत करायचे.
“किती घेता तुम्ही एका वेळचे?” मी मराठमोळा प्रश्न केला.
“आम्ही हजार रुपये घेतो, पण तुमचे केस खूपच कमी आहेत तेव्हा आठशे द्या.”
आता याने तुम्ही आमचे नेहमीचे गिऱ्हाईक आहात म्हणून शंभर रुपये कमी द्या असे म्हटले असते तर काही बिघडलं असतं का? माझे केस काढायची आवश्यकता होती का? तसे पण तो काढत होताच! मी आपला अपमान गिळून पैसे वाचले यावर समाधान मानून त्याला विचारले,
“हेअरस्पा म्हणजे नक्की काय करता तुम्ही? आणि डँड्रफ नक्की जाईल का?”
“त्याची खात्री मी देतो.”
एखाद्याला ‘भैया, भाजी अच्छी है ना?’ असं विचारल्यावर ‘नाही भाभीजी, सडी हुई है.’ असे म्हटल्याच कधी ऐकलं आहे का? याच स्टाईलमध्ये त्याने उत्तर दिले.
म्हणजे हे सर्व प्रकरण आठशे रुपयाला पडणार होतं. पण एकदाचा मनाचा हिय्या करून मी माझं डोकं परत त्याच्या ताब्यात दिलं.
तो मला उठवून सिंकजवळ घेऊन गेला आणि खुर्चीत बसवलं. खुर्चीला एक प्लॅस्टिकचे घमेले लावलेले होते. त्यात ( अर्थात माझे ) डोके घालून हँडशॅावरने माझ्या केसांची धुलाई झाली. धुवून झाल्यावर केस टॅावेलने पुसून कोरडे केले गेले. नंतर मला दुसऱ्या एका खुर्चीत बसवून केसांना शाम्पू लावला गेला आणि डोक छानपैकी चार पाच मिनिटे रगडण्यात आले. अहाहा! इतकं छान मला कधीच वाटलं नव्हतं. परत माझा डोळा लागणार तेव्हढ्यात त्याने एका पेडस्टलवर बसविलेल्या एका उलट्या घमेल्यात परत माझं डोकं घातलं. त्यातून वाफ बाहेर येत होती. चांगले दहा मिनिटे वाफेने डोकं भाजून झाल्यावर माझे डोकं त्यातून बाहेर निघाले. त्यानंतर परत सिंकवरच्या घमेल्यात केसांची धुलाई झाली. मग टॅावेलने पुसून डोकं कोरडे केल्यावर पुन्हा आधीच्या खुर्चीवर बसवून डोक्याला दोनतीन प्रकारची लोशन्स लावली गेली आणि परत डोक्याची मशागत करण्यात आली.
केशकर्तन तज्ञाने झाले म्हटल्यावर मी आरश्यात बघून माझ्या केसांवर हात फिरवला. खरंच छान मउ झाले होते केस! आणि डोक्याची मशागत झाल्यामुळे जरा हलकं हलकं पण वाटत होतं.
आठशे रुपयांनी माझा खिसा हलका करून वर वीस रुपये टीप देऊन मी घरी आलो.
“एव्हढा वेळ का लागला? खूप गर्दी होती का? पण केस कापल्यावर आता जरा बरा दिसतोयस.” बायकोने दारातच प्रशस्तीपत्र दिले. आणि डोक्यावरून हात फिरवत, “ अय्या, किती सॅाफ्ट झालेत तुझे केस!” म्हणून चित्कारली.
“मग? होणारच. हेअरस्पा करून आलोय. वाटलं काय तुला!”
अजी म्या ब्रह्म पाहिले आणि आज सूर्य कुठल्या दिशेला उगवला आहे असे दोनही भाव एकाच वेळी तिच्या चेहऱ्यावर होते, आणि आपले आठशेवीस रुपये अगदीच वाया गेले नाहीत याची जाणीव मला झाली.
तुम्हाला देखील आपल्या बायकोच्या चेहऱ्यावर असेच भाव बघायचे असतील तर माझ्याशी संपर्क करा. पाच दहा टक्के डिस्काउंटपण मिळेल. डँड्रफ जातो का परत येतो हे मात्र काही दिवसांनीच कळेल.



Comments
सुंदर कथन शैली! आपल्या अनुभवायला मिळणारा प्रसंग, अगदी रंजक प्रकारे वर्णन केला आहे!!
By : Bhalchandra Shrikhande
मजेशीर अनुभव खुसखुशीतपणे मांडलाय 😄
By : प्रतिभा ताराबादकर
Masta !
By : Swapna B.
वाचायला मजा आली. वर्णन एकदम मस्त केला आहे. डोळ्यासमोर प्रसंग उभा केला.
By : वीणा कडेकर