काहीही घ्या!


काहीही घ्या!

शशांक पुरंदरे

सर्वसाधारणपणे सकाळी साडेसहाच्या सुमारास आमच्या सोसायटीच्या बाहेर “धारवालाये, धार लावून देणार” अशी आरोळी ऐकू येते. आज मात्र एक माणूस “काहीही घ्या” अशी आरोळी देत होता. मी कुतूहलाने पाहिले तर माणूस छान सुटाबुटात होता. माझे कुतूहल अधिकच वाढले. मी आमच्या सिक्युरीटीला त्याला वरती पाठवायला सांगितले. दोनच मिनिटांनी दारावरची बेल वाजली. मी दरवाजा उघडला.
“नमस्कार, मी विनीत.”
“नमस्कार. तुम्ही नक्की काय विकताय?”
“काहीही.”
“म्हणजे?”
“सांगतो. मी आत येऊ का?”
“ओह, माफ करा. या आत या बसा.” विनीत आत येउन सोफ्यावर बसला. माझी सौ देखील बाहेर आली होती. तिने पाण्याचा ग्लास विनीतला दिला.
“धन्यवाद. ओरडून घश्याला कोरड पडली होती. मी एक फिरता विक्रेता आहे. घरोघरी जाऊन विक्री करतो.”
“ते समजले. पण म्हणजे नक्की काय विकता? चांगले सूटबुट घालून फिरताय. मग ओरडून सांगायची काय गरज आहे?”
“ती एक मोठी कथा आहे. मी MBA केलंय. दोन वर्ष काम देखील करत होतो. पण नंतर कक्षात आले की पुस्तकी शिक्षणाचे महत्व तेवढ्या पुरतेच आहे. नंतर आपलेच डोके चालवावे लागते. म्हणून मी नोकरी सोडली आणि ‘काहीही घ्या’ सुरु केले.”
“पण हे नक्की आहे तरी काय?”
“सांगतो.”

विनीतने पाणी पिऊन ग्लास खाली ठेवला. “तसे पहाल तर हे एक मोबाईल अॅप आहे, पण खरतरं ही माझी कंपनी आहे. मी तुम्हाला प्रत्यक्ष उदाहरणच देतो म्हणजे तुमच्या लक्षात पटकन येईल. तुम्हाला एखादी गोष्ट पुढच्या दहा मिनिटात हवी आहे का. म्हणजे. चहा पावडर, साखर, झाडू, दात घासायचा ब्रश, थोडक्यात काहीही.”
“हो”, लगेच सौ म्हणाली. “मला सोसायटीचा अर्धा किलो चहा मिळेल का?”
“हो, दहा मिनिटात घरी येईल. मागवू का?”
“हो मागवा.”

विनीतने मोबाईलवर काही बटणे दाबली. “दहाव्या मिनिटाला तुमचा पुडा घरी येईल.”
“पण नाव, पत्ता, पैसे?”
“GPS. बाकी काही गरज नाही. पैसे GPAY करा वा रोकड द्या. क्रेडिट कार्ड पण चालेल. तुम्हाला दहा टक्के सुट देखील मिळेल MRP वर.”
“पण हे तर झेप्टोवर पण मिळते.”
“हो पण झेप्टोवर गाडी मिळेल का? तुम्हाला मी गाडीपासून साडीपर्यंत काहीही घरी पोचवू शकतो. अर्थात प्रत्येक गोष्टीला कमीजास्ती वेळ लागू शकतो. आणि मी माझा मोबाईल तुमच्या टीव्हीला कनेक्ट केला की तुम्ही गोष्टी घरबसल्या पाहू शकता.”

“अय्या, साडी!!!” सौ चित्कारली, “जरा साड्या दाखवाना.”
आमची पुढील दहा मिनिटे टीव्हीवर बनारसी, येवला सिल्क, मैसूर सिल्क, कोलकाता, चंदेरी, कांजीवरम वगैरे साड्या पहाण्यात गेली. त्यात तो सोसायटीचा चहाचा पुडा आला. मी GPAY करून किचनमध्ये जाऊन सर्वांसाठी चहा केला. तोपर्यंत बाईसाहेबांच्या दोन साड्यांची खरेदी झाली होती. दहा मिनिटात त्यांची डिलिव्हरी आली. पैसे अर्थातच माझे गेले.

“पण समजा टीव्ही नसेल तर?”
“माझ्याकडे १० इंचांचा टॅब आहे. त्यावर तुम्हाला सर्व पाहता येईल.”
“पण हे तुम्ही कसं करता?” चहा पितापिता मी विनिताला विचारले.

“चहा छान झालाय.” चहाचा घोट घेऊन विनीत म्हणाला. “मी एक वर्षभर भरपूर अभ्यास केला. तंगडतोड केली. अगणित लोकांना भेटलो. अनेक कंपन्यांना भेटी दिल्या. त्यांच्याबरोबर कंत्राटे केली. त्यानुसार माझे काम फक्त अॅपवर ऑर्डर देणे होते. माझी माणसे कंपनीतून माल उचलून लोकांना पोहोचवण्याचे काम करतात. माझी ऑर्डर गेली की माल देणे एव्हढेच कंपनीचे काम असते. मला कंपन्या डिस्काऊंट देतात. कारण त्यांचे मार्केटिंगचे पैसे वाचतात. ती माझी कमाई असते.”

“पण मला अजूनही एक गोष्ट समजलेली नाही. तुमच्यात किंवा अमेझॉनमध्ये नक्की काय फरक आहे?”
“पर्सनल टच. तुम्ही इथे प्रत्यक्ष माणसाशी व्यवहार करता, अॅपशी नाही. मी काही आंतरराष्ट्रीय कम्पन्यांशी करार करणार आहे. त्यामुळे तुमच्या सारख्या लोकांचे आयुष्य अजून सुखाचे होईल. वेळेवर आणि कमी किंमतीत वस्तू मिळतील. माझ्यामुळे अनेक लोकांना रोजगार मिळाला आहे आणि मिळेल. आणि पुढे मागे आपण चांगले मित्रदेखील होऊ.”
“हो नक्कीच. पण समजा मला काही हवे असेल तर मी काय करायचे. तुमची वाट बघत बसायची का?”
“मला फोन करा. पाचव्या मिनिटाला माझा माणूस हजर होईल.”

एव्हढ्यात दरवाजावरची घंटी वाजली. समोर सोनटक्के काकू उभ्या होत्या.
“तुमच्याकडे तो काहीही घ्या वाला आला आहे ना?”
“हो हा काय विनीत.”
“जरा काम झाले इथले की माझ्याकडे याल का?”
“हो, आलोच पाच मिनिटात.” विनीत म्हणाला.
“चला काका, येतो. तुम्हाला रेफरल बोनस देणार आहे. भेटू परत.” असे म्हणून विनीत शेजारी काकुंच्या घरी गेला.

पाच मिनिटांनी सौ बाहेर येऊन म्हणाली,” अहो मला अजून एक साडी घ्यावीशी वाटतेय.”
“विनीत झिंदाबाद!” मी म्हणालो.

Comments

विनीत कल्पवृक्ष

By : Deepak Tikekar
05/09/2024 08 : 15 : 08 AM

Wah chan

By : Mona
05/09/2024 11 : 20 : 10 AM

Nice Business 💡

By : Sandeep V Nachane
05/09/2024 11 : 25 : 26 AM

अमेझॉन वर कडी 😁😁

By : रोहिणी
13/09/2024 04 : 17 : 12 AM

👌👍

By : Hemant Kashikar
21/09/2024 12 : 23 : 18 PM

सुंदर कल्पना .अमेझाॅनच्या पुढे एक पाऊल .

By : योगिनी लोथे.
22/09/2024 10 : 07 : 52 AM
Leave a comment
*Comment :
*Name :
Email :



Share This Article